नाळ : (अनुवादित गोष्ट )
नाळ
अनुवाद : डॉ. नीती बडवे
(मूळ पूर्व जर्मन लेखिका: हेल्गा शूबर्ट. जर्मन शीर्षक : Luft und Leben. पूर्व प्रसिद्धी : सत्याग्रही, १९८५.)
‘मातृत्वा’विषयी माझी कल्पना वेगळी होती.
अहं, मी काही माता नव्हते. माझं पोटाचं कातडंच इतकं जाड होतं, त्याखाली मूल वाढावं तरी कसं? आणि त्यानं माझ्या पोटातून बाहेर याव तरी कसं? नंतर तर ते आपलं कायमचं असणारच - मला बाहेर जायचं असेल तेव्हा, गावाला जायचं असेल तेव्हा, मनसोक्त झोपायचं असेल, प्रेम करायचं असेल तेव्हाही.
पण मी एकोणीस वर्षांचीच असताना गरोदर राहिले. खूप दिवसांपासून ओळख असलेल्या डॉक्टरणीने मला तपासलं आणि ‘दिवस गेले’ असल्याची खात्री दिली. माझा भयभीत चेहरा तिने बघितला आणि म्हणाली, “तू आजच्या आज आईला सांगितलं नाहीस, तर मी तिला फोन करीन, कोणीही कर्तव्यदक्ष डॉक्टर तुझं अॅबॉर्शन करणार नाही.”
ती स्वत: कॅथॅलिक होती आणि तिला चार मुलं होती. आमच्याकडे अजून कायद्याने गर्भपात करता येत नव्हता. ज्याने केलं असतं असं कोणी मला माहीत नव्हतं.
मुलाच्या बापाचा आजपर्यंत इतक्या अननुभवी मैत्रिणीशी संबंध आलेला नव्हता. त्याने सुचवलं की मुलाच्या बाबतीत इतर काही मार्गांचा विचार करता येत नसला तर आपण लग्न करू. मला वडील नव्हते, मोठा भाऊ नव्हता, कोणी मित्रही नव्हता. एखाद्याने - एखाद्या पुरुषाने माझ्यात इतका रस घ्यावा, याबद्दल मला अतिशय कृतज्ञता वाटली. मी त्यालाच प्रेम समजले. कोणत्याही विरोधातल्या बाबी बघितल्या नाहीत. आम्ही लग्न केलं.
आज काय, त्याला कोणा बाईच्या घराला रंग लावायला जायचं आहे. उद्या काय त्याला कोणाकडे रेकॉर्डस् ऐकायला जायचंय आणि मला ते सगळं खरंच वाटायचं.
***
एका शनिवारी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी मी बाळाला जन्म दिला. मी दवाखान्यात होते. एका नर्सने तिच्या गुडघ्याने काळजीपूर्वक माझ्या पोटावर जोर दिला. मला मदत करण्याच्या हेतूने! एक डॉक्टरीण माझे मंदावत जाणारे ठोके स्टेथस्कोपमधून ऐकत होती आणि घाई करा म्हणून सूचना करत होती. मी शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण शुद्धीत होते. अगदी पहिल्या क्षणापर्यंत : एक सुरकुतलेलं निळं पडलेलं मूल. नाळेच्या वेढ्याने मरायला टेकलेलं. त्याने फार धडपड केली होती. त्याच्या-माझ्या नाळेच्या वेढ्याने ते मरू शकलं असतं. आधीच जगून घेऊन मेलेलंच जन्माला येऊ शकलं असतं.
एकवीस, बावीस ते... मी मोजत होते. शक्य तितकं सावकाश. पण माझं बाळ रडलं नाही. ते मृतवत लटकत होतं. त्याचं डोकं लोंबकळत होतं आणि दोन्ही पाय डॉक्टरीणबाईंनी हातात धरले होते.
मी त्याला जन्म दिला होता. या जगात आणलं होतं आणि आता त्याला इथे श्वास घेता येत नव्हता. रडता येत नव्हतं.
मला दिसलं, की तो मुलगा होता. मी त्याच्याकडे श्वास रोखून बघत होते. त्यांनी एक काचेची बारीक आणि लांब नळी त्याच्या घशात घातली. अडकलेला द्रव तोंडाने ओढून घेण्यासाठी. मी सगळं बघत होते. ते खूप झटपट सगळं करीत होते. मला कोणीच काही सांगत नव्हतं.
आणि इतक्यात माझं बाळ रडलं. ते जिवंत होतं. त्यांनी माझं मूल शेजारच्या बाईजवळ ठेवलं.
दोन आठवड्यांनी परीक्षा, अभ्यास करतांना मधे प्यायला घेणं. मी वीस वर्षांची होते.
तो तीन महिन्यांचा होता, तेव्हा मी त्याला रोज पाळणाघरात ठेवायला लागले. अंगावरचे दूध पिळून बरोबर नेत होते. तो तीन वर्षांचा झाला, तेव्हा के.जी.त घातलं. हिवाळ्यात. बर्फातून बाबागाडी ओढत. संध्याकाळचं कंटाळलेलं मूल, रडणारं भेकणारं मूल, आजारी मूल, थकलेली मी, माझं ओरडणं, माझं आजारपण.
***
दुसरं मूल एक वर्षानं लहान झालं असतं. पण मी त्याला जन्मू दिलं नाही.
***
माझा मुलगा चार वर्षांचा असताना घटस्फोटाची सुरुवात झाली. अन् सहा वर्षांचा असताना मी शेवटी त्याला घेऊन दुसरीकडे राहू लागले. तेव्हापासून तेरा वर्ष लोटली.
तो आपला सतत येत होताच. संध्याकाळी, सकाळी, वीकएंडला, सुट्ट्यांमध्ये.
नेहमी सगळं डोक्यात ठेवायचं. ब्रेड, लोणी, दूध, शाळेचा गृहपाठ, पालक मेळावा, बैठका, असंख्य जेवणं, शिजवणं, पुलोव्हर धुणं.
मी इतक्या वेळा आरडाओरड केली आणि याचनाही. शांती, क्षमाशीलता आणि समजूतदारपणासाठी. माझ्या इच्छा-आकांक्षाखाली मी त्याला दाबलं. निराश झाले, खचले. तो जेव्हा गादीवर पडायचा आणि झोपायचा, तेव्हा त्याच्यावर हळवं प्रेम केलं. मला माझी लाज वाटत असे. कारण मी प्रेमळ माता नव्हते - अंजारणारी, गोंजारणारी, हळवी, मायाळू.
पण हे मूल माझ्या हातासारखं होतं. हाताला तरी मी कुठे अंजारते, गोंजारते. तो आपला असतो. अगदी पहिल्यांदा मी माझ्या मुलाला एकटं सोडलं, तेव्हा तो चार महिन्यांचा होता. आम्ही लोकलनं नाटक बघायला गेलो. तो घरी स्वच्छ, नीटनेटका आणि तृप्त झोपला होता. पण लोकलमध्ये मला एकदम वाटलं की, एका लांबलचक नाळेने तो माझ्याशी बांधला गेलाय.
हे मूल, त्याने मला या जगात घट्ट बांधून ठेवलंय. त्यानंतर मी कधीच गाड्यांच्या भगभगीत दिव्यांकडे झेपावले नाही.
***
जेव्हा माझं मूल पहिल्यांदा सकाळी त्याच्या छोट्याशा गादीवर उठून बसलं. जेव्हा तो पहिल्यांदा त्याच्या वडिलांकडून माझ्यापर्यंत पळत आला, तेव्हा मला वाटलं, ‘आता त्याला तुझी आणखी कमी गरज भासेल.’ आणि त्याचं मला बरं वाटलं, अभिमान वाटला.
एकदा तो फार गंभीर आजारी झाला. तेव्हा साडेतीन वर्षांचा होता. रात्री त्यानं मला उठवलं. त्याला उलटी झाली. खूप ताप होता. आम्ही इमर्जन्सी डॉक्टरला बोलावलं. दुसर्या दिवशी लहान मुलांच्या डॉक्टरणीला. नंतर तिला रोज बोलवत होतो. कारण त्याचा खोकला वाढतच चालला होता. शेवटी तिने आमच्या टेलिफोनला कंटाळून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी चिठ्ठी दिली. अॅपेंडिक्स ऑपरेशसाठी. पण खरं तर त्याच्या फुफ्फुसात पू झाला होता. रात्रपाळीच्या डॉक्टरणीनं आम्हाला दिलासा दिला, की तो आजची रात्र काढेल.
त्याच्या वडिलांकडे त्याचे कपडे आणि सामान परत देण्यात आलं. त्याची लोकरीची लाल टोपी, त्याचे लहानसे बूट, त्याचा कोट हे घेऊन ते घराच्या दारात उभे राहिले आणि त्यांना वाटलं- नव्हे त्यांनी ते तसं बोलून दाखवलं. “तो जाणार. त्याला तू जबाबदार आहेस.” मला रात्री छान झोप आली. अतिशय थकले होते. पण शांत होते. खात्री होती, की तो यातून वाचेल. दुसर्या दिवशी तिथे त्यांनी सांगितलं, आम्ही आता त्याला बघू शकतो. पण अगदी गुपचूप, चोरून. भावनांची खळबळ त्याला सहन होणार नाही.
तो एका स्वतंत्र खोलीमधे ऑक्सिजन मास्कखाली पडला होता. नर्सने तिच्या एप्रनवर आणखी एक एप्रन घातला आणि मगच ती त्याच्या कॉटजवळ गेली.
रात्री त्यांनी पंक्चर करून पू काढला होता. त्याला ब्लड ट्रान्सफ्यूजन्स दिली होती. आता त्याला काचेच्या भिंतीतून आम्ही दिसत होतो. रात्री त्याला किती तरी सहन करायला लागलं होतं. मी काही त्याच्याजवळ बसले नव्हते, की त्याला धीर दिला नव्हता. त्याला नर्सेस आणि डॉक्टर्सवर सोपवलं होतं. त्यानं आम्हाला बघितलं आणि तो मोठ्या कष्टानं उठून बसला. आमच्याकडे दोन्ही हात पसरून रडायला लागला. तो जिवंत होता.
एकदा मी घरी आले. तर येताना घराजवळ रस्त्यात रक्ताचे डाग दिसले. तो होता तेव्हा शाळकरी वयाचा. तिथे बरीच मुलं उभी होती. ती सगळी वाकून बघत होती. मधे माझा मुलगा बसला होता. डोकं हातात धरून, डोळ्यावरून रक्ताची धार लागली होती. डोक्याला खोक पडली होती. खेळातली स्कूटर चालवताना इकडेतिकडे बघत होता. जाऊन आपटला काँक्रिटच्या खांबावर.
***
हा मुलगा पहिल्यांदाच एकटा आगगाडीने आजी-आजोबांकडे गेला. मला वाटलं, एका अगदी लहान लहान होत जाणार्या गाडी मधे तो बसलाय आणि दक्षिणेकडे चाललाय. अगदी एकटा. बरोबर एक सँडविच आणि लिमोनेडसाठी एक मार्क. नकाशावर दक्षिणेकडे प्रवास करत, माझ्यापासून दूर.
***
त्याच्या मैत्रिणी, त्याच्या खोलीत जाऊन बसायच्या लगेच. अहं, चहा नको असायचा त्यांना. त्यापेक्षा एखादी सिगरेट ओढायची असायची. वजन वाढायची भीती, काँट्रासेप्टिव्ह पिल्स् घेत असताना त्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.
आई, असं कसं होतं, मला ज्या मुलींकडून काहीच नकोय, त्यांना माझ्याकडून काहीतरी अपेक्षा असते आणि इतर काही जणींच्या बाबतीत - मी कसा त्यांच्याजवळ जाऊ धजावतो?
आई, तू घटस्फोट का घेतलास? मला तर बाबा ठीक वाटतात. तुझीही काही चूक नव्हती, असं नाही, असं ते म्हणाले. हं, अगदी प्रामाणिकपणे म्हणशील तर आत्ता हे जे आहे तसंच ठीक आहे. ती त्यांना तुझ्यापेक्षा जास्त शोभते. त्यांचा एकत्र संसार जास्त चांगला चालला आहे.
आई, तू असं कधी अनुभवलं आहेस की, आपली कोणाशी तरी ओळख होते आणि त्या व्यक्तीशी आपण लगेच बोलू शकतो, अगदी तासन् तास? संध्याकाळभर, रात्रभर? आणि मग अगदी लगेच आपण त्या व्यक्तीबरोबर झोपू शकतो? दुसर्या दिवशी उठतो आणि तिच्याबरोबर बाहेर जातो, दुपारी जेवतो आणि तरीही सतत बोलू शकतो?
तर, आता माझा मुलगा मोठा झाला.
***
तो काम शिकला. झाडं पाडायला शिकला. त्याला फांद्या छाटता येऊ लागल्या कुर्हाडीने. ती पण इतकी धारदार की, तिने ब्रेड कापावा. दिवसा तो जंगलातच असायचा. मधेमधे विश्रांतीसाठी चाकावर बांधलेल्या छोट्या गाडीसारख्या लाकडी घरात. सकाळी ते घर लोखंडी भट्टी लावून गरम केलं जायचं. न्याहारीच्या वेळी ते या भट्टीवरच ब्रेड भाजायचे. तो ट्रॅक्टर चालवायला शिकला. लाकडाचे ओंडके वाहून न्यायला आणि मोठे ट्रक हाकायला शिकला. तो पाईनचे कोन तोडायला शिकला. प्रथम झाडाच्या खोडावरून वर जायचं. नारळाच्या झाडाला धरतो, तसं हातांच्या मिठीत घट्ट पकडून. तेव्हा दोर पाठीवर असतो. मग सुरक्षिततेसाठी स्वत:ला बांधायचं आणि दोराचं दुसरं टोक झाडाच्या शेंड्यावर टाकायचं. मग आणखी उंच जायचं आणि शेंड्याच्या फांद्यांतून आलेल्या त्या टोकाने स्वत:ला बांधायचं. शेंड्यावर पोचल्यावर कोन तोडण्यासाठी दोन्ही हात रिकामे पाहिजेत ना! जर का दोर बांधताना काही घोटाळा झाला, तर काही खरं नाही. वर हात मोकळे पाहिजेत आणि स्वत:ला भक्कम बांधलेलं असलं पाहिजे, आलं लक्षात? जर कोणी खाली पडलं, तर स्वत:च्या चुकीनं, कळलं? प्रशिक्षक खाली उभा असतो माहित्येय? तो म्हणतो, हं सोड आता. काय वाटतं तेव्हा! वरती, हवेत, एकटं, भन्नाट.
***
तो एकोणीस वर्षांचा झाल्यावर आम्ही त्याला एका गुरुवारी बारा वाजता रिवाजाप्रमाणे सैनिकी प्रशिक्षणासाठी पोचवलं - त्याचे बाबा, त्यांची मैत्रिण आणि मी.
सगळ्या मुलांचे केस बारीक कापलेले होते. जीन्सच्या कापडाचे पोशाख, पाठीवर सॅक, टोपी असलेला विंडचीटर - मुफ्तीमधल्या एका अधिकार्याने मुलांना विचारलं, अजून काही विचारायचं आहे का? काही मुलांनी गंमतीने विचारलं, पहिली रजा केव्हा मिळेल? आणि आम्हाला सोडणार केव्हा?
अधिकारी शांतपणे म्हणाला: आता आपण स्टेशनकडे जाऊ. तिथून आपण आगगाडीने पुढच्या मेळाव्याच्या ठिकाणी जाऊ. एक साथ दोन कतारीत चला.
मुलं एकदम दोनदोनची ओळ करून जाऊ लागली. रस्त्यावरून नव्हे, फुटपाथवरून. अरुंद, दगडी बोळाच्या उतारावरून. त्याने वळून बघितलं आणि हात केला. अगदी ते वळून जाऊन दिसेनासे होईपर्यंत. माझ्या मनात मागच्या शेकडो वर्षांचा इतिहास सरकला. तेव्हापासून असंख्य वेळा आया आणि मैत्रिणी त्यांच्या मुलांच्या आणि मित्रांच्या पाठीकडे अशाच बघत आल्या आहेत.
***
दहा दिवसांनंतर शपथविधी होता. एका सैनिकी स्मारकापाशी. सगळे हेल्मेट घालून आणि पांढुरक्या चेहर्याचे. स्मारकाकडे जाणारा रस्ता कबरस्तानावरून जात होता. जाताना थडगी, येताना थडगी. काही बायका थडग्यांवरचं गवत काढून जमीन सपाट करत होत्या.
इतक्या हेल्मेट्समधे मी त्याला ओळखलंच नाही. आम्ही त्याला ओळखेपर्यंत तो चेहरा समोर ठेऊन डोळ्यांच्या कडेतून सतत आमच्याकडे बघत होता. मग बरं वाटलं. नंतर काही वेळ आम्ही त्याच्याजवळ उभं राहू शकलो. त्याला स्पर्श करू शकलो. गोंजारू शकलो. आम्ही त्याच्या युनिफॉर्मचं कापड हात लावून बघू शकलो. त्याचं हेल्मेटही. सकाळी नुकतंच तेल लावलेलं.
त्याची मैत्रीण मला हळूच म्हणाली, “गणवेषामधे काय छान दिसतोय ना तो? सगळ्यांमधे त्याला गणवेष अगदी शोभून दिसतोय ना?”
सडपातळ आणि उंच असा तो उभा होता. त्याचे गंभीर काळसर निळे डोळे. त्याच्या मैत्रिणीच्या हातात हात गुंफून आपल्या आईवडिलांकडे बघत हसून म्हणाला, “मी मानांकित प्रथम आलेला सैनिक होतो. ते तुम्ही बघितलंच नाही. मी निशाण घेऊन पुढे गेलो. खूप सराव करावा लागला आम्हाला.”
एक जर्मन सैनिक! मी मनाशी म्हटलं, माझा मुलगा एक जर्मन सैनिक आहे, माझे वडील एक जर्मन सैनिक म्हणून मृत्युमुखी पडले.
माझ्या मुलाचे तारवटलेले डोळे मी बघितले. आपल्या हातून काही चूक होईल ही भीती. तो छान दिसत होता. असं वाटणंही मुर्खपणाचं. मला या विचाराची लाज वाटली. माझी आजी आजोबांबद्दल सांगायची. ते युनिफॉर्ममधे फार तडफदार दिसायचे. पण मला असलं काही वाटणं शक्य नव्हतं.
दुपारच्या जेवणानंतर आम्ही अजून दोन तास त्याच्याबरोबर घालवू शकणार होतो. सगळे नातेवाईक गोळा झाले होते.
युनिफॉर्ममधल्या त्यांच्या त्यांच्या माणसांभोवती बायका त्यांच्या लहान मुलांना घेऊन, भावंडं, वडील - त्यातले काही स्वत: युनिफॉर्ममधे. आम्ही थर्मास आणि फळांनी लगडलेले. तो उठला, तेव्हा त्यानं हात लांब करून टोपी आणि कमरेचा पट्टा घातला.
मग ते एकत्र गोळा झाले. कतारीत उभे राहिले आणि मार्चिंग करत बराकीत गेले. आम्ही त्यांच्याबरोबर थोडं चाललो, मग पळालो, - तो नजरेआड होऊ नये म्हणून. ते बराकीच्या फाटकातून आत गेले. त्याचे मुफ्तीतले रोजचे कपडे मी एका दिवसापूर्वीच प्रवासाच्या सामानातून काढून आवरून ठेवले होते. माझ्या मनात आलं, आता त्याच्याजवळ फक्त त्यांचा युनिफॉर्मच.
जेव्हा तो दिसेनासा झाला, तेव्हा आम्ही एकमेकींकडे बघितलं. त्याच्या मैत्रिणीनं आणि मी. गढूळ नजरेनं मी बघितलं - ती कशी हसत रडत होती. अजून पाचशे तीस दिवस, त्याला फक्त मीच आहे आणि जरा अडखळून तिनं माझ्याकडे स्निग्ध नजरेनं बघितलं. नजर म्हणत होती, त्याला आता फक्त तुम्ही आणि मीच आहोत. अकरा दिवसांनी त्याचं पत्रं आलं. आता मी मोजून तीन आठवडे इथे आहे. सर्वात कठीण काळ पार पडला आहे.
मागच्या आठवड्यात रात्री भयंकार स्वप्न पडून मी एकदम जागी झाले. मी खूपच म्हातारी झाली आहे आणि रडत एका अनोळखी माणसाला सांगत्येय की सैनिकी प्रशिक्षणाच्या काळात माझ्या मुलाला प्रशिक्षणावर विश्वास ठेवावाच लागला आणि भयभीत होऊन मी पलंगावर उठून बसले.
आज मला त्याची दोन पत्रं आली. एक साधं आणि दुसरं एक्सप्रेस. पहिल्यात त्याने लिहिलं होतं, की हल्ल्याच्या प्रशिक्षणाच्या सरावाच्या वेळी तो गॅसमास्क घालून पळत असताना एक रबरी बूच श्वास घेताना फिल्टरवर अडकलं आणि त्याला श्वासच घेता येईना. भीतीने गाळण उडून गॅसमास्क कसा बाजूला करायचा हेच तो विसरला. इतरांनी त्याला बघितलं आणि मदत केली नाही. मग त्यानं सगळंच डोक्यापासून खसकन् ओढून काढलं. तो अजून जिवंत आहे. काळजीचं कारण नाही.
दुसरं पत्र त्याला अधिक महत्त्वाचं होतं. त्यानं लिहिलं होतं की त्याला सुट्टी मिळाली आहे आणि तो तीन दिवसांसाठी येतोय. तेही लगेच परवाच. मी सगळ्यांना हे सांगावं. सगळ्या जवळच्या मंडळींना नमस्कार सांगावा. मैत्रिणीला हे माहीतच आहे. सगळ्यात लवकरच्या पहिल्या गाडीनं येईन असं धरा आणि त्याच्याकडे किल्ली नाहीये हे जाड पेनने अधोरेखित आणि त्याला तिच्याबरोबर एकटं असायला आवडेल, असं म्हटलं होतं. त्यानं मला पहिल्यांदाच ‘प्रिय मातोश्री’ म्हणून संबोधलं होतं.
पोटात काहीस हललं मग लक्षात आलं गोष्टीच नावच मुळी नाळ , तीच जी सर्व माणसांची काही मुलभूत भाव भावंनांशी जोडली गेली आहे
ReplyDelete