मराठी परभाषा म्हणून शिकवताना ...
मराठी शिकवता शिकवता ... परभाषकांना मराठी शिकवायला लागले तेव्हा खरं तर मी मराठी शिकायला लागले! मराठी भाषा आणि संस्कृतीकडे बघायला शिकले. एरवी आपण मराठी बोलत असतो, पण तिच्याकडे बघण्यासाठी आपल्याला अवसर मिळत नाही. दहा-पंधरा वर्षे अमेरिकन मुलांना आणि कित्येक वर्षे जर्मन आणि इतर युरोपीय लोकांना मराठी शिकवता शिकवता मी मराठीविषयी अधिक सजग, अधिक चौकस झाले. मग तिच्यातले खाच-खळगे आणि गमती-जमती दिसायला लागल्या. आधी ध्वनीमधले फरक, उच्चारातले फरक, आवाजाच्या चढ-उतरातले फरक इत्यादी. मग वाक्यरचना आणि अभिव्यक्तीमधले फरक. एक ना दोन! अमेरिकन मुलांना खूप ठिकाणी प्रश्न पडायचे आणि ठेचाही लागायच्या! आता पंधरा आणि पांढरा यातला फरक काही ऐकायला न येण्यासारखा आहे का! पण ह्या मुलांना तो ऐकायला यायचा नाही! कारण ‘ढ’ आणि ‘ध’ दोन्ही त्यांना अपरिचित! सुरवातीच्या ‘अ’ आणि ‘आ’ मधला फरकही त्यांना घोटाळ्यात टाकणारा. ‘अननस’सारख्या शब्दात एकामागून एक ‘अ’ उच्चार म्हणजे त्यांची पंचाईत! ते त्याला ‘आनानास’ असं म्हणणार! म्हणजे ‘न’ आणि ‘ण’, ‘ल’ आणि ‘ळ’, श आणि ष यातला फरक ऐकू आला नाही, त्याचा वेगवेगळा उच्चार करता आला नाह...