मराठी भाषेची जडण घडण आणि सद्यस्थिती
मराठी भाषेची जडण घडण आणि सद्यस्थिती भाषा प्रवाही आणि समावेशक असते. सर्जनशील आणि प्रयोगशील असते. ती काळाच्या ओघात सतत बदलत असते. भाषेला बरेचदा नदीची उपमा दिली जाते कारण भाषा नदीसारखी प्रवाही आहे. ती अनेक उपनद्या, ओहोळ, नाले आपल्यात सामावून घेत असते. तिचं स्वरूप बदलत जातं, पण तिची ओळख तीच रहाते. मराठीच्या बाबतीतही हे खरं आहे. पार्श्वभूमी मराठीची जडण घडण समजून घेतांना महाराष्ट्रचा इतिहास आणि भूगोल लक्षात घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्र भारताच्या साधारण मध्याच्या थोडा दक्षिणेला आहे आणि पश्चिम किनाऱ्यापासून मध्यापर्यंत पसरलेला आहे. महाराष्ट्रच्या दक्षिणेला चार प्रांत आहेत आणि तिथे कानडी, तमिळ, मल्याळी आणि तेलगु ह्या ‘द्रविड’ भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्राच्या उत्तरेला बोलल्या जाणाऱ्या बहुतेक भाषा ‘इंडो-युरोपीय’ म्हणून ओळखल्या जाणा-या गटात मोडतात. ह्या दोन भाषा गटांच्या आणि संस्कृतींच्या मधे महाराष्ट्र पसरलेला आहे. त्यामुळे ह्या दोन्ही भाषासमाजांचा आणि संस्कृतींचा प्रभाव महाराष्ट्राच्या भाषेवर आणि संस्कृतीवर पडलेला दिसतो. आज आपण जो प्रदेश महाराष्ट्र म्हणून ओळखतो त...