मराठी परभाषा म्हणून शिकवताना ...


मराठी शिकवता शिकवता ...
परभाषकांना मराठी शिकवायला लागले तेव्हा खरं तर मी मराठी शिकायला लागले! मराठी भाषा आणि संस्कृतीकडे बघायला शिकले. एरवी आपण मराठी बोलत असतो, पण तिच्याकडे बघण्यासाठी आपल्याला अवसर मिळत नाही. दहा-पंधरा वर्षे अमेरिकन मुलांना आणि कित्येक वर्षे जर्मन आणि इतर युरोपीय लोकांना मराठी शिकवता शिकवता मी मराठीविषयी अधिक सजग, अधिक चौकस झाले. मग तिच्यातले खाच-खळगे आणि गमती-जमती दिसायला लागल्या.
आधी ध्वनीमधले फरक, उच्चारातले फरक, आवाजाच्या चढ-उतरातले फरक इत्यादी. मग वाक्यरचना आणि अभिव्यक्तीमधले फरक. एक ना दोन! अमेरिकन मुलांना खूप ठिकाणी प्रश्न पडायचे आणि ठेचाही लागायच्या!
आता पंधरा आणि पांढरा यातला फरक काही ऐकायला न येण्यासारखा आहे का! पण ह्या मुलांना तो ऐकायला यायचा नाही! कारण ‘ढ’ आणि ‘ध’ दोन्ही त्यांना अपरिचित! सुरवातीच्या ‘अ’ आणि ‘आ’ मधला फरकही त्यांना घोटाळ्यात टाकणारा. ‘अननस’सारख्या शब्दात एकामागून एक ‘अ’ उच्चार म्हणजे त्यांची पंचाईत! ते त्याला ‘आनानास’ असं म्हणणार! म्हणजे ‘न’ आणि ‘ण’, ‘ल’ आणि ‘ळ’, श आणि ष यातला फरक ऐकू आला नाही, त्याचा वेगवेगळा उच्चार करता आला नाही, तर एक वेळ समजू शकेल. पण कार आणि खार, पार आणि फार, तार आणि थार ह्यांमधेही अमेरिकन किंवा युरोपीय लोकांना फरक करता येत नाही, कारण त्यांच्या भाषांमध्ये ‘क’ आणि ‘ख’, ‘प’ आणि ‘फ’, तसंच ‘त’ आणि ‘थ’ हे वेगळे ध्वनी नाहीत! कोणत्याही शब्दाच्या सुरवातीला k, p, t चा उच्चार हे लोक ‘ख’, ‘फ’ आणि ‘थ’ असाच करतात. आणि खरं म्हणजे अमेरिकन ‘t’ चा उच्चार आपल्या ‘त’ आणि ‘ट’ ह्या दोन्हींपेक्षा वेगळाच आहे. ‘ट’, ‘ठ’, ‘ड’, ‘ढ’, ‘ण’ आणि ‘घ’, ‘झ’, ‘ध’ आणि ‘भ’ तसंच ‘ळ’ हे ध्वनी त्यांना माहित नाहीत आणि म्हणूनच ते ऐकायलाही येत नाहीत. मग स्वतः ते उच्चारणं ही तर दूरची गोष्ट!
आपल्या भाषेतली लिंग म्हणजे मराठी शिकणारांसाठी एक प्रचंड मोठ्ठा खड्डा. त्यात मराठी शिकणारे आणि थोडं मराठी येणारे लोकही वारंवार पडतात. ते साहजिक आहे. अमेरिकन भाषेत तो तलाव, ती नदी, ते डबकं असा लिंगाचा भेदभाव निर्जिव गोष्टीत नाही! तसा तो आपल्या द्रविडी भाषांमध्येही नाही. युरोपीय भाषांमध्ये दोन किंवा तीन लिंग असतात, पण प्रत्येक भाषेत ती सारखी नसतात. म्हणजे आपण बागेला ‘ती बाग’ म्हणू, तर जर्मनमध्ये ‘तो बाग’ आहे. आपण ‘ती व्यक्ती’ म्हणतो तर हिंदीमध्ये ‘तो व्यक्ती’ म्हणतात.
परदेशी मुलांना अगदी सुरवातीला प्रश्न पडतो, की ‘माझं नावं’, माझी भाषा’, माझा देश’ हा फरक का आणि तो कसा ओळखायचा! म्हणजे अगदी पहिल्या प्रश्नापासूनच शिक्षक म्हणून आपली परीक्षाच सुरु होते! मग दुसरा प्रश्न ‘माझ्या नावाचा’, ‘माझ्या भाषेचा’, ‘माझ्या देशाचा’ मध्ये ‘नाव’चं ‘नावा’, ‘भाषा’चं ‘भाषे’ आणि ‘देश’चं ‘देशा’ असं रुप का बदलतं? मग सगळ्या उदाहरणांमध्ये ‘माझ्या’ हे एकच रूप तीनदा कसं येतं? आता मात्र आपल्याला घाम फुटायची वेळ येते! मग आपल्या असं लक्षात येतं की मराठीमध्ये “मी गातो”, “मी गाते”, अशी रूपेही बदलतात. म्हणजे मराठीत फक्त नामे, विशेषणे आणि सामान्यरुपेच बदलत नाहीत, तर क्रियापदाची रुपेही लिंग आणि वचनाप्रमाणे बदलतात. मराठीमध्ये वाक्यातले बहुतेक सगळे शब्द ‘चालतात’. उदाहरणार्थ : (पोलिसांनी प्रश्न विचारला, तेव्हा) “शेजारचा म्हातारा बिचारा गडबडला होता.” ह्या वाक्यात प्रत्येक शब्दाला पुल्लिंगी प्रत्यय लागलेला आहे!
आपण म्हणतो, “तो अनायसा आला आहे, तर बोलून घे त्याच्याशी” किंवा “तो इतक्या उन्हाचा कशाला आला?” किंवा “तो केव्हाचा थांबला आहे.” ह्या रचनांबाबत प्रश्न पडतो, की “तो अनायसा” किंवा “ती अनायशी”, की “येणं” अनायसं? “तो उन्हाचा” किंवा “ती उन्हाची”, की “येणं” उन्हाचं? “तो केव्हाचा” किंवा “ती केव्हाची”, की “थांबणं” केव्हाचं? म्हणजे ही सगळी क्रियाविशेषणे असूनही नामाप्रमाणे ‘चालतात’! ही तर मराठीची कमाल आहे!
आता “मी मुलगा आहे.” आणि “मला मुलगा आहे.” किंवा “पीटर पोहायला येतो.” आणि “पीटरला पोहायला येतं.” अशी वाक्यं बघितली की लक्षात येतं, की अरेच्च्या मराठीमध्ये “to have” हे क्रियापद नाहीच आहे! तसंच “can” किंवा “to know” साठी आपण वेगवेगळ्या रचना वापरतो. “मला आजी आहे.”, पण आपण “मला पुस्तक आहे” असं नाही म्हणत, तर “माझ्याकडे पुस्तक आहे” असं म्हणतो. आणि “माझ्याकडे आजी आहे” म्हटलं तर त्याचा अर्थ परत वेगळाच होतो!
आजी म्हणते “हातात बांगड्या आणि गळ्यात नीट काही तरी घालून जा” किंवा “त्याच्या अंगात सदरा नव्हता की पायात चपला नव्हत्या”. अशा विचित्र रचना बघितल्या की प्रश्न पडतो, बांगड्यात हात घाल की हातात बांगड्या? चपलेत पाय की पायात चप्पल घाल? अशा फक्त मराठीतच नाही, तर इतर भाषांमधेही काही तरी वैचित्र्यपूर्ण गमतीच्या रचना असतातच.   
“डोंगराच्या पायथ्याला / पायथ्याशी एक तलाव आहे”, अशी इथे दोन्ही प्रकारची वाक्यं होऊ शकतात. पण “आजीच्या पायाला शाल आहे”? तिथे “आजीच्या पायाशी शाल आहे” असंच म्हणावं लागेल. “गीताशी बोल” आणि “गीताला बोल” असा प्रत्याय बदलला की होतो अर्थाचा अनर्थ! “वाट पाहिली” आणि “वाट लागली”, “दम लागला” आणि “दम भरला” इथे अर्थात खूपच फरक पडतो! ह्या खेरीज मराठीची खासियत असलेली “अस” ह्या धातूची दोन प्रकारची रूपं. “आहे” आणि “असतं” ह्यातला फरक समजणं कर्म कठीण! आणि वापरतांना त्यात गोंधळच गोंधळ!
असा विचार करायला लागलो की लक्षात येतं की मराठीचं चलन-वलन इंग्रजी पेक्षा किती वेगळं आहे! इंग्रजीत आपण म्हणतो, “I like this.”, “I know this.” किंवा “I can do this.” मराठीत मात्र आपण “मला”नी सुरवात करतो. “मला हे आवडतं”, “मला हे माहित आहे” आणि “मला हे येतं.” आता इंग्रजीतल्या “break” ह्या क्रीयापादासाठी मराठीत अनेक पर्याय आहेत. बाटली/ बांगड्या फुटतात, चप्पल/सूत तुटतं, आपण फांदी/झाड/फुलं तोडतो, पत्र/नारळ फोडतो, खुर्ची/कंबर मोडते, कागद/कापड फाटतं, इत्यादी. ह्यात अदलाबादलीला फारसा वाव नसतो.  
मराठी शिकणारे लोक आपल्याला कित्येक गोष्टी लक्षात आणून देतात. “मी गेलो”, पण “मी अंघोळ केलो” चालत नही, तर “मी अंघोळ केली” असं म्हणावं लागतं! आपण म्हणतो, “सर्दी झाली”, “खोकला झाला”, पण “ताप झाला”? तिथे अर्थ एकदम बदलतो. अभिप्रेत असतं “तप आला”! आपण म्हटलं “गीताला सांगून टाक” तर शिकणारा विचारतो, “गीताला का टाकू?”. “सुरेश नकळत बोलून गेला” : “सुरेश कुठे गेला?”, “हे तू करून बघ” : “काय बघू?” आता द्या ह्याचं उत्तर!
आपण मराठीतल्या फक्त क्रियापदांचे प्रकार आणि त्यांची रूपे बघायचं ठरवलं तर कित्येक पानं भरतील! “तिच्याच्यानं बघवलं नाही”, “वाटल्यास आपण असं करू या”, “जमल्यास तुम्ही पण या म्हणावं “ किंवा “तो काही केल्या बोले ना” अशा वाक्यांमधल्या क्रियापदाच्या रूपाचं काय करायचं?
मराठीत क्रियापदांची संख्या इंग्रजी आणि इतर युरोपीय भाषांपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे आपण एकच क्रियापद तऱ्हतऱ्हेनी वपारतो. तसंच काही शब्दांबरोबर एक ठराविक क्रियापदच वापरतो. जसं, “भोकाड पसर”, “उसण भर”, “धारेवर धर”, “नियम पाळ”, “गाशा गुंडाळ”, “धापा टाक”, इत्यादी. अशी मराठीत असंख्य उदाहरणं आहेत. आता मराठीत “थंडी वाज” असंच का म्हणायचं, हे एखाद्याला कसं समजावून सांगणार?  
एका क्रियापदाचे वेगवेगळे उपयोग काही प्रमाणात अनेक भाषांमध्ये आढळतात. पण मराठीत कितीतरी क्रियापदांचे असंख्य उपयोग दिसतात. आपण काय काय मारतो? थप्पड मारतो, गप्पा मारतो, आपण डोळा, थाप (पाठीवर, खोटं बोलणं), बाता, चेंडू, दगड, गोळी (अंघोळीला, बंदुकीची), बाण, उडी, टोमणा,भुरका इत्यादी, इत्यादी मारत असतो! आपण शाळेला बुट्टीही मारतो! तसंच आपण काय काय बरं काढतो? केर काढतो, तिकीट काढतो, फोटो, चित्र, रेघ, रांगोळी, पैसे (खिशातून, खात्यातून, एखाद्याकडून वसूल करून), चहा (डब्यातून, मित्राकडून), शेंबूड, वचपा, गळा काढतो. ह्याशिवाय कोणावर तरी राग काढतो, कोणाची दृष्ट काढतो, इत्यादी, इत्यादी. परत “तो झाडावर चढून आंबे काढतो” आणि “मुलगा सगळी गोष्ट लिहून काढतो” हेही ‘काढ’चे दोन वेगवेगळे उपयोग आहेत. आपल्या “लाग” आणि “लाव” ह्या क्रियापदांचे कदाचित सगळ्यात जास्त वेगवेगळे उपयोग असतील. आता ‘लाव’ची एक गोष्ट बघू या.
आमच्याकडे एक अमेरिकन पाहुणी आली होती. मराठी शिकत होती.
एकदा आम्ही असंच बाहेरच्या खोलीत गप्पा मारत बसलो होतो. तिच्या आतमधल्या खोलीत दिवा तसाच चालू होता.
माझी बहीण काहीतरी कामाला उठली, तर ही तिला म्हणते “माझ्या खोलीतला दिवा लाव.”
आम्हाला कोणालाच काही कळलं  नाही, की ही असं काय म्हणतेय.
माझ्या बहिणीनं विचारलं, “काय करू?”
ती परत म्हणाली, “तिथला दिवा लाव.”
माझी बहीण म्हणाली, “म्हणजे बंद करू का?” तर ही म्हणाली, “हो. लाव.”
मग माझ्या बहिणीनं तिला समजावून सांगितलं, “अग, दिवा तर लावलेलाच आहे. तो आता ‘बंद कर’ असं सांगायचं.”
त्यावर ही म्हणते, “मग ‘दर लाव’ म्हणजे काय?”
तेव्हा आमच्या डोक्यात ट्यूब लागली. म्हणजे खरं तर आमच्या पाहुणीनं ती लावली!
‘दार लाव’, ‘खिडकी लाव’ मध्ये ‘लावणे’ म्हणजे ‘बंद कर’, पण ‘टी.व्ही. लाव’, ‘रेडिओ लाव’, मेणबत्ती लाव’, ‘दिवा लाव’ मध्ये ‘लावणे’चा अर्थ ‘सुरु कर’ असा बरोबर विरुद्ध अर्थी होतो!  
ह्याखेरीज झाकण लाव, पट्टी लाव, पाटी लाव, कुंकू लाव, भिंतीवर चित्र लाव, गाडी तिथे लाव, त्याला कामाला लाव, पुस्तकं नीट लाव, जुनी गाणी लाव, घड्याळ लाव, गजर लाव, पाणी लाव, बदली भरायला लाव, मलम लाव, भाजीला पीठ लाव, कपड्याला अस्तर लाव, त्याला  जरा फोन लाव, इत्यादी इत्यादी आहेच!
ह्या सगळ्या उदाहरणांमधून एक जाणवतं ते म्हणजे सगळ्या अभिव्यक्तीमध्ये भाषा आणि संस्कृतीचा फार घनिष्ट संबंध आहे. हा खरं तर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. मराठीच्या वापराबद्दल अजूनही असंख्य उदाहरणं देता येतील. आता शेवटची दोन उदाहरणं बघू या.
समजा ‘जोड्या लावा’ असं सांगून एका रकान्यात हिरवा, पिवळा, लाल, काळा, रंगीत असे शब्द दिले आणि दुसऱ्यात बुक्का, पितांबर, रांगोळी, कुंकू, चुडा असे शब्द दिले, तर आपल्या संस्कृतीशी अगदी चांगला परिचय झाल्याशिवाय ह्या जोड्या लावणं शक्य नाही. तसंच पुढच्या उदाहरणातही होईल. वरण-भात, पुरण-पोळी, चटणी-भाकरी, तूप-साखर, कांदा-पोहे, बटाटा-वडा, इत्यादी शब्द तोडून त्यांच्या जोड्या लावायला सांगता येईल.    
भाषेचा वापर हा हवामान, भौगोलिक परिस्थिती, सभोवतालचं वातावरण अशा अनेक गोष्टींशी निगडीत असतो. आपण भारतात पावसाची वाट बघतो. पाऊस आला की सर्वसाधारणपणे सगळ्यांना आनंद होतो. उन्हाचा ताप सहन होत नाही. आपण मराठीत अभिनंदनाचा, आनंदाचा, स्तुतीचा वर्षाव करतो. सुखात न्हातो, चिंब भिजतो. उलट पाश्चात्य देशात पाऊस नसला तर त्यांना बरं वाटतं. एखाद वेळी परिस्थिती होती त्याहून आणखी बिघडली, तर आपण “आगीतून फुफाट्यात” जाऊन पडतो, तर जर्मन लोक “पावसातून पन्हाळी”खाली जाऊन पडतात! सावली आपल्याला हवीशी वाटते. सावलीत आपण विसावतो. जर्मनमध्ये सावलीचा एक अर्थ मृत्युचं साम्राज्य असाही होतो. “झेनिथ” म्हणजे मध्यान्हीच्या सूर्य. जर्मनमध्ये “झेनिथ”वर स्थान मिळणं म्हणजे यशाचा अत्युच्च काळ. उन्हात जागा मिळणं म्हणजे आनंद. पण आपण तर शिक्षा म्हणून एखाद्याचं घर उन्हात बांधतो! शिवाय पावसातली प्रणयाराधना, विरहिणीची व्याकुळता पाश्चात्य लोकांना कळणं खूप अवघड आहे.
थोडक्यात काय, तर एखादी भाषा शिकवायची म्हणजे शब्द आणि व्याकरण ह्याच्या बरंच पलीकडे जाऊन विचार करावा लागतो. भाषेचा परिस्थितीनुसार योग्य वापर होतोय हे बघावं लागतं. मराठी शिकवतांना शिकता शिकता माझं “Learning Marathi as a foreign language” असं दोन भाग असलेलं पुस्तकही लिहून झालं! त्यात वर आलेले आणि इतरही अनेक प्रश्न लक्षात घेऊन त्यांचं समाधान शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठी भाषा शिकायला वाटते इतकी अवघड नाही. कोणीही तीस तासात देवनागरी लिपी, मराठीचे उच्चार आणि प्राथमिक वाक्यं शिकू शकतं, हे अनुभवावरून लक्षात येतं. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा इतिहास, साहित्य, समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर, संत साहित्याची परंपरा अशा बलस्थानांमुळे परकीय लोक किंवा परदेशस्थ भारतीयांची तरुण पिढी मराठी शिकायला उद्युक्त होते. असा आहे मराठीचा लौकिक!
नीती बडवे, पुणे
neetibadwe@gmail.com

Comments

  1. तुझं भाषेवरचं प्रभुत्व अफाट आहे. उदाहरणंसुद्धा समर्पक आिण मजेशीर आहेत. खूप मजा आली वाचायला.

    ReplyDelete
  2. लेख अनुभवी आणि चिकित्सक शिक्षकाची नजर बरोबर दाखवतो !!! मराठी अवघड आहे. पण नियम अपुरे आहेत का?

    ReplyDelete
  3. I always knew that in comparison to yours , my knowledge of Marathi is absolutely miniscule.
    पण तुझा हा blog वाचून माझ्या अज्ञानाच्या ज्ञानात प्रचंड भर पडली, म्हणजे, मला मराठीतलं किती कमी समजत -वाटतं त्यापेक्षा- ह्याची प्रकर्षाने (बरोबर आहे ना शब्द ?) जाणीव झाली. But it made an extremely interesting and enlightening reading nevertheless!
    I think Europeans/ Americans should find Marathi very difficult to learn / master.
    Kudos to you.

    ReplyDelete
  4. I always knew that in comparison to yours , my knowledge of Marathi is absolutely miniscule.
    पण तुझा हा blog वाचून माझ्या अज्ञानाच्या ज्ञानात प्रचंड भर पडली, म्हणजे, मला मराठीतलं किती कमी समजत -वाटतं त्यापेक्षा- ह्याची प्रकर्षाने (बरोबर आहे ना शब्द ?) जाणीव झाली. But it made an extremely interesting and enlightening reading nevertheless!
    I think Europeans/ Americans should find Marathi very difficult to learn / master.
    Kudos to you.

    ReplyDelete
  5. मराठीकडे परकीयांच्या नजरेतून बघीतल्यावर कळते किती अवघड आहे ती .. ती शिकवणे हे दुर्गम गड सर करण्यासारखेच आहे .. hats off to you ! किती interesting examples दिली आहेत ..

    ReplyDelete
  6. लेख वाचल्यावर त्यातल्या गमती जमती कळल्या.परभाषिकांना शिकवणे खरेच अवघड

    ReplyDelete
  7. मराठी शिकणे परभाषिक लोकांसाठी खरंच खूप अवघड असणार आहे.सुंदर लेख.

    ReplyDelete
  8. नीती, तू आमची जर्मन शिक्षिका म्हणून आम्हाला इतके भरभरून दिलेस.
    खरच मराठी परकीय भाषा म्हणून शिकायला व शिकवायला त्याहून अवघड आहे.

    ReplyDelete
  9. मराठी भाषेविषयी प्रेम व आस्था असणार्‍या प्रत्येकाने तुमचा हा लेख वाचला पाहिजे. मला तर हा लेख खूपच आवडला. यापूर्वीच वाचायला का नाही मिळाला असेही वाटले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वनिमविचार

भाषेचं रंग-रूप : भाषा, संकल्पना आणि संस्कृती

भारत आणि बहुभाषिकता