भाषा, भूगोल आणि भाषांतर
भाषा , भूगोल आणि भाषांतर नीती बडवे. भाषा आणि जीवन, १०:३, पावसाळा १९९२, पान ५१-५७ भाषांतरकाराची भूमिका भाषांतर म्हटले , की भाषांतरकाराची मध्यस्थाची भूमिका डोळ्यांसमोर येते. तो केवळ दोन भाषांमध्येच नव्हे , तर दोन भाषासमाजांमध्ये दोन संस्कृतीमध्ये मध्यस्थी करत असतो. काही भाषा त्यांच्या जडणघडणीच्या दृष्टीने किंवा त्यांच्या संस्कृतीच्या दृष्टीने एकमेंकाशी अधिक साधर्म्य असलेल्या किंवा एकमेकींशी दीर्घपरिचित असतात ; आणि त्यांच्यात माषिक सांस्कृतिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर घडत असते. उदारणार्थ , भारतीय भाषा: मराठी-कानडी , मराठी -गुजराती , पंजाबी-हिंदी , इत्यादी. परंतु काही भाषासमाज मात्र एकमेकांपासून भौगोलिकदृष्ट्या दूर आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक परके असतात. त्यांच्यांत विपुल देवाणघेवाणही होत नसते. ते भाषासमाज एकमेकांना बरेच अपरिचित राहतात. मराठी-जर्मन या भाषांचा संबंध असा आहे. अशा रीतीने भिन्न संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर विकसीत होणार्या दोन भाषांमध्ये मध्यस्थी करणार्या भाषांतरकाराची भूमिका काय असते ? भाषांतरकाराच्या दोन्ही भाषांशी आणि भाषासमाजांशी निकटचा संबंध असतो. ...