भाषेचं रंग-रूप : भाषा, संकल्पना आणि संस्कृती
भाषेचं रंग-रूप भाषा, संकल्पना आणि संस्कृती प्रास्ताविक खरोखर पाहाता भाषेचा आपल्या सभोवतालच्या जगाशी नैसर्गिक किंवा तार्किक काहीच संबंध नसतो. ध्वनींच्या जोडणीतून तयार झालेले शब्द, तसंच ते जतन करण्यासाठी निर्माण केले गेलेली लिपी हे एका भाषासमाजामधले संकेत (code) असतात. ह्यामुळे आपल्याला जाणवतं की भाषा म्हणजे माणसाच्या सर्जकतेचं प्रतीकच आहे. भाषा कशी निर्माण होते आणि तिचा वापर कसा केला जातो, ह्यावर शतकानुशतकं विचार चालू आहे. काही प्रमाणात आपण तिच्यात डोकावून बघू शकतो. पण म्हणून भाषेचं कोडं सुटलं आहे किंवा तिच्याबद्दलचं कुतूहल कमी झालं आहे, असं मुळीच नाही. विसाव्या शतकातल्या ६० आणि ७० च्या दशकांत एकूणच विविध क्षेत्रांत बरेच नवे सिद्धांत मांडले गेले. तसेच भाषेविषयी काही नवे मूलभूत सिद्धांत मांडले गेले. ‘भाषेतल्या घटकांचं एकमेकांशी नातं असतं. घटकांच्या ह्या नात्यामधे एक प्रकारचा ताण असतो. ह्या ताणामुळे भाषेच्या संरचनेचं संतुलन राखलं जातं. अशा रीतीनं भाषा ही एक स्वयंपूर्ण आणि स्वायत्त संरचना असते.’ ह्या फार्दिनांद द सोस्यूरच्या सिद्धांतानं नवीन विचारांचा पाया घातला....