वाचाकाची परिमिती
वाचाकाची परिमिती आपल्याला माहीत आहे की कोणतीही वापरातली भाषा आपण ऐकत, वाचत , बोलत आणि लिहीत असतो. लहान बाळ ध्वनी ऐकतं आणि मग ते उच्चारण्याचा प्रयत्न करतं. लहान मूल प्रथम अक्षरं बघतं आणि त्याप्रमाणे अक्षर काढण्याचा प्रयत्न करतं. एखादी नवीन भाषा शिकतांना आपण साहजिकच ती ऐकायला, वाचायला, बोलायला आणि लिहायला शिकतो. त्या भाषेत ऐकणं आणि वाचणं, तसंच बोलणं आणि लिहिणं ही चार कौशल्यं अवगत करून घेतो. त्यात नैपुण्य मिळवतो. ऐकणं आणि वाचणं ही आकलन किंवा ग्रहण करण्यासाठी लागणारी कौशल्यं आहेत. बोलणं आणि लिहिणं ही अभिव्यक्तीसाठी लागणारी म्हणजेच निर्मिती-कौशल्यं आहेत. भाषिक कौशल्यांमध्ये ग्रहण-आकलन कौशल्यांची प्राथमिकता महत्त्वाची आहे. प्रस्तुत लेखाचा विषय आहे ‘वाचक’. ‘वाचका’बद्दल सर्वसाधारणपणे फार कमी बोललं किंवा लिहिलं जातं. ह्या लेखाच्या पहिल्या भागात १९६० नंतरच्या दशकांत ‘वाचन’ आणि ‘वाचक’ याबद्दल युरोपात मांडल्या गेलेल्या काही विचारांचा थोडक्यात परामर्श घेतला आहे. दुस-या भागात आपल्याला परिचित अशा उदाहरणांचा उहापोह केला आहे. दुस-या महायुद्धानंतर १९६० च्या दशकात बहुतांश वसाह...