“आपण वाचू या” : सहायक क्रियापद ‘ये’ (भाग १)
“ आपण वाचू या ” : सहायक क्रियापद ‘ये’ (भाग १) प्रस्तावना मराठी ही नामप्रधान आणि नामानुसरी भाषा आहे . [1] मराठीत क्रियापदांची संख्या कमी आहे, पण धातुसाधितांची संख्या मोठी आहे. धातुसाधितांचा वैविध्यपूर्ण वापर हे मराठीचं एक वैशिष्ट्य आहे. तसंच अनेक क्रियापदांचा सहायक क्रियापदं म्हणून वापर हे मराठीचं दुसरं वैशिष्ट्य आहे. प्रस्तुतचा विषय आहे मराठीमधल्या ‘ये’ ह्या क्रियापदाचा सहायक क्रियापद म्हणून वापर आणि वाक्यरचना. सहायक क्रियापदं आपल्याला माहीत असलेल्या पुष्कळशा भाषांमध्ये सहायक क्रियापदं वापरली जातात. इंग्रजीत कालवाचक क्रियापदं (have, be) आणि इतर can, must, let, see, go अशी क्रियापदंसुद्धा सहायक क्रियापदं म्हणून वापरात आहेत. जर्मन भाषेमधेही सहायक क्रियापदं आहेत आणि त्यांचा वापर शैलीच्या दृष्टीनं महत्वाचा ठरतो. मराठीत सहायक क्रियापदं वापरून केलेल्या रचनांचं प्रमाण मोठं आहे. आपल्या रोजच्या बोलाण्यात अशा रचना वारंवार येतात. हिंदीत सहायक क्रियापदांचा वापर मराठीपेक्षाही जास्त असावा असं दिसतं. [2] मराठीमधली सहायक क्रियापदं १. मराठीमध्ये सहाय...