वाचाकाची परिमिती


वाचाकाची परिमिती
आपल्याला माहीत आहे की कोणतीही वापरातली भाषा आपण ऐकत, वाचत, बोलत आणि लिहीत असतो. लहान बाळ ध्वनी ऐकतं आणि मग ते उच्चारण्याचा प्रयत्न करतं. लहान मूल प्रथम अक्षरं बघतं आणि त्याप्रमाणे अक्षर काढण्याचा प्रयत्न करतं. 
 एखादी नवीन भाषा शिकतांना आपण साहजिकच ती ऐकायला, वाचायला, बोलायला आणि लिहायला शिकतो. त्या भाषेत ऐकणं आणि वाचणं, तसंच बोलणं आणि लिहिणं ही चार कौशल्यं अवगत करून घेतो. त्यात नैपुण्य मिळवतो. ऐकणं आणि वाचणं ही आकलन किंवा ग्रहण करण्यासाठी लागणारी कौशल्यं आहेत. बोलणं आणि लिहिणं ही अभिव्यक्तीसाठी लागणारी म्हणजेच निर्मिती-कौशल्यं आहेत. भाषिक कौशल्यांमध्ये ग्रहण-आकलन कौशल्यांची प्राथमिकता महत्त्वाची आहे.

प्रस्तुत लेखाचा विषय आहे ‘वाचक’. ‘वाचका’बद्दल सर्वसाधारणपणे फार कमी बोललं किंवा लिहिलं जातं. ह्या लेखाच्या पहिल्या भागात १९६० नंतरच्या दशकांत ‘वाचन’ आणि ‘वाचक’ याबद्दल युरोपात मांडल्या गेलेल्या काही विचारांचा थोडक्यात परामर्श घेतला आहे. दुस-या भागात आपल्याला परिचित अशा उदाहरणांचा उहापोह केला आहे.
दुस-या महायुद्धानंतर १९६० च्या दशकात बहुतांश वसाहती स्वतंत्र झाल्या आणि युरोपीय देश स्थिरस्थावर होऊ लागले. त्यावेळी मानव्य शास्त्रांमध्ये अनेक ‘इझम्सचा’, म्हणजे विचारप्रणालींचा उदय आणि प्रसार झाला; तसंच अनेक विषयांवर नवीन सिद्धांत मांडले गेले. त्यामध्ये समाजशास्त्रीय, भाषाशास्त्रीय आणि संज्ञापनशास्त्रीय (कम्युनिकेशन सायन्स) सिद्धांतनही मोडतं. त्या काळात चर्चा केल्या गेलेल्या अनेक ‘टर्न्स’पैकी ‘सोसिऑलॉजिकल टर्न’ आणि ‘लिन्ग्विस्टिक टर्न’ इथल्या संदर्भात महत्त्वाचे आहेत. ह्या वैचारिक कलाटण्यांनी एक नवीन वाट दाखवली.
नव्या विचारांचा साहित्यमीमांसाशास्त्रावर बराच परिणाम झाला. आत्तापर्यंत सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रकारच्या साहित्याचं विश्लेषण आणि समीक्षा ही लेखक-केंद्रित किंवा लेखक-प्रधान असायची. लेखक कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, हे महत्त्वाचे प्रश्न असायचे. लेखकाची बायॉग्राफी म्हणजे त्याचा जीवनपट, त्याची जडण-घडण ह्यांना महत्त्व दिलं जायचं. लेखकाला काय म्हणायचं आहे, हा प्रमुख मुद्दा असायचा. कधी कधी तर एखाद्या लेखकाच्या पुस्तकांपेक्षा त्या लेखकाचाच  दबदबा अधिक असायचा.
पण हळूहळू काही रशियन, जर्मन आणि फ्रेंच समाजशास्त्रज्ञ, भाषावैज्ञानिक आणि संस्कृतीशास्त्राचे तज्ज्ञ लोक विचारू लागले, की कोणतं पाठ्य वाड्मयीन आणि कोणतं अवाङ्मयीन, ह्याचे निकष काय? सर्व साहित्य हे लेखकाच्या दृष्टकोनातून का बघितलं जातं? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोठ्या साहित्यकृतीला एका व्यक्तीपेक्षा कितीतरी अधिक व्यापक संदर्भ असतात. कधी कधी आपल्याला लेखकांची नावंही नक्की माहीत नसतात. त्यांचा काळ माहीत नसतो. कधी कधी एकापेक्षा जास्त लेखकांचा ती साहित्यकृती किंवा संहिता तयार करण्यामध्ये हात असतो. त्यामुळे एखाद्या पाठ्याचा अर्थबोध (interpretation) ‘लेखकाला जे म्हणायचं आहे ते’ एवढाच मर्यादित असू शकत नाही.
एकाच कलाकृतीचं वेगवेगळ्या काळातले लोक वाचन करत असतात, ती समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच लेखकाखेरीज प्रत्येक साहित्यकृतीला आणखी दोन बाजू किंवा परिमिती असतात - पहिली म्हणजे लिहिणाऱ्याची किंवा सांगणाऱ्याची, दुसरी वाचणाऱ्याची किंवा ऐकणाऱ्याची, आणि तिसरी बाजू म्हणजे प्रत्यक्ष साहित्यकृतीची  – जसं पुस्तक, लेख, कविता इत्यादी; थोडक्यात ही तिसरी बाजू आहे पाठ्याची म्हणजे टेक्स्टची. तेव्हा लेखक, वाचक आणि पाठ्य ह्या प्रत्येक साहित्यकृतीच्या तीन परिमिती आहेत. लेखक हा निर्माता म्हणून महत्त्वाचा असला, तरी इतर दोन बाजूंचा किंवा परीमितींचाही विचार, अभ्यास, संशोधन व्हायला पाहिजे, असा विचार पुढे आला. 
पाठ्याचं महत्त्व वाढलं आणि त्याचं एक शास्त्र निर्माण झालं. ‘टेक्स्टलिंग्वीस्टिक्स’ अशी भाषाशास्त्राची एक शाखा निर्माण झाली. अमेरिकेमध्ये ‘क्लोज रीडिंग’ म्हणून अर्थबोधनाची एक पद्धत निर्माण झाली. ही पद्धती उचलून धरणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं, फक्त पाठ्याकडे लक्ष द्या, पाठ्याला काय सांगायचं आहे, ते बघा. पाठ्य समजण्यासाठी इतर आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करण्याची, माहिती मिळवण्याची गरज नाही. थोडक्यात म्हणजे ही पाठ्यकेंद्रित आकलन पद्धती होती. तसंच फ्रेंचांनी ‘आंतरपाठ्याचा’ म्हणजे intertextuality चा सिद्धांत मांडला. पण आपण इथे आत्ता पाठ्यलक्षी सिधान्तनाचा उहापोह करणार नाही, तर प्रामुख्यानं ‘वाचक’लक्षी मांडणीचा विचार करणार आहोत. 
लेखकाच्या पारंपारिक स्थानाला खरा शह दिला गेला, तो वाचकाच्या परीमितीचा विकास झाल्यामुळे. लेखक-केंद्रित संशोधन, विवेचन याविरुद्ध काही तज्ञांनी एकप्रकारे बंडच केलं. रोलाँ बार्थ (Roland Barthes) नावाच्या साहित्य आणि संस्कृतीशास्त्रज्ञाने तर १९६७ मध्ये एक निबंध प्रसिद्ध केला, त्याचं शीर्षक होतं “The Death of the Author”! अर्थात इतक्या टोकाच्या भूमिका फार टिकत नाहीत. आजही लेखकाचं महत्त्व सगळ्यांना मान्यच आहे. साहित्य समजण्यासाठी लेखकाची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. पण ह्या वीस-पंचवीस वर्ष चाललेल्या चर्चांमधून एवढं निश्चित निष्पन्न झालं, की साहित्यकृती केवळ लेखकाच्या दृष्टकोनातून न बघता प्रत्यक्ष पाठ्य आणि वाचक यांची बाजूही समीक्षकांनी, अभ्यासकांनी लक्षात घेतली पाहिजे.
हे इतर कालाक्षेत्रांनाही लागू होतं. म्हणून कलावस्तू निर्माण करणारा निर्माता (प्रोड्यूसर), घेणारा ग्राहक (रेसिपियंट) आणि कलाकृती (arte fact) ह्या तिन्ही बाजू आकलनाच्या आणि समीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत.   
त्या वेळी असा एक विचार मांडला गेला, की लेखक लिहितो, तेव्हा खरं तर साहित्यकृतीची निर्मिती होतच नाही. लेखनप्रक्रियेत अनेक मोकळ्या जागा असतात. वाचक त्या वाचनप्रक्रियेत भरून काढतो. म्हणून साहित्यकृतीची खरी निर्मिती ही वाचनातून होते. म्हणजे वाचन मूलतः निर्मितीक्षम, सर्जनशीलच असतं. म्हणून केवळ लेखकाच्या जडण-घडणी विषयी माहिती मिळवण्यापेक्षा वाचक कसा घडला, हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे पाठ्य समजण्यासाठी एका बाजूनं “Author’s intention” म्हणजे लेखकाचा उद्देश महत्त्वाचा, तर दुसऱ्या बाजूनं “Reader’s disposition” महत्वाची. म्हणजे वाचकाची पार्श्वभूमी आणि वाचक म्हणून त्याची पूर्वपीठिका, त्याची प्रकृती, त्याची वैचारिक-मानसिक तयारी, मनाची घडी (mind set), त्याची जडणघडण आणि अनुभवाची बैठक, अशा अनेक गोष्टींवर वाचकाचं वाचन आणि आकलन अवलंबून असतं. म्हणजेच प्रत्येक वाचक आपल्या परीनं, आपली मानसिकता आणि वाचक म्हणून आपली पूर्वतयारी, पूर्वज्ञान, ह्यानुसार पाठ्यातल्या रिकाम्या जागा भरत असतो किंवा ते पाठ्य परिपूर्ण करत असतो. 
ह्यातून तयार झाली एक ‘Reception Theory’, म्हणजे माणसं कोणतंही टेक्स्ट, पाठ्य कसं वाचतात, ग्रहण करतात, ह्या विषयीचं सिद्धांतन. सर्वसाधारणपणे साहित्याचा इतिहास लिहिला जातो किंवा साहित्यकोश तयार केले जातात, तेव्हा त्यामध्ये प्रामुख्यानं लेखकांच्या नोंदी असतात. पण आता म्हणजे विसाव्या शतकाच्या शेवटी नवीन दृष्टीकोन देणारी  Act of Reading”, “History of the Reader” सारखी पुस्तकं लिहिली गेली आणि गाजली. वाचन प्रक्रिया, वाचकाचे प्रकार आणि त्यांची वर्गवारी अशा विषयांवरही लिखाण झालं.
ह्याच काळात संज्ञापनशास्त्रही विकसित झालं आणि त्यामुळेही वाचकाच्या भूमिकेला बळकटी आली. संज्ञापन म्हणजे भाषिक देवाण-घेवाण किंवा भाषिक दळण-वळण. म्हणजे संदेश (मेसेज) हा मध्यभागी ठेवला, तर तो पाठवणारा माणूस एकीकडे आणि तो ज्याला मिळतो तो संदेश ग्रहण करणारा माणूस किंवा ग्राहक दुसरीकडे. ह्यांच्यामध्ये जे प्रेषण आणि ग्रहण होतं, ते म्हणजे संज्ञापन. पाठवणारा म्हणजे ‘प्रेषक’. मग तो बोलणारा असेल किंवा लिहिणारा असेल; आणि जो तो संदेश ‘प्राप्त’ (receive) करतो, तो  ग्राहक. मग तो ऐकणारा असेल किंवा वाचणारा असेल. ग्राहकानं संदेश ऐकून त्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतरच संज्ञापनाची एक कडी पूर्ण झाली असं मानलं जातं. थोडक्यात म्हणजे बोलणारा बोलत राहिला तर त्याला काहीच अर्थ नाही, त्याचा काहीच उपयोग नाही. त्याचं बोलणं दुसऱ्या माणसापर्यंत पोचलं आणि दुसऱ्याला ते समजलं, तरच बोलणाऱ्याच्या बोलण्याचा उपयोग आहे. म्हणून ह्या शास्त्रामध्ये संदेश कोणी पाठवला ह्यापेक्षा दुसऱ्या माणसापर्यंत तो कसा पोचला, त्यानं तो कसा ग्रहण केला, त्यावर काय प्रतिक्रिया दिली, हे महत्त्वाचं ठरतं. म्हणजेच संज्ञापानामध्ये ‘प्रेषका’पेक्षा ‘ग्राहका’ला जास्त महत्त्व आहे. कारण ग्राहकाच्या प्रतिक्रियेनंतरच संज्ञापन पूर्ण होतं.
त्याचप्रमाणे लेखकानं पुस्तक लिहून उपयोग नाही. जोपर्यंत एखादा वाचक ते वाचत नाही, तोपर्यंत त्या पुस्तकाचं जगाच्या दृष्टीनं अस्तित्वच नसतं. त्यामुळे लेखकापेक्षा वाचकाला जास्त महत्त्व प्राप्त होतं. तत्त्वज्ञानाच्या एका शाखेत मुलभूत विचार आहे, “तू मला बघतोस, महसूस करतोस, म्हणून मी आहे. नाही तर मला अस्तित्वच नाही.” तसं साहित्याचं अस्तित्वच मुळी वाचकावर अवलंबून आहे!
ह्या विवेचनानंतर दुस-या भागात आपण काही उदाहरणं बघू या.
एखादी कथा-कादंबरी वाचतांना किंवा अगदी एखादा वैज्ञानिक निबंध वाचतांना आणि समजून घेतांनासुद्धा प्रत्येक वाचक आपल्या मनातल्या प्रतिमा आणि संदर्भ चौकटी यांचा वापर करतच असतो. त्यामुळे प्रत्येक वाचकाच्या मनात उभं राहणारं चित्र थोडं वेगळं असतं. तिथे प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीला आणि निर्मितीक्षमतेला वाव असतोच. एक साधं उदाहरण पाहू. एखादी परीकथा वाचतांना किंवा ऐकतांना मुलं आपापल्या परीनं परीचं चित्र मनात रंगवतात. प्रत्येकाच्या मनातले रंग आणि रुप वेगळं असतं. पण हीच कथा मंचावर सदर केली, तर त्या मूर्त रूपामुळे कल्पनेला वाव कमी राहतो. बघितलेलं रंग-रूप मनात उतरतं आणि थिजतं. अशा वेळी वेगवेगळ्या वाचकांच्या मनातल्या परीच्या चित्रात फारसा फरक राहत नाही.  
आपण ‘वाचतो’ म्हणजे काय करतो? प्रथम अक्षरं किंवा शब्द डोळ्यांनी बघतो. मग त्यांच्या अर्थाची उकल करतो. ती कशी शक्य होते? आपण हे शब्द कित्येकदा ऐकलेले असतात, त्यांना संदर्भ असतो. त्यावरून आपण आपल्या मनात एक चित्र उभं करतो किंवा मत बनवतो. हे चित्र किंवा मत वाचक म्हणून असलेल्या आपल्या बैठकीवर, प्रकृतीवर अवलंबून असतं. आपले अनुभव, आपला विश्वास, आपली वैचारिक बैठक वगैरे अनेक गोष्टींवर ते अवलंबून असतं. एक अलीकडेचं  उदाहरण घेऊ या. कन्हय्या कुमारच्या भाषणाचा वर्तमानपत्रात गोषवारा आला होता. त्यावरच्या प्रतिक्रियांवरून लक्षात येतं, की वाचतांना प्रत्येक वाचकाच्या मनात वेगळे संदर्भ असतात. ‘reader’s disposition’ला - म्हणजे वाचकाची मनोधारणा, पूर्वपीठीका, अनुभव, इत्यादीला - अनुसरून प्रत्येक वाचकाच्या मनात एक वेगळं चित्र उभं राहतं आणि त्यातून वेगवेगळा अर्थ काढला जातो. कोणाला कन्हय्या कुमार प्रेरणादायी आणि स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता वाटतो, तर कोणाला देशद्रोही वाटतो. इतक्या विरुद्ध टोकाचं वेगळं आकलन, अर्थबोधन होऊ शकतं, हा आपला अनुभव आहे.
वाचका-वाचकांमधला फरक फारच जाणवतो तो एका भाषासामाजाच्या कक्षा ओलांडल्यावर. आपण परभाषेतलं पुस्तक वाचतो तेव्हा आपण आपल्या भाषासामाजातली आणि संस्कृतीतली प्रतिमा-प्रतिकं नकळत संदर्भासाठी घेत राहतो. आपल्या भाषासामाजाची प्रकृती, विचार करण्याची पद्धत, अनुभवाची पार्श्वभूमी यातून आपल्यामधला वाचक घडत असतो.
एक उदाहरण थोडक्यात बघू या. पु. ल. देशपांड्यांनी “तीन पैशाचा तमाशा” हे ब्रेश्तचं नाटक जर्मन मधून मराठीत आणलं. कोणताही भाषांतरकार हा प्रथमतः प्रायः परभाषेतल्या संहितेचा वाचक असतो आणि मग तो त्या संहितेचं दुसऱ्या भाषेत, म्हणजे सर्वसाधारणपणे स्वभाषेत पुनर्गठण करतो. पु. ल. देशपांड्यांची ‘वाचक’ म्हणून बैठक (disposition) कशी होती? आणि त्यांनी ज्या वाचकवर्गासाठी हे नाटक लिहिलं, ते आपण सर्व - वाचक / प्रेक्षक / ग्राहक म्हणून आपली बैठक कशी आहे? तर ब्रेश्त आणि त्याच्या जर्मन भाषक वाचकांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, हे ह्या मराठी नाटकातून वेळोवेळी दिसतं.
ब्रेश्तचा हेतू आणि त्याच्या नाटकाचं प्रयोजन निश्चित होतं. प्रेक्षकानी प्रसंगाशी एकरूप न होता सादर केलेल्या घटनांवर दोन्ही बाजूंनी विचार करावा, ही त्याच्या ‘एपिक थिएटर’ची मूळ अपेक्षा. माणूस परिवर्तनशील असतो आणि परिवर्तन घडवून आणलंच पाहिजे, असं त्याचं ठाम मत होतं. वर्गविग्रहावर आणि दैवावर मात करून साम्यवादी समाजाची निर्मिती हा केंद्रिभूत विचार होता. त्यासाठी नाटक हे एक साधन होतं.
“थ्री पेनी ऑपेरा” ह्या मूळ शीर्षकातला उपरोध “तीन पैशाचा तमाशा” ह्या शीर्षकामुळे नाहीसा होतो. ऑपेरा म्हणजे अति श्रीमंती, प्रतिष्ठित समजला जाणारा नाटयप्रकार आणि तो तीन पैशाचा! ही विसंगती मराठी नाटकाच्या सुरवातीलाच हरवून जाते. गरीब-श्रीमंत ह्यातला बोचक विरोध जाणवत नाही. ह्या नाटकातली मुख्य पात्रं अंकुश (मॅक) आणि भंडारे (ब्राऊन) हे जर्मन नाटकात युद्धामध्ये खांद्याला खांदा लाऊन लढलेले मित्र असतात, तर मराठी नाटकात ते एका क्रिकेट टीममध्ये असतात. मराठीत नाटकात युद्धाचा संदर्भच येत नाही. आपण महाराष्ट्रामध्ये तीन शतकात युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाही. युद्धातला संहार जर्मन लोकांनी बघितला तसा तो आपण बघितलेला नाही.
ब्रेश्तच्या नाटकातली गाणी ही प्रेक्षकाला थेट संदेश देणारी असतात. “तोफांचे गाणे”, “तीन पैशाची” तीन गाणी, ज्यामध्ये श्रीमंतांची माजोरी आणि युद्धातले अत्याचार असे विषय आहेत, ती मराठीमध्ये पूर्णपणे गाळली आहेत. दोन महायुद्धांच्या मधल्या काळात हे जर्मन नाटक लिहिलं गेलं. त्या वेळच्या जर्मनीतल्या राजकीय आणि सामाजिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि साम्यवादी विचारप्रणालीवर आधारित हे नाटक समाजातली असमानता दूर करण्याचा संदेश देते. जर्मन नाटकात राणीच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी काढलेल्या एका फतव्यामुळे अंकुशची फाशी रद्द होते. उच्च पदास्थांच्या मर्जीवर लोकांचं जीवन कसं अवलंबून आहे, हे ह्यातून दिसतं. उलट, मराठी नाटकात नारायण नावाचा जेलर देवाच्या रूपात अवतरतो आणि चमत्कारपूर्ण रीतीनं अंकुशला वाचवतो! हे मराठी समाजाच्या प्रकृतीला धरून असलं तरी ब्रेश्तच्या नाटकात देव आणि चमत्कार म्हणजे त्याच्या हेतूचा आणि विचारांचा मोठा विपर्यासाच आहे! म्हणजे जर्मन लेखक आणि वाचकाच्या दृष्टीनं सगळ्यात अग्रस्थानी असलेले कळीचे मुद्दे मराठीत येतंच नाहीत.
“तीन पैशाचा तमाशा” हे मराठी नाटक करमणूकप्रधान आहे आणि मराठी वाचक-प्रेक्षकाच्या प्रकृतीला रुचेल असंच आहे. पण त्यात ब्रेश्त आणि त्याचा संदेश मात्र हरवलेला आहे. आपण जसे घडलो आहोत, त्या आपल्या मधल्या वाचकाच्या बैठकीला भावणारं असं हे एक यशस्वी नाटक आहे.
हे नाटकच काय, पण टी.व्ही.वरचे सर्व कार्यक्रम, विशेषतः मालिका, ह्या प्रेक्षकाला / ग्राहकाला अनुलक्षूनच (टी.आर.पी.!) असतात. ह्यातून आज वाचक/प्रेक्षक/ग्राहकाचं स्थान कसं प्रभावी होत चाललं आहे, ते आपल्या लक्षात येतं! वाचकाची किंवा ग्राहकाची परिमिती जाणून घेणं हे आज आवश्यकच आहे. ह्या परीमितीमुळे आपण एखादी कलाकृती एका नव्या परिप्रेक्षातून बघू शकतो.  

Comments

  1. तुझ्या लेखातून खूप नवीन माहिती मिळाली. जर्मन भाषेतील नाटक पुलंनी त्याचा आत्मा कसा गमावला हे छान मांडले आहेस.
    टीव्ही, इंटरनेट, आदी माध्यमातून कला आस्वादाचे लोकशाही करण झाले आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वनिमविचार

भाषेचं रंग-रूप : भाषा, संकल्पना आणि संस्कृती

भारत आणि बहुभाषिकता