भाषा, भूगोल आणि भाषांतर
भाषा, भूगोल आणि भाषांतर
नीती बडवे. भाषा आणि जीवन, १०:३, पावसाळा १९९२, पान
५१-५७
भाषांतरकाराची भूमिका
भाषांतर म्हटले,
की भाषांतरकाराची मध्यस्थाची भूमिका डोळ्यांसमोर
येते. तो केवळ दोन भाषांमध्येच नव्हे, तर दोन भाषासमाजांमध्ये दोन संस्कृतीमध्ये
मध्यस्थी करत असतो. काही भाषा त्यांच्या जडणघडणीच्या
दृष्टीने किंवा त्यांच्या संस्कृतीच्या दृष्टीने एकमेंकाशी अधिक साधर्म्य असलेल्या
किंवा एकमेकींशी दीर्घपरिचित असतात; आणि त्यांच्यात माषिक सांस्कृतिक देवाणघेवाण
मोठ्या प्रमाणावर घडत असते. उदारणार्थ, भारतीय भाषा: मराठी-कानडी,
मराठी -गुजराती,
पंजाबी-हिंदी,
इत्यादी. परंतु काही भाषासमाज मात्र एकमेकांपासून
भौगोलिकदृष्ट्या दूर आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक परके असतात. त्यांच्यांत विपुल देवाणघेवाणही
होत नसते. ते भाषासमाज एकमेकांना बरेच अपरिचित राहतात. मराठी-जर्मन या भाषांचा संबंध
असा आहे.
अशा रीतीने भिन्न संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर
विकसीत होणार्या दोन भाषांमध्ये मध्यस्थी करणार्या भाषांतरकाराची भूमिका काय असते?
भाषांतरकाराच्या दोन्ही भाषांशी आणि भाषासमाजांशी
निकटचा संबंध असतो. त्यातली एक सामन्यत: त्याची मातृभाषा असते. आणि एक परभाषा. भाषांतरे
ही बव्हंशी परभाषेतून स्वभाषेत केली जातात. म्हणजे प्रो. झोन्थायमरसारख्या जर्मन विद्वांनानी
मराठी जर्मनमध्ये भाषांतरे केली आहेत. तर बरेच जर्मन भाषेचा अभ्यास करणारे मराठी भाषक
जर्मन साहित्य आणि विचार मराठीत आणत आहेत.
भाषांतरप्रक्रियेचे स्पष्ट असे दोन भाग
पडतात : ‘ग्रहण आणि प्रेषण’. म्हणजेच संज्ञापनविज्ञानाच्या परिभाषेत
भाषांतरकार हा एकाच वेळी ग्राहक आणि प्रेषक असतो. तो ग्रहण करतो ते परभाषेतल्या साहित्याचे;
आणि प्रेषण करतो ते स्वभाषेत आणि स्वभाषक
ग्राहक-वाचकांसाठी. परभाषेतल्या वेच्यांची उकल करताना मातृभाषेतल्या संदर्भरचना भाषांतरावर
ठसा उमटवत असतात. म्हणूनच पुनर्गठनामधे त्यांचा सूर कुठेतरी बदलून जात नाही ना,
याची खबरदारी भाषांतरकाराला घ्यावी लागेल.
चिन्हांतरणाच्या मर्यादा
एखाद्या वाङ्मयीन कलाकृतीचा ग्रहणविचार
तीन पातळ्यांवर करावा लागतो. पहिली माषिक पातळी, दुसरी घटनानुक्रमाची आणि तिसरी भाषाबाह्यसंदर्भाची.
प्रस्तुत विवेचनात प्रामुख्याने विचार करायचा आहे तो भाषाबाह्य संदर्भाचा.
वस्तू, कल्पना, संकल्पना यांसाठी एका भाषेत ठराविक चिन्हे
वापरली जातात. त्यांच्यासाठी दुस-या भाषेतली चिन्हे वापरली की ‘भाषांतर
झाले’, असे समजणे तितकेसे संयुक्तिक ठरणार नाही.
आता काही भाषांमध्ये काही वस्तू, संकल्पना चिन्हांकित झालेल्या असतात. आणि
दुस-या भाषासमाजात या वस्तू किंवा संकल्पनांची जाणवी नसते. उदाहरणार्थ,
मराठीतल्या भाकरी,
खरकटे, जानवे, वटपौर्णिमा,
मारूतीचा शेंदूर,
मंगळागौर,
सोवळे अशा मराठीत रूळलेल्या अनंत संकल्पनांना
जर्मन भाषेत प्रतिशब्द नाहीत. म्हणून जर्मन भाषिक चिन्हे वापरून हे शब्द भाषांतरित
होऊ शकत नाहीत. पण अशा मूलभूत उदाहरणांपुरताच हा भाषिक चिन्हांतराचा प्रश्न मर्यादित
नाही; तर ज्या वस्तू संकल्पनांना मराठी आणि जर्मन
दोन्ही भाषांमध्ये भाषिक चिन्हे आहेत, तिथेही भाषांतराचा प्रश्न भाषिक चिन्हांतरणाने
दरवेळी सहज सुटण्यासारखा नसतो. कारण प्रत्येक भाषिक चिन्ह हे केवळ एखाद्या ‘वस्तू’
साठी किंवा ‘संकल्पने’साठी वापरलेले नसते, तर भाषिक चिन्हे ही ‘निर्देशक’
म्हणून वापरली जातात. ती प्रासंगिक,
सामाजिक, ऐतिहासिक,
वैयक्तिक,परिस्थितिजन्य अशा अपनेक संदर्भाकडे निर्देश
करत असतात. यासाठी मराठी आणि जर्मन अशा दोन्ही संस्कृतींना परिचित अशा वस्तू ,
संकल्पना,
भावभावना,
प्रसंग यांची उदाहरणे घेऊन भाषांतरात भाषिक
चिन्हांचे स्थान काय आणि त्यांचा वापर कसा करावा लागतो हे पाहणे रंजक ठरेल.
निसर्ग, ऋतू, सूर्य, ऊन, पाऊस, घर, घरातल्या वस्तू,
नदी, पूल या संकल्पना काही केवळ एका भाषेशी निगडित
अशा नाहीत. या संकल्पना मराठी आणि जर्मन दोन्ही भाषांमध्ये भाषिक चिन्हांनी अंकित आहेत.
तरी त्यांच्या वापरावर भाषांतर करताना मर्यादा येऊ शकतात. (या ठिकाणी व्याकरणातल्या
पदविन्यास किंवा वाक्यविन्यासाला धरून पडणा-या मर्यादांचा ऊहपोह केलेला नाही. उदाहरणार्थ, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’
ही कुसुमाग्रजांची कविता जर्मन मध्ये भाषांतरित
करताना सुरवातीला अडचण येते कारण पृथ्वी आणि सूर्य हे दोन्ही शब्द जर्मनमध्ये स्त्रीलिंगी आहेत!)
भाषाबाह्य संदर्भ
कित्येकदा असे दिसते,
की पद आणि पदबंधाची शब्दश: भाषांतरे करता
येत नाहीत. त्याचे कारण परभाषेत त्यांना प्रतिशब्द नसतात असे नाही, तर परभाषेतल्या
त्या प्रतिशब्दांना भाषाबाह्य संदर्भांचे आपल्याला अपरिचित असे एक वेगळेच आवरण असते. उदाहरणार्थ,
आपण मराठीत म्हणतो, ‘तिच्या भावनांचा ओलावा जाणवला’. ‘भावनांचा
ओलावा’
हे इथे होकारात्मक आणि त्या व्यक्तीबद्दल
वाचकांमध्ये सहानुभूती निर्माण करणारे वर्णन आहे. जर्मन भाषेमध्ये ‘भावना’
आणि ‘ओलावा’ यांना प्रतिशब्द आहेत. परंतु त्यांची जोडणी
या संदर्भात केली जाणार नाही. जर्मन भाषेत हाच आशय ‘भावनांची ऊब’
म्हणून व्यक्त केली जाईल.
भारतासारख्या विषुववृत्तीय देशात उन्हाचा
तडाखा असा जाणवतो,
की पावसाचा शिडकावा,
ओलावा, गारवा, हा हवाहवासा वाटणारा आणि म्हणून प्रत्यक्ष
जीवनात,
तसेच साहित्यात,
कथा-कादंब-यांमध्ये आल्हाददायक वातावरण,
मनाची उत्सुकता,
आनंद, गोष्टीतले होकारात्मक वळण सूचित करण्यासाठी
वापरला जातो. याविरूद्ध जर्मनीसारख्या थंड प्रदेशात सूर्यप्रकाश,
ऊन आणि ऊब या गोष्टी अभावानेच मिळतात. बर्फ
पडत नसले तरी पाऊस पडत असतो. थंडी, गारठा,ओलावा यांनी जीव नकोसा होतो. त्यामुळे ‘ऊब’
या शब्दाला विशेष अर्थ आणि संदर्भ प्राप्त
होतात. त्यामुळे त्यांच्या होकारात्मक भावनांचे वर्णन ‘ओल्या भावना’ न होता ‘उबदार
भावना’
असेच होऊ शकते.
शिवाय आपल्याकडे एखाद्याच्या वागण्यात,
बोलण्यात,
स्वगात करण्यात ‘कोरडेपणा’
असतो. तिथे तो अधिक ‘थंडपणा’
मधून व्यक्त होतो. अर्थात भावनांचा थंडपणाही
आपल्याला क्वचित जाणवतो, तशीच मायेची आणि पदराखालची ऊबही आपण जाणून आहोत. ‘प्रेमाची
आग’
मात्र वैश्विक असावी; ती भौगोलिक,
राजकीय, वांशिक असे भेदभाव जाणत नाही!
या संदर्भात जमर्नमधले काही वाक्प्रचार
लक्षात घेण्याजोगे आहेत. ‘Vom Regen unter die Traufe’ याचा शब्दश: अर्थ ‘पावसातून पन्हळीखाली’
असा होतो. म्हणजे तिथे भिजत होता,
म्हणून निवारा शोधायला गेला. आडोशाला उभा
रहिला,
तर पन्हाळीच्या पाण्याचा डोक्यावर अभिषेक
होऊ लागला. ही म्हण आपल्याकडे भाषांतरित करताना मातर ‘आगीतून निघून फुफाट्यात’
अशी करावी लागेल! म्हणजे शब्दश: बघितले,
तर विरूद्ध अर्थाच्या शब्दांनी! हा मराठी
वाक प्रचार जर्मनमध्ये भाषांतर करून वापरावा लागला. एक शेतकरणीला पावसा अभावी रखरखीत
उन्हात येणा-या एकामागे एक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. तिथे मी ‘पावसातून पन्हळीखाली’
ही म्हण वापरू शकत नव्हते!!
शब्दीतील आशय
तर भाषांतर करताना शब्दांचे अर्थ जाणून घेऊन दुस-या
भाषेतल्या समानार्थी शब्दांच्या सहाय्याने भाषांतर करणे हे मार्ग वाङ्मयीन वेच्याचा
किंवा पाठ्याचा अर्थ परभाषेत विदित करण्यासाठी पुरेसा पडत नाही. तापलेल्या जमिनीवर
पहिल्या पावसाचा शिडकावा, आसुसल्या धरतीची तृप्ती,
तो हवाहवासा वाटणारा मृद्गंध,
वातावणातला आल्हाद,
स्त्रीपुरूषांमध्ये जागी होणरी नैसर्गिक
उत्सुकता,
अशात होणारी प्रणयोत्सुक,
मीलनोत्सुक मानसिकतेच्या अभिव्यक्ती यांतील
कार्यकारणभाव,
तसेच निसर्ग, मानवी मन आणि वाङ्मय यांचे
परस्परसंबंध भारतीय किंवा मराठी मनात रूजलेले असतात. याची उदाहरणे आपल्याला मेघदूतापासून
समकालीन वाङ्मयापर्यंत सात्यताने सापडतात.
मेघोलोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्ति चेत:
कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे॥3॥
(मेघदुत)
किंवा साध्या ओळी:
रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुपेलाही पूर चढे
पाणिच पाणी चहूंकडे
ग बाई, गेला मोहन कुणीकडे॥
ह्या शब्दांचं एकवेळ भाषांतर करता येईल;
पण पावसानंतर निर्माण होणा-या वातावरणातली ही विरही मनाची व्याकुळता,
उत्सुकता,
उत्कंठा भाषिक पुनर्रचनेतून जर्मन मनापर्यंत
पोहोचवणे कसे शक्य होईल?
मराठी भाषेच्या अभिव्यक्ती आणि प्रतिमांमध्ये
पावसाला किंवा भिजण्याला एक वेगळेच महत्त्व आहे. मराठीमध्ये आपण सुखात किंवा आनंदात
‘न्हाऊन’
निघतो. प्रेमाच्या वर्षावाने चिंब भिजतो.
जर्मनमध्ये मात्र एखादा माणूस सुखात ‘न्हाऊन’ नव्हे तर ‘तापून’ निघतो! सर्वसाधरणपणे जर्मन शब्दप्रयोगात
‘सूर्य’चा संदर्भ आनंद, सुख,
यश यांच्या अभिव्यक्तीसाठी वापरला जातो.
प्रकाश आणि अंधार हे विरूद्ध अर्थी शब्द आपल्याकडेही चांगले आणि वाईट निर्दिष्ट करण्यासाठी
उपमा म्हणून वापरले जातात. त्यामुळे जर्मन किंवा इंग्रजी शब्दप्रयोग आपल्याला पटकन
कळतात. पण तसे ते मूलत: मराठीत वापरण्याची पद्धत नाही. एखाद्या गोष्टीची sunny side (जर्मन:sonnige Seite) किंवा ein
sonniger Mensch म्हणजे हसरा आनंदी उत्साही माणूस, Sommer des Lebens म्हणजे summer of
life
याचा अर्थ अत्युच्च यशाचा सुखाचा सुवर्णकाळ
वगैरे. Ein Platz an der Sonne म्हणजे जिथे सूर्य असेल तिथे स्थान मिळणे.
याचा अर्थ सुख आणि यशप्राप्ती असा होतो.
या पार्श्वभूमीवर ‘एखाद्याचे घर उन्हात बांधू’ची आठवण होते. याचे शब्दश: भाषांतर केले
तर जर्मन वाचकाला ती शिक्षा न वाटता एखादे मोठे मानचिन्ह किंवा पारितोषिक वाटेल!
आपण मराठी माणसे उन्हातली जागा न शोधता
सावलीतली जागा शोधत असतो. जशी आपल्याकडे मायेची ऊब आहे,
तशीच मायेची पाखरही आहे. सावली,
अनातप, छाया या शब्दांमद्ये जो सामाजिक आशय भरलेला
आहे तो थंडावा,
निवारा,सुरक्षितता देणारा अशा अर्थाचा आहे. जर्मनमध्ये
Schattenreich म्हणजे मृत्यूचे साम्रज्य, Schatten या शब्दाचा अर्थ सावली,
तसा सावटही करावा लागतो.
याखेरीज भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणावरून
निर्माण झालेले शब्दप्रयोग किंवा प्रतिमा कधी कधी अशा असतात,
की त्यावरून परभाषकाला काहीच बोध होऊ शकत
नाही. अशा प्रतिमा भाषांतरित होऊ शकत नाही. त्यांची वर्णने करावी लागतात. उदाहरणार्थ, die kalte Miete म्हणजे थंड भाडे. घर गमर
करण्यासाठी लागणारा खर्च यात समाविष्ट नाही. हीटर चे पैसे वेगळे द्यावे लागतील. इच
schlafe kalt म्हणजे मी थंड झोपतो. रात्री हीटर चालवत नाही. kalte Kueche म्हणजे थंड
स्वंयपाकघर किंवा जेवण. Man isst zu Abend kalt म्हणजे तिथे संध्याकाळी थंड जेवतात.
हे खरं आहे! जर्मनीत सर्वसाधारणपणे संध्याकाळी स्वंयपाक करण्याची, काही शिजवण्याची
पद्धत नाही. संध्याकाळी ब्रेड, सॉसेजेस्, बीयर असे थंड खाल्ले जाते.
याशिवाय Das ist kalter Kaffee म्हणजे आपल्याला
अभिप्रेत ‘कोल्ड कॉफी’ नाही, तर कॉफी ही खरं तर गरम पिण्याची गोष्ट
आहे. इथे ‘थंड झालेली कॉफी’ म्हणजे अनुषंगाने शिळी बातमी,
कंटाळवाणी,
स्वारस्य न वाटण्यासारखी गोष्ट. kalter
Schweiss म्हणजे भीतीने थंड घाम फुटणे. अशा वेळी फुटलेला घाम मराठीमध्ये ‘थंड’
करून भीतीची तीव्रता वाढवता येत नाही!
‘थंड’
हे विशेषण जर्मन भाषेत नकारात्मक वर्णनासाठी
किंवा भीती भयानकता दाखवण्यासाठी पुष्कळदा वापरले जाते. ‘कोल्ड वॉर’, ‘कोल्ड ब्लडेड्’
किंवा ‘कोल्ड मर्डर’
हे शब्द प्रयोग आपल्याला इंग्रजीद्वारा
परिचित आहेत.
प्रतिमांची संदर्भचौकट
आपण वर बघितल्याप्रमाणे प्रत्येक भाषा ही
सभोवतीचे जग आपल्या नजरेतून बघत असते. त्या त्या भाषेला दिसणारे जग त्या भाषेमध्ये
विशिष्ट पद्धतीने अभिव्यक्त होत असते. म्हणूनच त्या त्या भाषासमाजापुरती ही वास्तवता
तशा प्रकारे अस्तित्वात असते. वाङ्मयीन कलाकृतींना या भाषासमाजाच्या चौकटीतल्या वास्तवतेचा
संदर्भ असतो. हे संदर्भ भाषांतरकाराला नजरेआड करून मुळीच चालत नाही. कारण त्यातूनच
वाङ्मयीन कलाकृतीतल्या संस्कृतिनिष्ठ किंवा भाषासमानिष्ठ संदर्भचौकटी किंवा प्रतिमा
तयार होत असतात.
प्रत्येक वाचक किंवा ग्राहक परभाषेतल्या
प्रतिमांचा मेळ आपल्या भाषेतल्या समाजसंस्कृतिनिष्ठ संदर्भचौकटींशी घालण्याचा प्रयत्न
करत असतो. त्यामूळे भाषेचे ग्रहण किंवा पुनर्गठन करताना निरनिराळ्या सांस्कृतिक आणि
व्यव्हारिक जाणिवा (pragmatic aspects) एकमेंकावर आदळून त्यात संघर्ष निर्माण होण्याची
शक्यता असते. त्यामुळे भाषांतरकाराला पुनर्गठनापूर्वी स्वभाषेतल्या ग्राहकांपुढे कोणता
मुद्दा कशा रितीने पोहोचवायचा, हे ठरवावे लागते.
म्हणजेच मूळ लेखकाने काय म्हटले आहे,
यापेक्षा त्यातून त्यला काय म्हणायचे आहे,
याचे भाषांतरकाराला भान ठेवावे लागते. म्हणजे
शब्दश: किंवा मूळ पाठ्याच्या बरहुकूम भाषांतर, या कल्पनेला मुरड घालवी लागते. पण म्हणून
आपले आशय किती मिसळायचे आणि स्पष्टीकरणात्मक पुष्टी जोडायची की नाही,
याचा समतोल राखणे ही तारेवरची कसरत असते.
ही कसरत करण्याचा प्रसंग जर्मन-मराठीसारख्या भिन्न संस्कृतीमध्ये मध्यस्थी करणा-या
भाषांतरकारावर जास्त वेळा येण्याची शक्यता असते.
कादंबरीतल्या दोन व्यक्तिरेखा किंवा पात्रे
एकमेंकाना काय म्हणताहेत यापेक्षा त्यांद्वारे लेखकाला वाचकापर्यंत काय पोचवायचे आहे,
ते अधिक महत्त्वाचे ठरते. हे अनेक निर्देशकांद्वारे
लेखक वाचकांपर्यंत पोहोचवत असतो.
संज्ञापक निर्देशक (communicative indicators)
पुष्कळदा शब्द हे त्यांच्या शाब्दिक अर्थांच्या
मर्यादेत न वापरता संज्ञापक निर्देशक म्हणून वापरलेले असतात. अशा शब्दांमध्ये काही
जीवनानुभव,
साभाजिक परिस्थिती,
राजकीय घडामोडी,
ऐतिहासिक संदर्भ असे सामावलेले असतात. की
ते शब्द भाषांतरित करूनही अभिप्रेत संदर्भजग त्यातून निर्माण होऊ शकत नाही.
उदाहरणार्थ,
सतीश आळेकरांच्या एका गाजलेल्या एकांकिकेत, ‘झुलता पूल’मध्ये सुरूवातीला एक तरूण एका
तरूणीला विचारतो, ‘अहो तुमच्याकडे प्रेशर कुकर आहे का?’ हा प्रश्न सुरूवातीला अनपेक्षित आणि निरर्थक
(absurd) वाटतो.हा प्रश्न जर्मन भाषेत भाषांतरित करणे काहीच अवघड नाही. पण शाब्दिक
भाषांतरातून मूळ भाषेतले सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आणि त्या शब्दांचे तिथे उपयोजन
करतानाच अनुस्यूत ‘निर्देशांक’ हा भाषांतरित होऊ शकत नाही. ‘प्रेशर कुकर’
हा इथे जीवनमानाचा आणि विशिष्ट जीवनपद्धतीचा
निदर्शक म्हणून वापरला आहे. तो तरूण त्या मुलीला पुढे एकदा म्हणतो ‘मला तुमच्याकडे
पाहून वाटलंच होतं की तुमच्याकडे प्रेशर कुकर, फ्रीज वगैरे असणार म्हणून. ‘तुम्ही नदीच्या
पलीकडे’
रहात असणार,
वडलांची गाडी,
तुमची स्कूटर,
आईची कल्बमध्ये रमी.’
म्हणजे ‘प्रेशर कुकर’
या शब्दांत त्याला जीवनाचे हे संबंध चित्र
अभिप्रेत होते.
ती मुलगी त्याला विचारते, ‘हेवा वाटतो का?’ त्यावर तो म्हणतो, ‘लक्ष्मीछाप पितळी कुकरला कधी प्रेशर कुकरचा
हेवा वाटतो का?
कारण दोन्हीतही वाफ कोंडते.’
म्हणजे ‘प्रेशर कुकर’
आणि ‘लक्ष्मीछाप पितळी कुकर’च्या संघर्षामधला
हा झुलता पूल भाषिक चिन्हांतरणातून जर्मनमध्ये कितपत उतरू शकेल. असा विचार पडतो.
म्हणूनच दोन भिन्न संस्कृतीमधले वेचे भाषांतरित
करताना भाषिक पातळीच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो.
भाषा आणि भाषाकृती (speech act)
भाषांतर करताना काय भाषांतरित करायचे,
ते आधी ठरवावे लागते. याचा अर्थ ‘वेच्याची
निवड’
असा नाही. एक वेचा निवडल्यानंतर त्याचा
आशय काय तो दुस-या एखाद्या भाषासमाजापर्यंत त्यांच्या भाषेत कसा पोहोचवायचा याचा विचार
करावा लागतो. ही सर्व प्रक्रिया आपण भाषेकडे कसे बघतो,
भाषेचे स्वरूप कसे स्पष्ट करतो,
याच्याशी निगडीत असते. भाषा ही चिन्हव्यवस्था
आहे. संज्ञापनाचे माध्यम आहे, वागणुकीचा ढाचा आहे,
एक कृतिपद्धती आहे,
की हे सगळेच आहे,
यावर अपाण निवडलेला वेचा कसा समजणार आणि
कसा पुनर्गठित करणार, हे अवलंबून आहे.
भाषा ही केवळ चिन्हव्यवस्था नसून भाषाकृती
आहे. व्यापक सामाजिक संदर्भात संबंध समाजव्यवस्था आणि समाजक्रियेचा भाग म्हणून भाषाकृतीचे
स्थान महत्त्वाचे आहे. म्हणजेच भाषा ही विशिष्ट उद्देशाने केलेली सामाजिक,
संज्ञापक कृती आहे. (a specific
pattern of intentional, social, communicative behaviour) म्हणजेच माणसामाणसांमधला
भाषिक व्यवहार हा केवळ भाषाचिन्हांच्या व्यवस्थेतून साध्य होत नाही,
तर संज्ञापन संपन्न होण्यासाठी ते कुठे,
कसे, कोणात घडते,
ही संदर्भचौकठही तितकीच महत्त्वाची असते.
याचा प्रत्यय जर्मन-मराठीसारख्या भाषा आणि भाषासमाजांत मध्यस्थी करताना निश्चितच येतो.
Comments
Post a Comment