भाषेचं रंग-रूप : भाषा, संकल्पना आणि संस्कृती

 

भाषेचं रंग-रूप

भाषा, संकल्पना आणि संस्कृती

 

प्रास्ताविक

खरोखर पाहाता भाषेचा आपल्या सभोवतालच्या जगाशी नैसर्गिक किंवा तार्किक काहीच संबंध नसतो. ध्वनींच्या जोडणीतून तयार झालेले शब्द, तसंच ते जतन करण्यासाठी निर्माण केले गेलेली लिपी हे एका भाषासमाजामधले संकेत (code) असतात.

ह्यामुळे आपल्याला जाणवतं की भाषा म्हणजे माणसाच्या सर्जकतेचं प्रतीकच आहे. भाषा कशी निर्माण होते आणि तिचा वापर कसा केला जातो, ह्यावर शतकानुशतकं विचार चालू आहे. काही प्रमाणात आपण तिच्यात डोकावून बघू शकतो. पण म्हणून भाषेचं कोडं सुटलं आहे किंवा तिच्याबद्दलचं कुतूहल कमी झालं आहे, असं मुळीच नाही.

विसाव्या शतकातल्या ६० आणि ७० च्या दशकांत एकूणच विविध क्षेत्रांत बरेच नवे सिद्धांत मांडले गेले. तसेच भाषेविषयी काही नवे मूलभूत सिद्धांत मांडले गेले. ‘भाषेतल्या घटकांचं एकमेकांशी नातं असतं. घटकांच्या ह्या नात्यामधे एक प्रकारचा ताण असतो. ह्या ताणामुळे भाषेच्या संरचनेचं संतुलन राखलं जातं. अशा रीतीनं भाषा ही एक स्वयंपूर्ण आणि स्वायत्त संरचना असते.’ ह्या फार्दिनांद द सोस्यूरच्या सिद्धांतानं नवीन विचारांचा पाया घातला. भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोनच त्यामुळे बदलला.

माणसाला भाषाक्षमता उपजत असते. त्याबरोबर व्याकरणक्षमताही उपजत असते आणि त्यासाठी आवश्यक यंत्रणा मानवी मेंदूमधे जन्मजात असते, असं प्रतिपादन नॉम चॉम्स्कीनं ‘वैश्विक व्याकरणा’ची संकल्पना मांडताना केलं. लेव्ही श्ट्राऊस ह्या मानववंशशास्त्रज्ञानं असा सिद्धांत मांडला की, मिथाकांची मूळ संरचना सार्वत्रिक आहे. कोणत्याही संस्कृतीत आणि भाषेत असलेल्या पौराणिक गोष्टी, मिथकं वरवर पाहाता कितीही वेगळी दिसली तरी मिथाकांच्या तळाशी असलेल्या संरचनेत कमालीचं साधर्म्य असतं. जेरार्ड जेनेटनं प्रतिपादन केलं की, कोणत्याही वाङ्मय आणि समीक्षेच्या मुळाशी एक अविचल पायाभूत तत्त्व असतं. आपण एका भूर्जपत्रावरचं पाठ्य खोडून त्यावरच नवीन पाठ्य लिहीत असतो (palimpsest). रोलॉं बार्थ आणि ज्युलिया क्रिस्तेव्हा यांनी वाङ्मय आणि समीक्षा क्षेत्रात ‘आंतरपाठ्याचा’ सिद्धांत मांडला. त्यानुसार कोणतीही गोष्ट नवीन लिहिली जात नाही; तर जुन्या पाठ्यांच्या संदर्भातच नवी पाठ्यं तयार होत असतात.  

थोडक्यात म्हणजे ह्या तज्ज्ञ आणि संशोधक मंडळींनी वैश्विकता, समान मूलभूत तत्त्व आणि माणसाला जन्मत: मिळालेल्या क्षमता यांचा आपापल्या मार्गांनी आणि आपापल्या क्षेत्रामधे शोध घेतला. ह्या सगळ्या सिद्धांतांचा एकूण सूर असा आहे की, माणसाच्या मूलभूत नैसर्गिक क्षमतांच्या पायावर आणि सामाईक मूळ ढाच्यावर विविध भाषा, संस्कृती, वाङ्मय निर्माण होतं. अर्थात अशा सैद्धांतिक मांडणीचा प्रतिवादही केला गेलेला आहे, विशेषतः चॉम्स्कीच्या प्रतिपादनाचा.

संकल्पना आणि शब्द

सैद्धांतिक मांडणी आणि आपण प्रत्यक्षात काय बघतो, काय अनुभवतो यात तफावत असू शकते. प्रस्तुत चर्चेसाठी आपण भाषेकडे कसं बघतो, हेच महत्त्वाचं आहे. आपल्याला दिसतं की, प्रत्येक भाषासमाजात अनेक संकल्पना निर्माण होतात. त्यासाठी नवनवीन ध्वनिसाखळ्या निर्माण केल्या जातात. काही संकल्पना पुष्कळ भाषांना सामाईक असतात, तर काही संकल्पना संपूर्ण वेगळ्या असतात.

मानवनिर्मित भाषेचं रंग-रूप बघताना मला इथे प्रथम गाय दॉयच्छर (Guy Deutscher) च्या पुस्तकाची आठवण होत आहे. गाय दॉयच्छर हा एक ब्रिटीश ज्यू भाषाशास्त्रज्ञ आहे. तो भाषेविषयी मजेदार पद्धतीनं मांडणी करतो. त्याचं ‘Through the language glass. Why the world looks different in other languages’ हे पुस्तक २०१० मधे प्रसिद्ध झालं. त्यात त्यानी सुरवातीला संकल्पना कशा निर्माण होतात ह्या विषयी चर्चा केली आहे. ह्या संकल्पना मग शब्दात व्यक्त होतात.

दॉयच्छर संकल्पनांची स्पष्ट विभागणी करतो : संकल्पना ह्या नैसर्गिक असतात किंवा सांस्कृतिक असतात. दॉयच्छरचं म्हणणं असं की, आपण निसर्गातल्या गोष्टींसाठी आपसूक शब्द शोधतो. कुत्रं, मांजर, पक्षी, फुलं हे नैसर्गिक गट आहेत (catagories) आहेत. त्यांना आपण एकेक नाव देतो. त्याचं म्हणणं असं आहे : लहान मुलं सतत असंख्य प्रश्न विचारत असतात. पण अगदी लहान मूलसुद्धा आईला कधी असा प्रश्न विचारत नाही की, हे भूभू आहे की ही माऊ आहे; किंवा हा पक्षी आहे की फूल आहे. माणसाला ही एक जन्मतः जाणीव असते आणि अशा गटवारीमधे छोटी मुलंही सहसा घोटाळा करत नाहीत, असं गाय दॉयच्छर म्हणतो.  

पुढे दॉयच्छर त्यासाठी एक रंजक गोष्ट सांगतो. एका माणसाला एका प्राचीन ग्रंथालयात धुळीनं माखलेलं एक पुस्तक मिळतं. ते बहुधा कोणीच कधी हातात घेतलेलं नसतं. त्या पुस्तकातल्या गोष्टीत एक प्रवासी १८ व्या शतकात एका लांबच्या बेटावर जातो. तिथे यजमानांच्या सांगण्यावरून त्याच्या लक्षात येतं, की तिथल्या भाषेत ‘पांढरा गुलाब आणि लाल पोटाचा पक्षी सोडून सगळे पक्षी’ यांचा एक गट होतो आणि त्यासाठी ते ‘गुक्षी’ असा शब्द वापरतात. आणि ‘पांढरा गुलाब सोडून बाकी सगळे गुलाब आणि लाल पोटाचा पक्षी’ यांना मिळून ‘पलाब’ असा एक शब्द आहे. ही गोष्ट ऐकल्यावर कोणीही अचंबित होईल आणि भांबावून जाईल. कोणालाही प्रश्न पडेल, की असं कसं? हे कसं शक्य आहे? अर्थात ह्या गोष्टीचा मतितार्थ इतकाच, की अशी विभागणी आपल्याला नैसर्गिक वाटत नाही. अशी गटवारी मानवी भाषांमध्ये होऊ शकत नाही. कोणत्याही भाषेत सर्व पक्षी एका गटात आणि सर्व गुलाब वेगळ्या गटात अशी विभागणी आपोआप होते. कारण माणसाकडे अशी जन्मत: एक अंत:प्रेरणा (instinct) असते. हे दॉयच्छरला ह्या गोष्टीतून सांगायचं आहे.

हे निरीक्षण वाचून मला खूपच गंमत वाटली. अरे खरंच की! आपल्या भाषेत संकल्पनांची गटवारी होते, तशी ती इतर भाषांमधेही होते. शब्द वेगळे असतील, पण ह्या संकल्पना सामाईक आहेत. शब्द म्हणजे तरी शेवटी काय? तर आपण – म्हणजे एक भाषा बोलणारे आपण सर्वजण - अशा गटांना नावं देतो. शब्द म्हणजे ही नावंच तर असतात!

आपण नुसतं ‘कुत्र’, ‘मांजर’ अशी एकेका गटाला नावं देऊन थांबत नाही, तर ‘गावठी’, ‘शिकारी’ अशी पुढेही वर्गवारी करतो; आणि शेवटी एकल कुत्र्यालाही आपण नाव देतो! आपण सहज सांगतो, ‘आमचा टॉमी ना, फार हुशार आहे.’

भाषा आणि भाषासामाज

अशा रीतीनं एकेका भाषासमाजानं दिलेल्या नावांनी शब्दाची बाह्य जगाशी सांगड घालून दिली जाते. त्यातून जागाशी एक नातं निर्माण होतं. शब्दांना अर्थपूर्ण रीतीने एकमेकांशी जोडण्यासाठी  आपण ‘जर, तर, पण, आणि’ असे आणखी शब्द निर्माण करतो. जर भाषासमाजाचे संकेत पाळले नाहीत, तर माणूस एकटा पडतो. आपण ‘भाषेकडे बघताना...’ मधे ‘टेबल म्हणजे टेबल’ नावाची एका म्हाता-याची गोष्ट बघितली आहे. वस्तू त्याच, शब्द तेच. पण त्या म्हाता-या माणसानं त्यांचं नातं बदललं. त्यानं प्रत्येक शब्द वेगळ्या अर्थानं वापरून स्वतःची एक भाषा तयार केली. पण ती कोणालाच समजत नसल्यामुळे तो कोणाशीच संभाषण करू शकत नाही. म्हणजेच शब्दाचं बाह्यजगाशी असलेलं नातं एकट्यानंच बदललं, तर संभाषण शक्य होणार नाही.

शब्दांची पण एक गंमत आहे. एकच शब्द आपण कित्येकदा विविध पद्धतीनं वापरू शकतो. परिस्थितीनुरूप आपण शब्द आणि बोलायचा सूर बदलत असतो. त्यामुळेही शब्दाचा अर्थ बदलत राहातो. म्हणजे शब्दाचं बोलणा-या माणसाशीही एक नातं असतं. आपण बघितल्याप्रमाणे एका शब्दाचं भाषाबह्य जगाशी नातं, शब्दांचं एकमेकांशी नातं आणि शब्दाचं बोलणाऱ्या माणसाशी असलेलं नातं ह्या शब्दाच्या तीन महत्त्वाच्या बाजू आहेत. त्यामुळेच शब्द हे एक भाषेचं महत्त्वाचं परिमाण ठरतं.

थोडक्यात काय, तर आपल्याला जे जे दिसतं, जाणवतं, मनात येतं त्या सगळ्याला आपण नावं देतो. अगदी “मी ‘अवाक्’ झालो”, “हे अवर्णनीय आहे”, “हे शब्दातीत आहे” हेही तर आपण शब्दातच व्यक्त करतो!

सर्वव्यापी भाषा

युवल नोआ हरारी आपल्या ‘सेपियन्स’ (२०११) ह्या पुस्तकात मानवाच्या (सेपियन्सच्या) भाषेची वैशिष्ट्यं नोंदवतो. त्याच्या प्रतिपादनानुसार ह्या वैशिट्यांच्या साहाय्याने मानवानं सगळं जग जिंकलं. एक तर मानव थोड्या ध्वनींतून आणि संकेतांतून अगदी वेगवेगळ्या अर्थाची असंख्य वाक्यं बनवू शकतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे, ज्या गोष्टी त्यानं कधी बघिल्या नाहीत, ज्याला कधी स्पर्श केला नाही, ज्यांचा कधी वास घेतला नाही, अशा गोष्टींबद्दल फक्त मानाव बोलू शकतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे अशी कल्पनाशक्ती आणि कल्पनेतल्या गोष्टींना शब्दरूप देण्याची क्षमता फक्त मानवाला आहे. मानवाच्या सर्व प्रगतीचं हेच इंगित आहे.

आपण बघतो की, भाषा ही सर्वव्यापी आहे. आपल्या कल्पनेतलं जग, स्वप्नातलं जग, कादंबरितलं विश्व, विज्ञान कथांमधलं काल्पनिक जग (सायन्स फिक्शन) हेही तर आपण भाषेतच व्यक्त करतो. आपण म्हणतो की, देव कोणी बघितला आहे? पण देवाला न बघताही आपण देव मानतो. परिकथेतली परी ही शब्दातूनच अस्तित्वात येते. ती प्रत्यक्षात आहे का, ती जड स्वरूपात आपल्याला दिसेल का, असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. ज्याला ज्याला आपण शब्दरूप दिलं, ते ते सर्व वास्तवात किंवा अ(ति)वास्तवात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ‘आहे’, कारण आपण त्या त्या कल्पनेला, संकल्पनेला शब्दांनी अस्तित्व प्राप्त करून दिलं आहे. म्हणूनच विट्गन्श्टाईन ह्या विख्यात तत्त्ववेत्त्यानं म्हटलं आहे की, ‘तुमच्या भाषेच्या मर्यादा त्याच तुमच्या जगाच्या मर्यादा’. हे किती खरं आहे, हे नेहमी जाणवत राहातं.

आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि प्रत्येक क्षेत्र भाषेनं व्यापलेलं आहे. आपण म्हणतो ‘सगळं विश्व व्यापून देव दशांगुळं उरतो’. असं भाषेच्या बाबतीतही म्हणावं असं वाटतं. म्हणूनच तर आपण जरूर पडेल तेव्हा नवीन शब्द तयार करू शकतो, नवीन भाषा वापरू शकतो!

आपण बघतो, की मराठीसारख्या भाषेचा शब्दसंग्रह खूपच मोठा आहे. ह्या कित्येक हजार शब्दांमधले काही ठराविक मर्यादेपर्यंतचेच शब्द प्रत्येकाला माहीत असतात. या शब्दांपासून आपण कोट्यवधी वाक्यं तयार करू शकतो. आपल्याला एखाद्या व्यक्तीचं नाव माहीत नसलं तर आपण कोणाला तरी विचारतो, की हिचं / ह्याचं नावं काय. तसंच एखाद्या वस्तूला, क्रियेला, प्रक्रियेला शब्द माहीत नसेल, तर तो आपण शोधून काढतो.

नवे विचार, नवे शब्द

काही नवीन आविष्करणांबरोबर, बदलत्या जीवन पद्धतीबरोबर, नवीन विचारांच्या, प्रणालींच्या शोधाबरोबर अनेक नवीन शब्द भाषेत येतात, तर काही जुने शब्द वापरात राहात नाहीत. दूरभाष, चलभाष, चांद्रयान, संगणक असे काही नवे शब्द मराठीत रुळले आहेत. फडताळ, सदरा, वळचण, पागोळी, कुंची, गुटी, परस असे किती तरी शब्द वापरात राहिलेले नाहीत. परसबागेचं ‘किचन गार्डन’ झालं. काही शब्द नवीन फॅशनबरोबर वापरात येतात, तर काही शब्दच फॅशन म्हणून वापरात येतात, काही ‘स्टेटस’ दाखवणारे म्हणून प्रचलित असतात. इतर बोलींचा किंवा भाषांचा परिणाम होऊन एखाद्या भाषेत नवीन शब्द, नव्या रचना येतात. अशी अनेक मार्गांनी भाषा बदलत आणि वृद्धिंगत होत असते.

नव्या विषयांबरोबार किंवा नव्या विचारांबरोबर नवे शब्द निर्माण होतात, वापरात येतात. हे तर जिवंत भाषेचं लक्षणच आहे.

संगणकाबरोबर आलेले डाऊन लोड कर, ई-मेल लिही, गूगल करून बघ, असे शब्द; किंवा ‘लाइफ स्टाइल’ बदलल्याने आलेले शब्द. जसे जीन्स, टी-शर्ट, गॅस, बाथरूम, टॉयलेट, गीझर, बाईक, वन बेडरूम फ्लॅट, टॅक्सी असे अनेक शब्द मराठीने आपलेसे करून घेतले आहेत. ‘काय टाईम झाला’, हे प्रचलित आहे. ‘किती वाजले’ हे जास्त शुद्ध आणि प्रतिष्ठित वाटायला लागलं आहे! 

‘लई भारी’ ग्रामीण मराठीतून, ‘अरे वा! क्या बात है’ हिंदीतून, ‘बहुत खूब’ उर्दूतून, ‘व्हेरी गुड’, ‘परफेक्ट’, ‘सुपर्ब’ असे इतर भाषांमधून घेतलेले अभिव्यक्तीचे नवे मार्ग सध्या आपल्याकडे प्रचलित आहेत, विशेषतः तरुण पिढीमधे. असे बदल हे भाषेत होतच राहातात, भाषेची व्याप्ती वाढतच राहते.  

काळाप्रमाणे भाषा बदलत जाते, हे तर आपल्याला माहीतच आहे. ज्ञानेश्वर, शिवाजी, टिळक, सावरकर, कुरुंदकर, नेमाडे, महानोर, ढासळ, सुर्वे यांनी लिहिलेल्या मराठीत काळानुसार बदल झालेला आपण बघतो. पंडित कवींचं काव्य, मर्ढेकरांची कविता, लावण्या-पोवाडे हे सर्व वेगवेगळ्या धाटणीचं साहित्य मराठी भाषेतच आहे. फक्त आजच्या मराठीचा विचार केला, तर आपल्या भोवतीची अनेक माणसं आपापल्या धाटणीमध्ये मराठीचा वापर करताना दिसतात. तसं पाहायला गेलं तर बस कंडक्टर, रिक्षा चालक, आपले मित्र, घरकामाची गडीमाणसं, आपले बाबा, आपली आजी हे सर्व जण मराठीच बोलत असले तरी प्रत्येकाची भाषा काही प्रमाणात वेगळी असते, नाही का? आपण सगळे मराठी बोलत असलो तरी नागपूर, कोल्हापूर, वऱ्हाड, मराठवाडा इथे बोललं जाणारं मराठी वेगळं वेगळं असतं. ग्रामीण, कोकणी, आदिवासी पाड्यांवरचं मराठी वेगळं असतं. काळ, वय, शिक्षण, स्थान, पेशा इत्यादी घटकांनुसार भाषांचा वापर बदलत असतो. वेगळे शब्द, वेगळे उच्चार, आवाजातले वेगळे चढ-उतार, हेल, इत्यादी फरक असूनही ह्या सगळ्या अभिव्यक्तीच्या प्रकाराला मिळून आपण ‘ही मराठी भाषा आहे’ असंच म्हणतो. आपण सगळे वेगवेगळं बोलत असलो तरीही आपण एकच भाषा बोलत असतो – ती म्हणजे मराठी!

भाषेतल्या अमर्याद शक्यता आणि मर्यादा  

प्रत्येक भाषेमधे अभिव्यक्तीच्या संभाव्य शक्यता अमर्याद आहेत, तरी भाषेला मर्यादा आहेत. सर्वसाधारण भाषेची व्याप्ती, भाषेचा आवाका आणि भाषेची सर्जन-क्षमता अमर्याद आहे, हे खरं आहे. तरी कोणत्याही एका भाषेत सगळं जग कधीच अभिव्यक्त होत नाही. प्रत्येक भाषा सभोतालचं जग आपल्या नजरेतून बघते आणि तेवढंच जग शब्दांकित करते. एकेका भाषेची ही मर्यादा आहे.

प्रत्येक भाषेला अनेक प्रकारे मर्यादा पडतात. त्या त्या भाषेची, भाषासमाजाची, भाषा वापरणा-या व्यक्तीची, तिच्या अनुभवाची मर्यादा भाषेला पडते. जो तो भाषासमाज आपल्या नजरेतून जग न्याहाळत असतो. त्या समाजाला जाणवलेल्या एका एका छोट्या तुकड्याला, एका वस्तूला, एका भावनेला, एका विचारला, एका कल्पनेला तो भाषासमाज एक नाव देत असतो आणि त्याची विभागणी, त्याचं वर्गीकरण करत असतो.

इथे परत गाय दॉयच्छर (Guy Deutscher) नं दिलेलं एक उदाहरणं बघू या. तो म्हणतो, नैसर्गिक संकल्पनांच्या क्षेत्रात संस्कृतिक संकल्पना घुसत राहातात. आपलं शरीर आणि अवयव निसर्गानं दिलेले आहेत. पण त्यांची विभागणी प्रत्येक भाषासमाज वेगवेगळ्या गटात करतो. ज्यू भाषासमाजात गळा आणि मान असे दोन शब्द आहेत, तर इंग्रजीमधे पुढचा भाग आणि मागचा भाग, दोन्हीला neck म्हणतात आणि throat म्हणजे फक्त तोंडाच्या आतला भाग. मराठीमधे आपण गळा, घसा आणि मान अशी स्पष्ट विभागणी करतो. दॉयच्छर म्हणतो, हाताची विभागणी इंग्रजीत arm आणि hand अशी होते. तशी ती हिब्रूमधे होत नाही. मराठीमधे हाताची स्पष्ट विभागणी आहे आणि हात, दंड, पंजा असे वेगवेगळे शब्द आहेत. पण मराठीतही आपण ‘हात’ हा शब्द सर्वार्थानं वापरतो. प्रश्न विचारायचा असेल तर हात वर करा, असं आपण म्हणतो, ‘खाऊसाठी हात पुढे कर’ म्हणतो. ‘स्वैपाक करतांना हात भाजला’ म्हणतो, तेव्हा खूपदा तळवा किंवा बोटं अभिप्रेत असतात. ‘हाताला इंजक्शन दिलं म्हणतो’, तेव्हा दंड अभिप्रेत असतो.

हे शब्द आणि त्यांचा वापर संस्कृतिनिष्ठच राहातो. जसं ऋतू. आपण भारतात तीनच ऋतू मानतो. म्हणजे एका वर्षाची विभागणी तीन तुकड्यात करतो. आपल्याला उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ही विभागणी पुरेशी वाटते. पण काही भाषासमाज हवामानानुसार वर्षाचे spring, summer, autumn, winter असे चार भाग करतात. त्यांना ‘पावसाळा’ अशा स्वतंत्र ऋतूची गरज वाटत नाही, कारण त्याठिकाणी सगळ्या ऋतूत पाऊस पडतो. आता इंग्रजी आणि जर्मनमधे भात आणि तांदूळ दोन्हीला एकच शब्द आहे ‘राइस’. ह्या उलट इंग्रजीत बर्फामधे ‘स्नो’ आणि ‘आईस’ असा फरक करतात. आपण मराठीत असा फरक करत नाही. दोन्हीला आपण बर्फ असंच म्हणतो - फ्रिजमधला बर्फ आणि पडणारा बर्फ. संस्कृतचा आधार घेत आपण कधी ‘हिमवर्षाव’ झाला, असंही म्हणतो. असं वाचनात आलं आहे, की, एस्किमो लोक तर १०-१२ वेगवेगळ्या प्रकारचे बर्फ ‘ओळखतात’ आणि ते शब्दांकित करतात, म्हणजे त्यांना वेगवेगळी नावं देतात. ‘भाषेकडे बघताना...’मधे ओळख झालेला ‘ग्रेन्युई’ कसं लाकडाच्या वासात, दुधाच्या चवीत फरक करायचा, त्याची आठवण होते. त्याचा थोडा सविस्तर संदर्भ पुढे आला आहे. 

सभोवतीच्या जगाची विभागणी आणि त्यांचं नामकरण ह्या प्रत्येक भाषेच्या घडणीतल्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे नैसर्गिक संकल्पना आणि गटवारी ब-याच प्रमाणात अनेक भाषांना सामाईक असली तरी सांस्कृतिक संकल्पना आणि जगाची विभागणी बरेचदा भिन्न असू शकते.

अशामुळे कित्येकदा आपल्याला आपल्या भाषेत एकदम चपखल शब्द आठवत नाही किंवा तसा शब्द आपल्या भाषेत नसतोच. मग त्यासाठी दुसऱ्या भाषेतला शब्द वापरला जातो आणि हे अनेक भाषांमधे होतच असतं. परभाषेतून इंग्रजीत आलेल्या अशा ‘अँग्लो-इंडियन’ शब्दांसाठी ‘हॉब्सन जॉब्सन’ असा एक आगळावेगळा शब्दकोशच आहे. त्यामध्ये भारतीय आणि इतर आशियाई भाषांमधून घेतलेले खूप शब्द समाविष्ट केलेले आहेत. उदाहरणार्थ घाट, चपाती, योग, चारपॉय, चटणी इत्यादी.

आता वेगवेगळ्या क्षेत्रात वापरले जाणारे शब्द वेगळे असतात. न्याय, विधी किंवा कायद्याचं क्षेत्र, तंत्रज्ञान, सूक्ष्म जीवशास्त्र, अभियांत्रिकी, अंतराळ विज्ञान, वैद्यक ह्या क्षेत्रांमधे वापरले जाणारे शब्द खूपदा त्या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या पारिभाषिक संज्ञा असतात. त्यासाठी मराठीमधेही अनेक परिभाषाकोश निर्माण केले गेले आहेत. पण आपण त्यांचा तितकासा उपयोग करून घेत नाही. त्या ऐवजी आपण बरेचदा इंग्रजी शब्द वापरणंच ‘prefer’ करतो!!

म्हणजेच भाषेची क्षमता अमर्याद असली तरी प्रत्येक भाषेमधे निर्माण होणारे शब्द वेगवेगळे असतात, त्यांची संख्याही वेगळी आणि मर्यादित असते. अशा रीतीनं प्रत्येक भाषा सभोतालचं जग आपल्या नजरेतून बघते आणि तेवढंच जग शब्दांकित करते. भाषेला मर्यादा आहे, तशीच भाषेतल्या अभिव्यक्तीला, तिच्या वापराला  वैयक्तिक मर्यादाही असते.

आता मराठीसारख्या भाषेचा शब्दसंग्रह खूपच मोठा असला आणि मराठीत असंख्य वाक्यं करता येत असली, तरी यातल्या काही मर्यादित शक्यतांचाच प्रत्येक माणूस प्रत्यक्ष उपयोग करीत असतो. काही कवी आणि लेखकांना वाग्देवता आणि सरस्वती प्रसन्न असते. ग. दि. माडगुळकर, आरतीप्रभू, कुसुमाग्रज, टिळक, सावरकर ह्यांनी मराठीच्या व्यापक शब्दसंग्रहाचा, भाषेतल्या सौंदर्याचा आणि तिच्या क्षमतेचा जसा वापर केला, तसा अर्थातच प्रत्येक मराठी भाषकाला करता येणार नाही.  

भाषेतला भाव आणि अभाव

भाषेत शब्दाचं महत्त्व किती आहे हे आपल्याला माहीत आहे. शब्दात व्यक्त होणारे भाव आपण रोजच्या संभाषणातून, भाषणातून, विशेषतः कवितेतून किंवा गाण्यातून अनुभवत असतो. मराठीमधे ‘भावगीत’ हा गाण्याचा प्रकार किती लोकप्रिय आहे! शब्दांचा प्रभाव किती असतो हेही आपण जाणतोच. काही शब्द सुखावणारे तर काही बाणासारखे बोचणारे असतात. शब्दातल्या भावाप्रमाणे शब्दाची पत, शब्दाचा पोत, वजन, किंमत असते. त्याला अनुसरून लोक शब्दांचा उपयोग करत असतात.

पण खूप वेळा शब्दाचा ‘अभाव’ही जाणवतो. भाषेचा कौशल्यानं उपयोग करू शकणाऱ्या लोकांनाही कित्येकदा योग्य शब्दासाठी खूप शोधाशोध करायला लागते. कधी कधी योग्य शब्द सापडत नाही. तेव्हा लेखक किंवा कवी नवीन शब्द निर्माण करतात किंवा कधी भाषेची मोडतोडही करतात. अशी काही उदाहरणं आपण बघू या.

सलील वाघ हे एक विद्यमान तरुण कवी आहेत. जाणीव आणि अभिव्यक्तीमधे चाललेला अव्याहत संघर्ष त्यांच्या कवितेत प्रत्ययाला येतो. माध्यम म्हणून भाषेचं अफाट सामर्थ्य आणि भाषेच्या मर्यादा – दोन्हीची जाणीव सलील वाघांची कविता एकाच वेळी तितक्याच प्रकर्षानं करून देते. भाषेची तोडमोड, नवीन शब्दनिर्मिती, अनेक वैज्ञानिक, पारिभाषिक शब्द, सूत्र, नादानुसरी शब्दांचा, इंग्रजी-हिंदी, जर्मन, गुजराती, बंगली, कानडी अशा अनेक भाषांमधल्या शब्दांचा, तसंच काही बोलींचाही उपयोग ते करतात. ‘सोफ्टवेअरसमृद्ध सवाद्य नवलाई’ किंवा ‘मोगऱ्याचे ‘सहनशक्तीपलिकडचे’ आणि ‘घणाघाती’ वास’ अशी त्यांच्या कवितेत वेगळीच जोडणी आणि अभिव्यक्ती असते.  

इथे परत ‘ग्रेन्युई’ची आठवण होते. ‘भाषेकडे बघताना...”मधे ‘ग्रेन्युई’ची गोष्ट सांगितली आहे. हे झ्यूसकिंड नावाच्या जर्मन लेखकाच्या ‘द पर्फ्युम’ ह्या गाजलेल्या कादंबरीतलं मुख्य पात्र. ‘ग्रेन्युई’ला जन्मतः एक देणगी मिळालेली असते. तो वासावासातले सूक्ष्म फरक ओळखू शकत असे. जुन्या, नव्या, शेवाळलेल्या, कुजलेल्या, कुबट लाकडाचा किंवा, फळ्यांचा, भुग्याचा, कपट्यांचा असा प्रत्येक गोष्टीचा त्याला वेगवेगळा वास यायचा. तो धुरा-धुरातही फरक करू शकत असे. पण असा फरक त्याच्या भाषासमाजातले लोक करू शकायचे नाहीत. म्हणून अशा सूक्ष्म फरकांसाठी त्याच्या भाषेत शब्दच नव्हते! त्यामुळे त्याला भाषा ह्या प्रकारात काही अर्थ नाही, असं वाटायला लागलं!

प्रत्येक प्रचलित भाषेला अशा अनेक मर्यादा असू शकतात! शब्दांचा वापर अनेक प्रकारे करता येतो. आणखी एक वेगळं उदाहरण इथे आठवतंय ते म्हणजे युजीन गोम्रिंगर (जन्म १९२५) ह्या स्विस जर्मन कवीच्या कवितांचं. शब्द म्हणजे काय आणि शब्द ‘नि:शब्द’ कसे होतात हे सांगणाऱ्या ह्या दोन कविता.

      जर्मन भाषेत गोम्रिंगर हा konkrete Poesie म्हणजे ‘मूर्त कविता’ ह्या साहित्य प्रकारचा प्रणेता मानला जातो. मूर्त काव्यात भाषा ही ‘माध्यम’ न राहाता प्रत्यक्ष ‘विषय’ बनते. भाषाबह्य जगाची प्रतिमा सादर करण्यासाठी भाषेचा उपयोग केला जात नाही, तर ‘शब्द’ हेच कवितेचा ‘विषय’ बनतात. आपल्या ‘तारकापुंज’ ह्या कवितेत गोम्रिंगर म्हणतो,

तारकापुंज

शब्द म्हणजे सावल्या

सावल्या होतील शब्द

शब्द म्हणजे खेळ

खेळ होतील शब्द

असतील सावल्या शब्द

तर होतील शब्द खेळ

असतील खेळ शब्द

तर होतील शब्द सावल्या

असतील शब्द सावल्या

तर होतील शब्द खेळ

असतील शब्द खेळ

तर होतील सावल्या शब्द

 

शब्द म्हणजे सावल्या. शब्द म्हणजे मूर्त रूप. त्यांना आकार असतो, वजन असतं. शब्द म्हणजे खेळ. खेळ म्हणजे उत्साह, आनंद, हवीशी गोष्ट. खेळ म्हणजे शब्द, शब्द म्हणजे सावल्या. म्हणून त्यांचं एक नातं प्रस्थापित होतं. एक पुंज बनतो. पुंजातले शब्द एका अदृश्य धाग्यांनी जोडलेले असतात. एका स्थळकाळाच्या परिघात त्यांचे खेळ चालतात आणि कवीकडून त्यांचे आकृतिबंध निश्चित केले जातात.

दुस-या कवितेत गोम्रिंगर शब्दांच्या मांडणीतून ‘निशब्द शांतता’ कशी व्यक्त करतो, हे ‘बघण्यासारखं ‘ आहे.

शांतता

नि:शब्द  शांतता नि:शब्द  

शांतता   निशब्द   शांतता  

नि:शब्द             नि:शब्द

शांतता   नि:शब्द  शांतता

नि:शब्द  शांतता नि:शब्द

(भाषांतर :नीती बडवे, पूर्वप्रसिद्धी “भाषा आणि जीवन”, १९८८)

 

ह्या कवितांमध्ये ‘शब्द’ हेच ‘विषय’ बनले आहेत, तसं मराठीमधे ‘शब्द’ किंवा ‘भाषा’ ह्या विषयांवर फारसं लिखाण झालेलं आढळत नाही. काही कवींनी शब्दांबद्दल लिहिलं आहे, पण ते सहसा शब्द हे साधन म्हणून, शब्द हा भाषेचा एक घटक म्हणून. जर्मन साहित्यात, विशेषतः ऑस्ट्रियन जर्मन साहित्यात ‘भाषा’ हा विषय तऱ्हतऱ्हेनं हाताळला गेला आहे.

शब्द हा कवीचा प्रांत आणि काव्य हे त्याचं कसब. कवी शब्दांची निवड आणि मांडणी करतो. वरच्या रचनेत शब्दाच्या अभावाने ‘शांतता मांडली’’ आहे! शब्दांपलीकडे जाऊन कवितेच्या मध्यभागी ‘शांतता’ मूर्त स्वरुपात ‘दाखवली’’ आहे!! ‘भाषेची’ अमर्याद क्षमता असूनही कवीला ती कशी अपुरी पडते ह्याचं हे आणखी एक उदाहरण. कधी ‘निशब्द शांताता’ हीच अभिव्यक्ती ठरते. मूळ कवितेत ‘schweigen’ म्हणजे ‘गप्प राहाणे’ हा एकच शब्द चौदा वेळा वापरला आहे आणि मध्यभागी रिकामी जागा सोडली आहे. ह्या कवितेला शीर्षक नाही. जर्मनमध्ये ‘schweigen’ हा शब्द क्रियापद, तसंच नाम म्हणूनही वापरला जातो.

इथे शब्दातून नाही तर ‘अव्यक्तातून’ काही व्यक्त होतं. आपल्याला माहीत आहे, की जे कधी कधी बोलण्यातून साध्य होऊ शकत नाही ते मौनातून साध्य होतं. ते शब्दांकित होऊ शकत नाही. हीही भाषेची मर्यादाच आहे आणि मौन हे अभिव्यक्तीचं साधन आहे!

भाषा आणि संस्कृती

भाषा आणि संस्कृती याचं अतूट नातं आहे. प्रत्येक भाषेला तिचं म्हणून एक व्यक्तित्व असतं आणि भाषेतला प्रत्येक शब्द संदर्भांनी संपृक्त असतो.

शब्दांना राजकारण, धर्म, धर्मकारण, इतिहास, भूगोल, हवामान, परंपरा, चालीरीती, रूढी, सणवार, इत्यादींचे अनेक संदर्भ असतात. ‘आमच्या देव्हा-यात बरेच देव आहेत.’ हे बहुवचानामधलं वाक्य ब-याच परभाषकांना विचित्र वाटतं, कारण ते वेगवेगळे देव मानत नाहीत. ‘परवा त्याचा दहावा होता.’ ‘उद्या मला तेराव्याला बोलावलं आहे.’ ह्या वाक्यांना रूढी, संस्कृती आणि संस्कारांचा संदर्भ आहे. आपल्याकडे एका रंगाचं नावच मोरपंखी आहे, दुस-याचं डाळिंबी आहे. एका पक्ष्याला आपण ‘हळद्या’ (Oriole) म्हणतो. रंगाचं किंवा पक्ष्याचं हे नाव हे संस्कृतिनिष्ठच आहे. ‘भगवा’ म्हटलं तर आपल्याला काय आठवेल? सर्व प्रथम भगवा झेंडा. शिवाजी, स्वराज्य. शेंदरी म्हटलं तर शेंदूर लावलेला मारुती आठवेल. ‘केशरी’ म्हटलं तर केशराचा भात, केशराचं दुध आठवेल. आणि ह्या जोड्या आपण बदलू शकत नाही. केशरी मारुती, भगवा भात आणि शेंदरी झेंडा असं आपण वापरत नाही. तिरंगा, वाळवण, कमळ, निरांजन, दुर्वा, माया, समाधी, वात्सल्य अशा सर्व शब्दांना संस्कृतीशी निगडित अनेक संदर्भ असतात. अशा संकल्पना इतर भाषांमध्ये शब्दांकित झालेल्या असतीलच असं नाही. ‘वात्सल्य’ म्हणजे ‘आईचं मुलांच्या प्रती प्रेम’ – एखाद्या परभाषेमधे ‘वात्सल्य’चं असं वर्णन करून सांगावं लागेल.

आपल्या धर्माप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे, परंपरा, चालीरीती ह्यानुसार एका भाषासमाजात भाषा निर्माण होत असते. उष्टं, खरकटं, सोवळं-ओवळं, पुण्य, ओवाळणे, मसाला ह्या संकल्पना आपल्या भाषेत आहेत, पण त्या इतर भाषासमाजात असतीलच असं नाही. ज्या कल्पना-संकल्पनाच अस्तित्वात नसतील तिथे त्यासाठी शब्दही असणार नाहीत. उदाहरणार्थ इंग्रजीत पाप म्हणजे ‘सिन’, पण ‘पुण्य’ ही संकल्पना आपल्याकडे वेगळी आहे. नुसतं ‘गुड डीड’ म्हणून आपली पुण्याची कल्पना अभिव्यक्त होत नाही. आपल्याकडे उपासाचे पदार्थ किंवा सोवळ्यात शिजवलेलं अन्न असतं. हिब्रू भाषेत ‘कोशेर’ असा एक शब्द अन्नाच्या संदर्भात वापरतात. जुन्या ज्यू धर्माच्या नियमानुसार तयार केलेलं अन्न. इझ्राईलमधे काही ‘कोशेर’ उपहारगृह असतात, तशी ती ज्यू वस्तीत अमेरिकेत, जर्मनीत वगैरेही असतात.  

आता सीमा, राष्ट्रवाद, पाऊस, भात, गाय ह्या संकल्पना सार्वत्रिक आहेत आणि त्या अनेक भाषांमधे शब्दांनी व्यक्त होत असतात. पण ह्या अर्थाच्या इंग्रजी किंवा जर्मन शब्दांना संदर्भ मात्र वेगळे असतात. गाईला आपल्या संस्कृतीत फार मोठं आणि महत्वाचं स्थान आहे. जर्मनमधे मात्र एखाद्या मुलीला बावळट, वेडी असं म्हणायचं असेल, तर ‘काय गाय आहे’ असं म्हणतात!

सीमा म्हटलं तर आपल्याला उत्तर सीमेवरचा हिमालय आठवतो. प्रत्येक राष्ट्र सीमेचा अर्थ वेगळा लावतं. आपला राष्ट्रवाद भारत पारतंत्र्यात असतांना उदयाला आला. म्हणून ‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना आपल्याकडे बा-याच लोकांना सकारात्मक वाटते. पण जर्मन राष्ट्रवाद एकोणिसाव्या शतकात उदयाला आला आणि नाझी जर्मनीत त्याची परमावधी झाली. इतर वंश, धर्म किंवा राजकीय विरोधक ह्यांना जर्मन राष्ट्रवादाने आव्हेरलं आणि त्यांचा छळ केला किंवा त्यांची हत्या केली गेली. त्यामुळे युद्धोत्तर काळात जर्मनीत ‘राष्ट्रवाद’ सकारात्मक अर्थाने वापरला जात नाही. तिथे हा शब्द फार जपून वापरला जातो.

पावसाचं आपल्या जीवनात आणि साहित्यात जे स्थान आहे त्याहून युरोपीय साहित्यात पावसाचं स्थान वेगळं आहे. अगदी आपल्या संत साहित्यात आणि बायबलमधेही पाण्याची उपमा अनेक ठिकाणी येते. पण तरी हवामान आणि भौगोलिक परिस्थितीमुळे त्यामागच्या भूमिकांमधे फरक पडू शकतो. जर्मन लोक जिथे ‘पावसातून पन्हळी खाली’ असा वाकप्रचार वापरतील तिथे आपण ‘आगीतून फुफाट्यात’ अशी म्हण वापरू. ह्याचा उल्लेख ‘भाषेकडे बघताना...’मधे आलेला आहे. भाषेचा वापर हा हवामान, भौगोलिक परिस्थिती, सभोवतालचं वातावरण अशा अनेक गोष्टींशी निगडित असतो. पावसातली प्रणयाराधना, विरहिणीची व्याकुळता पाश्चात्य लोकांना कळणं खूप अवघड आहे.

इतकंच काय, साठवलेलं पाणी आणि वाहातं पाणी ह्यांच्या वापरात ललित साहित्यामधे फरक पडतो! पावसाचा आणि उत्कट प्रेमाचा, विरहगीतांचा निकटचा संबंध आपल्या साहित्यात दिसतो. अगदी महाकवी कालिदासापासून, रवींद्रनाथ टागोरांपासून आपल्याला अशी अनेक उदाहरणं मिळतात. शंकर सेन गुप्ता ह्यांचं “rain in Indian life and lore” हे पुस्तक ह्या संदर्भात बघण्यासारखं आहे. त्यात त्यांनी अनेक भारतीय भाषांमधल्या पाऊस-काव्याची उदाहरणं दिली आहेत. पण जर्मन साहित्यामधे मात्र नेहमी साठलेल्या पाण्याचा उल्लेख येतो. जर्मनी किंवा इंग्लंडमधे कोणीही हौसेनं पावसात भिजत नाही. त्यांना रोजच्या पावसाचा कंटाळाच आलेला असतो. (Gene Kelly चं singing in the rain हे सर्वांग सुंदर सादरीकरण एक अपवाद आहे. पाऊस पडत होता, तरी तो आनंदात गात होता. भारतीय परंपरेत पाऊस पडला म्हणून लोक आनंदानं गातात!) पण एखादी ललना तळ्यात, तलावात किंवा अगदी समुद्रातसुद्धा पोहून किंवा डुंबून ओलेती बाहेर येते ती त्या पुरुषांना सगळ्यात आकर्षक वाटते. जलप-यांचा उल्लेख पारंपारिक जर्मन साहित्यात बरेचदा येतो. असा हवामान आणि संस्कृतितला फरक साहित्यात उतरतो. आपण मुंबईमधे म्हणा की कोकणात म्हणा ‘बीच’वर बरेचदा ‘फिरायला’ जातो, पोहायला किंवा पाण्यात डुंबायला जात नाही, ह्याचं जर्मन लोकांना खूपच आश्चर्य वाटतं. 

भाषा ही समाज आणि संस्कृतिनिष्ठ असते. प्रत्येक शब्द हा आशयाने संपृक्त असतो. पुष्कळदा शब्द हे त्यांच्या अर्थाच्या मर्यादेत न वापरता काहीतरी सूचित करणारे असे ‘निर्देशक’ (indicator) म्हणून वापरले जातात.

ह्या संदर्भातली अनेक गंमतशीर उदाहरणं देता येतील. इथे आठवण होते ती सतीश आळेकर यांच्या ‘एक झुलता पूल’ ह्या एकांकिकेची. ही एकांकिका एके काळी, म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी, अत्यंत गाजली आणि तिला ‘पुरुषोत्तम करंडक’मधे अनेक पारितोषिकं मिळाली. ह्या एकांकिकेच्या सुरुवातीलाच एक तरुण एका तरुणीला विचारतो ‘अहो, तुमच्याकडे प्रेशर कुकर आहे का?’ हा अनपेक्षित प्रश्न सुरवातीला निरर्थक आणि अॅबसर्ड वाटतो. तो तरुण पुढे एकदा त्या तरुणीला म्हणतो, ‘मला तुमाच्याकडे बघून वाटलंच होतं की तुमच्याकडे प्रेशर कुकर, फ्रीज वगैरे असणार म्हणून. तुम्ही नदीच्या पलीकडे (डेक्कन जिमखान्यामधे) राहत असणार, वडलांची गाडी, तुमची स्कूटर, आईची क्लबमध्ये रमी.’ म्हणजे त्या काळी ‘प्रेशर कुकर’ ह्या शब्दांमधे त्या युवकाला जीवनाचं हे सबंध चित्र अभिप्रेत होतं! तो मुलगा जुन्या पुण्यात, ‘पेठेत’ राहात असतो.

पुढे ती मुलगी त्याला विचारते, ‘हेवा वाटतो का?’ त्यावर तो म्हणतो, ‘लक्ष्मीछाप पितळी कुकरला कधी प्रेशर कुकरचा हेवा वाटतो का? कारण दोन्हीत वाफ कोंडते.’ म्हणजे हा एक प्रकारे ‘प्रेशर कुकर’ आणि ‘लक्ष्मीछाप पितळी कुकर’ च्या तफावतीतला ‘झुलता पूल’ आहे. इथे ‘प्रेशर कुकर’ हा जीवनमानाचा आणि विशिष्ट जीवनपद्धतीचा सूचक किंवा निर्देशक म्हणून वापरला आहे. अशा प्रकारे प्रत्येक शब्दाला एक सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ असतो आणि शब्दाचं उपयोजन करतांना त्यात एक निर्देशांक अनुस्यूत असतो. प्रत्येक शब्दामधे काही जीवनानुभव, सामाजिक परिस्थिती, राजकीय घडामोडी, ऐतिहासिक, पौराणिक, सांस्कृतिक संदर्भ सामावलेले असतात. अगदी भौगोलिक परिस्थितीचाही आपल्या भाषेवर परिणाम होत असतो. प्रत्येक शब्दाचं आपलं असं एक संदर्भजग असतं.

भाषावापराचे स्तर

भाषावापराचे अनेक स्तर असतात. म्हणजे आपण ठराविक संदर्भात अनेक समानार्थी शब्दांमधून निवड करून ठराविक शब्द वापरतो. उदाहरणार्थ ‘खून’ आणि ‘हत्या’. किंवा कोणाचं निधन झालं, कोण दिवंगत झालं, स्वर्गवासी झालं, पैगंबरवासी झालं, कोण गेलं, मेलं, कोण धारातीर्थी पडलं, कोण शहीद झालं, अशा शब्दांचा वापर आपण संदर्भाप्रमाणे करतो. ‘वसुंधरा हिरवी वसनं ल्याली’, ‘वसुंधरेनं हिरवी साडी घातली’, ‘वसुंधरा हिरवं लुगडं नेसून आली’ हे वर्णन पावसाळ्यात हिरवा रंग पांघरलेल्या पृथ्वीचं आहे. वरच्या तीन उदाहरणांवरून आपल्याला काय कळतं? पहिल्या उदाहरणात लक्षात येतं की हा वापर काहीशा जुन्या साहित्यातला किंवा काव्यातला आहे. ‘वसनं ल्याली’ ही भाषा आजच्या तरुण पिढीला कळायला अवघड आहे. दुस-यात जाणवतं की आजची तरुण पिढी ‘साडी घालते’, ‘नेसत नाही’. तिसरं उदाहरण आजीच्या पिढीतलं आहे. ‘लुगडं नेसणं’ असं आजी म्हणते, इत्यादी. म्हणजे भाषा वापरतांना भाषेचा स्तर, भाषेचं प्रयोजन आणि संदर्भ लक्षात घ्यावेच लागतात.

भाषेची बलस्थानं

प्रत्येक भाषेची आपली ताकद, आपली बलस्थानं असतात. संत वाङ्मय हे मराठी साहित्याच्या इतिहासातलं एक बलस्थान आहे. त्याची म्हणून भाषा आहे, त्याचं एक तत्वज्ञान आहे. त्याचा म्हणून एक आध्यात्मिक विचार आहे, त्याची म्हणून एक सामाजिक जाण आहे. एखाद्या भाषेत नवा मूलभूत विचार निर्माण होतो आणि त्याची अभिव्यक्ती होते, तेव्हा ते त्या भाषेचं बलस्थान बनतं आणि अनेक अंगांनी ती भाषा समृद्ध करतं.

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातली जर्मन तत्त्वज्ञानाची परंपरा, मार्क्सचं तत्वज्ञान, विसाव्या शतकातला मोटार गाड्यांचा विकास, भाषाशास्त्रामधली जर्मन आणि रशियन भाषेतली मांडणी, फ्रेंच संरचनावाद आणि युरोपीय उत्तराधुनिकतावाद  (structuralist आणि postmodernism) ह्यांची परंपरा, इत्यादी. ही त्या त्या भाषेत संचित केलेली ज्ञानाची भांडारं आहेत. अशा संशोधनाबरोबर आणि नवीन प्रणालींबरोबर नवी शब्दसंपदा विकसित होते.

प्रत्येक भाषेचा वेगळा दृष्टिकोन

प्रत्येक भाषा आणि भाषासमाज आपल्या नजरेतून जग न्याहाळत असतो. त्यानुसारच भाषेतून अभिव्यक्ती होत असते.

एक साधंसं उदाहरण घेऊ या. महाराष्ट्रातला माणूस म्हणेल ‘ऑक्टोबरमधे फार गरम असतं.’ तर जर्मन माणूस म्हणेल, ‘ऑक्टोबरमधे थंडी असते.’ ही दोन्ही वाक्यं त्या त्या परिस्थितीनुसार खरी असतात. कारण जर्मनीमधे ऑक्टोबर महिन्यात कधी तरी बर्फही पडतं. आपल्याला माहीतच आहे की, एखादा ‘आतंकवादी’ त्याच्या देशात ‘शहीद’ किंवा हिरो म्हणून ओळखला जातो. आणखी एक अलिकडचं उदाहरण बघू या. सेंट पीटर्सबर्गमधे एका मोठ्या संग्रहालयाला जर्मन चॅन्सलर अन्जेला मेर्केलनी भेट दिली. तेव्हा मेर्केल यांना वाटत होतं की प्रदर्शनात मांडलेल्या जर्मन वस्तू रशियाने परत कराव्यात, कारण त्या रशियानं दुस-या महायुद्धात जर्मनीमधून लुटून नेलेल्या होत्या. रशियाचे प्रेसिडेंट पुतीन यांना मात्र त्या वस्तू ह्या युद्धात जिंकलेल्या ट्रॉफीज म्हणजे विजयाचं प्रतीक आणि म्हणून सन्माननीय वाटत होत्या.

म्हणूनच भाषाशास्त्रज्ञांच्या मते एकाच भाषेत तंतोतंत जुळणारे समानार्थी शब्द नसतात आणि दोन भाषांमधे तंतोतंत जुळणारे प्रतिशब्द नसतात. ह्याचं कारण म्हणजे प्रत्येक शब्दाच्या अर्थाचा आवाका (semantic field), त्याचं उपयोजन आणि उपयोजनात अनुस्यूत असलेले सगळे संदर्भ एकच नसतात. अगदी ऊन, पाऊस, देव, मरण, अशा वैश्विक संकल्पनासुद्धा प्रत्येक भाषेत वेगळे संदर्भ घेऊन येतात आणि म्हणून वेगळा अर्थ प्रतीत करतात.

सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक भाषा म्हणजे एक ज्ञानभांडार असतं. भारतीय परंपरेतली अनेक उदाहरणं देता येतील. वानगीदाखल वैदिक आणि अभिजात संस्कृत साहित्य, संगीतातले राग, अद्वैत तत्त्वज्ञान, गीता, पाणिनीचं व्याकरण, भक्ती परंपरा, योग परंपरा, दलित चळवळ, असहकार आणि सत्याग्रह विचार, स्वातंत्र्य चळवळ, इत्यादी. प्रत्येक भाषेत निर्माण झालेल्या नवीन संकल्पना आणि त्यासाठी वापरली जाणारी नवीन भाषा, नवीन शब्द असतात. अलीकडे निर्माण झालेल्या इंग्रजी भाषेतल्या संगणकीय संकल्पना, व्यापार, अर्थ, वित्त तसंच युध्दशास्त्रातल्या संकल्पना ह्या वैश्वीकरणामुळे आणि भाषांतरातून आपल्यापर्यंत पोचतात. पुष्कळदा असं होतं की विविध क्षेत्रातले कित्येक शब्द मूळ भाषेतून तसेच उचलले जातात. उदाहरणार्थ भारतीय भक्ती, योग, कर्म, बुद्ध, निर्वाण; चिनी ‘यिंग-यांग’; जपानी कार्यप्रणाली ‘कायझेन’, जर्मन तत्वाज्ञानातल्या संकल्पना Sein आणि Dasein, इंग्रजीतून Face Book, Twitter, इत्यादी.

अशा रीतीनं भाषा संस्कृतीशी निगडित असते. तिच्या आपल्या मातीतून स्वतंत्र संकल्पना, विचार, दृष्टिकोन निर्माण होत असतात. अशा मूलभूत विचारांच्या मांडणीमधून भाषा प्रामुख्यानं समृद्ध होत जाते. प्रत्येक भाषेचा सभोवतालकडे बघण्याचा आपला असा वेगळा दृष्टिकोन असतो, आपली अशी एक धाटणी आणि लकब असते. आपलं वास्तव आणि आपलं सत्य असतं!!

 

संदर्भ :

आळेकर, सतीश (१९७३) : झुलता पूल, पुणे.

Deutscher, Guy (2nd ed.2010) : Im Spiegel der Sprche. Warum die Welt in anderen Sprachen anders aussieht. C. H. Beck Verlag, Aus dem Englischen von Martin Pfeiffer.

Bergmann, R; Pauli, P.; Schlaefer, M. (1981) : Einführung in die deutsche Sprachwissenschaft, Carl Winter. Universitäsverlag, Heidelberg. Esp. P. 12 & 24.

Gomringer, Eugen (1980) : konkrete poesie, anthologie von eugen gomringer, reclam, stuttgart, P. 58,59.

Harari ,Yuval Noah (2011) : Sapians. A brief history of humankinds. Vintaga, London.

Süskind, Patrick (1985) : Das Perfum, Germany.

 

 

 

Comments

  1. Good article liked it. Of course have to read it again to get to the finger points. Thanks for sharing.

    ReplyDelete
  2. लेख आवडला.
    भाषेचा विविध अंगांनी केलेला अभ्यासपूर्ण ऊहापोह अत्यंत वाचनीय आहे.
    तो पुन्हापुन्हा वाचूनच लेखाचं समग्र आकलन होईल
    धन्यवाद!!

    ReplyDelete
  3. वा! "भाषा" या विषयाचं सर्वस्पर्शी विवेचन! खूप दिवसांनी असा अभ्यासपूर्ण लेख वाचनात आला. त्यातल्या काही परिचित उदाहरणांनी माहित असलेल्या संकल्पनेची नव्याने जाणीव करून दिली, तर काही उदाहरणांनी सर्वथा नवीन संकल्पनेची डोक्यात मांडणी झाली! वापरलेल्या संदर्भ ग्रंथांच्या विषयी ही उत्सुकता निर्माण झाली आहे. शक्य असल्यास मुळातून नक्की वाचायला आवडतील.

    ReplyDelete
  4. लेख खूपच अभ्यासपूर्ण आहे. खूप नवीन माहिती कळली.
    भाषेचा उगम कसा झाला? ह्या संदर्भात काही आणखी लिहिता येईल का? आपल्या संस्कृती बरोबर विकसित झालेल्या काही अती पुरातन संस्कृती, उदारणार्थ इजिप्त, येथील भाषेचा उगम आणि प्रवास जाणून घ्यायला आवडेल

    ReplyDelete
  5. खुपच छान लेख .. काळानुसार भाषेत झालेले बदल , स्थळ , culture नुसार असलेले फरक आणि हे सर्व असले तरी एक समान मुलसुत्र , हे सर्व emphasise करते भाषा ही evolved civilisation चे प्रतिक आहे .
    नितीताई तुम्ही चौफेर references देऊन या विषयावरचा अभ्यास किती रोचक बनवला आहे .. felt like taking a dip & enjoying the floating

    ReplyDelete
  6. Very good article! Looking forward to read the whole book.

    I would suggest Google Ngram viewer, a fun tool, to play further with languages - it shows how frequently a word appeared in books over the last 2 centuries, for 8-10 languages.

    ReplyDelete
  7. नीती, तुझा हा लेख वाचून तू माझी मैत्रीण आहेस याचा खूप अभिमान वाटला.
    एकूण या पुस्तकांमध्ये आणखीन किती किती काय काय येणार आहे अशी उत्सुकता पण मनामध्ये दाटून आलेली आहे.
    तुझा हा लेख अतिशय अभ्यासपूर्ण परंतु सोप्या भाषेत मधला आहे, त्यामुळे वाचकाला उत्सुकता वाटेल आणि पुढचे लेख पण तो नक्की वाचेल.
    अन्य भाषांतील संदर्भ दिलेले आहेत आणि त्याचा कालावधी पण खूप मोठा आहे. त्यामध्ये काही लेख, कविता, नाटके असा अगदी सार्थ असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे खूप विस्तृत परीघ भाषेविषयीचा नजरेसमोर येतो. आणि मग विस्मय वाटायला लागतो की आपण भाषेचा वर्षानुवर्षे आसरा घेतलेला असताना नेमकेपणाने हे सगळे मुद्दे कधी जाणवले कसे नाहीत?
    या तुझ्या लेखामध्ये शेवटी दिलेले संदर्भ अभ्यासकांना निश्चित उपयुक्त ठरतील. पुढील लेख लवकर लवकर लिही आणि पाठव. शुभेच्छा तुला.

    ReplyDelete
  8. भाषेची जडणघडण चांगली मांडली आहे. वेळोवेळी होणारे बदल ही चांगले दाखवले आहेत. भाषेमुळे मेंदूतील वाढ जास्त होते.
    प्रत्येक संस्कृतिचा जगाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन असतो. जन्म, मृत्यू, भय व भूक या गोष्टींचा सतत विचार होतो. यावर संस्कृतीचा मोठा प्रभाव असतो हे नक्कीच. भाषा शिकणे व त्या लोकांसारखी बोलतां येणे यात खूप फरक पडतो तो यामुळेच. ज्ञानभाषा-भांडार हे मात्र पुढे जात रहावे असे नक्की वाटते. नवीन भर पडते तसे चांगले जुने हे पुढे गेले पाहिजे.
    कल्पनाशक्ती हे माणसाचे वेगळेपण आहे व तो भाषेच्या वापराने जगासमोर मांडू शकतो, त्याला मर्यादा येतात हे विशेष पटले नाही.

    ReplyDelete
  9. भाषेचा रीतसर, शास्त्रशुद्ध अभ्यास न केलेल्या पण भाषेत स्वारस्य असणाऱ्या माझ्यासारख्याला हे लेखन अतिशय उपयुक्त आणि प्रेरक वाटले .धन्यवाद!

    ReplyDelete
  10. Khoop changala lekh ahe. Wachatana maja ali. Seasons and weather chya sandarbhat ek phrase aathawali. 'ghar unhat bandhane'. English lokaana atishay bhavanari hi kalpana apalyala matra shiksha mhanun mahiti ahe. :) Eskimo lokanche snow vishayiche prakar wachayachi aata utsukata ahe. :)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वनिमविचार

भारत आणि बहुभाषिकता