मराठी भाषेची जडण घडण आणि सद्यस्थिती
मराठी भाषेची जडण घडण आणि
सद्यस्थिती
भाषा प्रवाही आणि समावेशक असते.
सर्जनशील आणि प्रयोगशील असते.
ती काळाच्या ओघात सतत बदलत असते.
भाषेला
बरेचदा नदीची उपमा दिली जाते कारण भाषा नदीसारखी प्रवाही आहे. ती अनेक उपनद्या,
ओहोळ, नाले आपल्यात सामावून घेत असते. तिचं स्वरूप बदलत जातं, पण तिची ओळख तीच
रहाते. मराठीच्या बाबतीतही हे खरं आहे.
पार्श्वभूमी
मराठीची
जडण घडण समजून घेतांना महाराष्ट्रचा इतिहास आणि भूगोल लक्षात घेणं आवश्यक आहे.
महाराष्ट्र
भारताच्या साधारण मध्याच्या थोडा दक्षिणेला आहे आणि पश्चिम किनाऱ्यापासून
मध्यापर्यंत पसरलेला आहे. महाराष्ट्रच्या दक्षिणेला चार प्रांत आहेत आणि तिथे
कानडी, तमिळ, मल्याळी आणि तेलगु ह्या ‘द्रविड’ भाषा बोलल्या जातात.
महाराष्ट्राच्या उत्तरेला बोलल्या जाणाऱ्या बहुतेक भाषा ‘इंडो-युरोपीय’ म्हणून
ओळखल्या जाणा-या गटात मोडतात. ह्या दोन भाषा गटांच्या आणि संस्कृतींच्या मधे
महाराष्ट्र पसरलेला आहे. त्यामुळे ह्या दोन्ही भाषासमाजांचा आणि संस्कृतींचा
प्रभाव महाराष्ट्राच्या भाषेवर आणि संस्कृतीवर पडलेला दिसतो.
आज
आपण जो प्रदेश महाराष्ट्र म्हणून ओळखतो त्या प्रांताच्या सीमा १९६० मध्ये निश्चित
झाल्या. पण ह्या प्रदेशाचा इतिहास सातवाहन राजवटीपासून म्हणजे इ.स.पू. २३० पासून
ज्ञात आहे. त्या काळापासून १३१० मध्ये देवगिरीच्या रामदेवाचा पाडाव झाला तोपर्यंत,
म्हणजे जवळ जवळ पंधराशे वर्षांच्या कालावधीत ह्या प्रदेशात सातवाहन,
वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादवांची राजवट होती. त्या काळात अनेक गणराज्य
होती आणि ह्या प्रदेशाच्या राज्यकर्त्यांची भाषा, राज्याच्या सीमारेषा, तसंच
राजधान्या बदलत राहिल्या. सातवाहन आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या वाकाटकांच्या
काळात प्राकृत भाषा बोलली जायची. चालुक्य आणि राष्ट्रकूट घराण्यातल्या राजांची
भाषा कानडी होती आणि १२ व्या आणि १३ व्या शतकात सत्तेवर असलेल्या यादवांची भाषा मराठी
होती. यादवांनी मराठी भाषा आणि साहित्याला मोठा पाठिंबा आणि राजाश्रय दिला, असं
इतिहास सांगतो. म्हणजे काही शतकांपासून कानडी आणि मराठी ह्या दोन भाषासमाजात भाषा
आणि संस्कृतीची खूप देवाण घेवाण होत राहिली. तसंच सीमेलगतच्या तेलगु आणि तमिळ
भाषांशीही मराठीचा खूप संबंध आला.
‘महाराष्ट्र’ असा ह्या
प्रदेशाचा नामोल्लेख किती जुना आहे आणि मराठीची केव्हा वापरली जाऊ लागली, ह्याबाबत
काही मतेमतांतरे आहेत. महाराष्ट्री प्राकृत भाषेचा उल्लेख ५ व्या शतकात सापडतो,
असं सर्वसाधारण मत आहे. मराठीची निर्मिती मुख्यतः महाराष्ट्री प्राकृतवरून झाली
असं मानण्यात येतं. पहिल्या शतकातला ‘गाथा सप्तशती’ हा हाल सातवाहनानं संग्रहित केलेला
ग्रंथ महाराष्ट्री प्रकृतातला आहे. हा ग्रंथ सगळ्यात जुना मानला जातो. त्या आधीचं
साहित्य उपलब्ध नसलं, तरी त्याआधी काही शतके ही भाषा वापरली जात असावी, असं
अभ्यासक मानतात. ८०० ते ११०० ह्या काळातले महाराष्ट्री प्रकृतातले काही ग्रंथ
उपलब्ध आहेत. मराठी भाषेतले पहिले ग्रंथ लीळाचरित (१२७८), ज्ञानेश्वरी (१२९०), आणि
त्यानंतरचा विवेकसिंधू (काळ निश्चित नाही) असे मानले जातात. उपलब्ध झालेले काही
मराठी शिलालेख ह्याच्या आधीच्या दोन शतकातले असावेत, असा अंदाज आहे.
साधारणपणे
यादवांच्या पडावापासून जवळपास तीनशे वर्षं, म्हणजे शिवाजीच्या उदयापर्यंतचा काळ हा
महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय, सामाजिक आणि भाषिक दृष्ट्या तमोयुग मानलं जातं.
विशेषतः १३५० ते १५५० हा काळ मराठीसाठी फार कठीण होता असं अभ्यासक म्हणतात.
(परांजपे; मिरजकर पान ८) दक्खनचं बहामनी राज्य संपल्यावर दक्षिणापथावर ५
सुलतानांनी राज्य केलं. अहमदनगरमध्ये
निजाम आणि वऱ्हाडात इमादशहा सत्तेवर आले; विजापूरमध्ये आदिलशहा, बिदरमध्ये बिदरशहा
आणि गोळकोंडात कुतुबशहा.
ह्या
काळात राजभाषा फारसी होती, पंडितांची भाषा संस्कृत होती आणि जनतेची भाषा मराठी
होती.
पण
ह्याच काळात मराठीत उत्तम संत वाङ्मय
निर्माण झालं. भागवत आणि नाथ पंथाच्या साहित्यातून मराठीची जोपासना झाली.
मराठी वृद्धिंगत होत राहिली. भक्तिपंथाखेरीज ह्या काळात मराठीमध्ये लिहिलेलं जैन,
ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीय वाङ्मयसुद्धा आढळतं. (डहाके :६६; परांजपे;
मिरजकर पान १५). एकनाथांच्या ‘गुरुचरित्रा’मध्ये (१५३८) हिंदू आणि मुसलमान धर्मांचं मिश्रण
दिसतं. (परांजपे;
मिरजकर पान ९)
मराठीची
वैशिष्ट्यं
ह्या
प्रांताच्या इतिहासावरून असं लक्षात येतं की सा-या संपर्कातून आणि
सांस्कृतिक-भाषिक देवाणघेवाणीतून मराठी भाषा घडत गेली.
मराठीची
काही वैशिष्ट्यं आहेत. त्यामधे लघुतम ध्वनींचे (म्हणजे स्वनांचे) काही विशेष आहेत.
उदाहरणार्थ, मूर्धन्य ध्वनी ट, ठ, ड, ढ, ण आणि ळ. तसंच च, छ, ज, झ, चे दोन वेगळे
उच्चार, इत्यादी. मूर्धन्य ध्वनी द्राविडी भाषांमधून संस्कृतमध्ये आले असावेत (सोमण, अंजली
पान ३९; साउथवर्थ पान ३१६). मराठीमध्ये ह्या ध्वनींचा वापर मुबलक प्रमाणात होतो.
त्यातला ‘ळ’ मात्र द्रविड कन्नड भाषेतून आला असावा. हिंदीच्या तुलनेत मराठीत खूपदा
मूर्धन्य ध्वनी वापरले जातात. जसं पर्दा- पडदा, जाना - जाणे, बाल –
बाळ, तिलक – टिळक. तसंच संस्कृत तत्भव शब्दांमधेही दिसतं, जसं
कंदमूल – कंदमूळ, काम्बल - कंबळ.
‘ह’ चे पुष्कळ शब्द अरबी किंवा फारसी भाषेतून आले आहेत. जसं
हजार, हवा, हरकत, हजर, हराम, हजामत, हाल
असे खूप शब्द आपल्याला सहज आठवतील. होळी, हळी, पोळी असे शब्द कानडीतून, तर
होम-हवन, हस्त, हरित, हित असे अनेक शब्द संस्कृतमधून मराठीत आले आहेत.
चहा मधला ‘च’, जप मधला ‘ज’, झेंडा मधला ‘झ’ संस्कृत मध्ये
आणि हिंदीतही आहेत. पण चमचा मधला ‘च’, जाड मधला ‘ज’ आणि झाड मधला ‘झ’ संकृत किंवा
हिंदी मध्ये नाहीत. ते मुख्यतः अरबी भाषेतून आणि काही द्राविडी भाषेतून आले
असावेत. नुक्ता असलेला ‘ज’ हिंदी आणि फारसी मध्ये आहे, उदा. जोर, जरा, दरवाजा,
इत्यादी. काही हिंदी आणि मराठी शब्द तेच आहेत, पण त्यांचे उच्चार मात्र वेगळे आहेत
– आज, चोर, जोर, चरखा, चटणी अशी अनेक उदाहरणं देता येतील. मराठीतच काही शब्द दोन
उच्चार आणि दोन अर्थ असलेले आहेत! जरा, जग, चार असे कितीतरी. झपाटा, झोप, झाकण
मधला ‘झ’ कुठून आला? चौकट, चौकी, चोर मधला ‘च’ कुठून आला? ह्याचं निश्चित उत्तर
मिळत नाही, पण हा ‘च’ तेलगु किंवा तुर्की भाषेतून आला असावा. तेलगु भाषकांच्या
म्हणण्या प्रमाणे असा ‘च’ तेलगु मध्ये होता, पण आजच्या तेलगूत तो नाही. तुर्की
भाषेतून चकमक (गारगोटी), चमचा असे शब्द आले आहेत. त्यांचा उच्चार आपण मराठीत
‘चौकी’मधल्या ‘च’सारखं करतो. पण हिंदीत मात्र ह्या शब्दांचा उच्चार ‘चहा’तल्या ‘च’
नी करतात.
आपण अरबी किंवा फारसी भाषांमधून केवळ शब्दच घेतले नाहीत, तर
त्यांचे उपसर्ग आणि शब्दयोगी अव्यये वापरून आपण कतीतरी नवीन शब्द मराठीत बनवले
आहेत. जसं बेनाम, बेदरकर, बेजबाबदार अशा फारसी शब्दांसारखे बेचव, बेभान, बेसूर,
बेशुद्ध, बेढब असे शब्द मराठीत तयार झाले. दगाबाज, वक्तशीर असे शब्द आपण मराठीत
वापरत असतो. बाज आणि शीर वापरूनही आपण शब्द निर्माण केले आहेत, जसं धोकेबाज, धडाकेबाज,
शिस्तशीर, पद्धतशीर. वक्तशीर वरून आपण वक्तशीरपणा असा शब्दही वापरतो! ‘गिरी’ लाऊन
तर आपण ‘गांधीगिरी’ असाही शब्द बनवला. नाकबूल, नाराजी ह्या धर्तीवर आपण नापीक,
नावड, इतकंच काय, पण इंग्रजी ‘पास’ च्या विरुद्धअर्थी ‘नापास’ असा शब्दही बनवला!
संस्कृत आणि फारसी मिळून तयार झालेलेही खूप शब्द आहेत. जसं
सेवा-चाकरी, बळ-जबरी, कागद-पत्र. किंवा उदाहरणार्थ, ‘शाही’ लाऊन झालेले
‘मराठशाही’, ‘लोकशाही’ असे शब्द. मराठी आणि संस्कृत शब्दांना फारसी प्रत्यय लाऊन
रोजच्या वापरात असलेले खूप मजेदार शब्द मराठीत तयार झाले. ‘मजेदार’ मधला ‘दार’ही
फारसी प्रत्यय आहे, तसा मराठीतला ‘पाणीदार’ आहे. तहसीलदार, मामलेदार, जमादार,
ठाणेदार हे फारसितले हुद्दे तर आपण जसेच्या तसेच वापरतो. जिल्हा, परगणा असे
साशाकीय विभाग दाखवणारे तसंच दवाखाना, कैदखाना, फरासखाना असे शब्दही मराठीत जसेच्या
तसेच वापरले जातात. ‘खाना’ (घर) लागून झालेले कितीतरी शब्द आपल्या वापरात आहेत,
जसं ‘कबाडखाना’. ‘अन्’, ‘आणि’ ह्या अर्थानं आपण वापरतो तो ‘व’ फारसीत आहे. तसाच ‘व’
उच्चारातल्या थोड्या फरकानं तुर्कीतही आहे.
गणितात वापरले जाणारे खूप शब्द अरबी-फारसीतून आलेले आहेत
जसे हजार, बेरीज, बाकी, बरोबर. शासनातले अनेक शब्द, जसे अर्ज, दाखला, कारवाई; विधी क्षेत्रातले दावा,
बेदखल, तबदील, जबाब, बयान; ह्याखेरीज बाब, बाबत, बाग, बातमी, बगल, शाब्बास, बर्फी,
मर्जी, मवाली, मस्त, नफा, मुदत, नालायक, हंगाम, बदल, बहार, बाजार, पेच, पेशा,
फायदा असे रोजच्या वापरातले अनेक शब्द. अशी असंख्य उदाहरणं मराठीमध्ये सापडतील. बाबा
म्हणजे वडील, प्रौढ माणूस ह्या अर्थांनी फारसीमध्ये हा शब्द आहे. आपण मराठीत बाबा
अशाच अर्थानी वापरतो.
श्रीपाद जोशी यांचा उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश किंवा कृ.
पां. कुलकर्णी यांचा व्युत्पत्तिकोश आणि त्याला जोडलेली श्रीपाद जोशी यांनी
संपादित केलेली पुरवणी आपण सहज चाळली तर अचंबा वाटावा, अशी अनेक उदाहरणं सापडतात.
झेंडा अरबी तर झेंडू कानडी, तसंच तंगी – तंग, ढोल – ढोली, असे शब्द अनुक्रमे अरबी
आणि कानडी आहेत!
आपल्याला माहीत आहे की, संस्कृतमधले असंख्य तत्सम शब्द
मराठीत आहेत; तसेच तत्भव शब्दही आहेत. तिथी, राशी, तसं च काही पक्षी, प्राणी,
धर्म, विज्ञान, तत्वज्ञान, कला अशा अनेक क्षेत्रात आपण संस्कृत शब्द वापरत असतो. इथे
उदाहरणं द्यावी तेव्हढी कमीच आहेत. कर्म, क्रोध, क्षति, क्षण, जन्म, टीका, कपट,
जप, जंतू, खंड, खिन्न, गंध, गर्भ, गर्व, गृह असे रोजच्या वापरातले अगणित शब्द.
तगर, डमरू, खिन्न, गदा, तरल, तंद्री, चरित्र, कपर्दिक असे शब्द वापरतांना हे
संस्कृत शब्द आहेत असं आपल्या लक्षातही येत नाही.
मराठीत कानडी शब्दही मुबलक प्रमाणात आहेत. विशेषतः नाती,
खाण-पिणं, सण-वार अशा संबंधीचे. आण्णा, अक्का, पुरणपोळी, उसळ, कोशिंबीर,
तूप, होळी, ही काही उदाहरणं. काही थोडे तमीळ शब्दही आपल्या वापरत आहेत. जसे आप्पा,
कुळीथ, पिठलं. तेलगूमधून आलेले ताळा, अनरसा. तांडा कानडी तर तांडेल तमिळमधून आला
आहे!
फ्रॅन्कलीन सी. साउथवर्थ ह्यांनी दक्षिण आशियाई भाषांच्या
इतिहासाचा अभ्यास करून उदाहरणांसह त्यांच्या ऐतिहासिक नात्याचा आढावा घेतला आहे.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रात इसविसनापुर्वीपासून द्रविड लोक राहत होते.
त्यामुळे आजही काही स्थानांची किंवा गावांच्या नावांचे काही प्रत्यय द्राविडी
भाषांमधून आलेले असावेत. एकूण आठ प्रत्ययांची उदाहरणं साऊथवर्थ देतात. ग्राम किंवा
गाव इंडोयुरोपीय स्रोताचे आहेत (पान ३१७). पण वाडा, वाडी, ऊर, वली, वाशी, असे प्रत्यय द्राविडी
भाषेतून आले असावेत, असं साऊथवर्थ म्हणतात. पश्चिम किनारा आणि त्याच्या उत्तरेकडच्याही
भागात इसवीसनापूर्वी काही हजार वर्षं द्राविडी वस्ती असावी असं मात त्यांनी मांडलं
आहे.
द्रविडी भाषांमधून आपण काही शब्द मराठीत घेतले, तसेच
पोर्तुगीजमधून बटाटा, पाव, पगार, आरमार, तिजोरी, असे शब्द घेतले. आणि तुर्की
भाषेतून चमचम, उर्दू, चमचा, कलाबूत असे शब्द मराठीत आले.
आता आपली जीवनपद्धती, जगण्याची रीत बदलल्यामुळे (life
style) रोजच्या वापरत असंख्य इंग्रजी शब्द आले. पाट जाऊन टेबल, चूल जाऊन गॅस,
फडताळं जाऊन शेल्फ. फ्रिज, ओव्हन, कुकरही आला. मोरी जाऊन बाथरूम, राखुंडी जाऊन
पेस्ट, ब्रश, टॉयलेट, बेसिन; बंब जाऊन गीझर आला. ट्यूब लाईट, दराचं लॅच, टीव्ही,
लॅपटॉप, आले. घरात जिथे बघाल तिथे इंग्रजी शब्द ‘दिसतात’. शर्ट, बटण, टेबल असे
शब्द मराठीनं इतके आपलेसे केलेत, की त्यांची बहुवचनं आणि सामान्य रूपंही मराठी
शब्दांप्रमाणे होतात!! ‘शर्टाला बटण लाव.’, ‘ती बटणं कुठे आहेत?’,
‘पुस्तक टेबलावर आहे’ इत्यादी. आंतरराष्ट्रीय नवीन खेळांबरोबर नवीन शब्द
आले. जसे टेनिस, टेबल टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, इत्यादी. वैश्विकरण, नवीन अर्थ
आणि वित्तप्रणाली, डिजिटल तंत्रज्ञान ह्यामुळे इंग्रजी शब्दांचा नवीन लोंढाच आला.
काही इंग्रजी शब्दांच्या उच्चाराचं मराठीकरण केलं – आता ‘टेबल’चाच उच्चार बघा ना! तसं
च काही इंग्रजी शब्द नव्यानं तयार झाले. postpone च्या धर्तीवर आपण ‘prepone’ तयार
केला. अशी खूप गमतीदार उदाहरणं देता येतील. भारतातली इंग्रजी भाषा आणि तिचं भारतातलं स्थान ह्यावर पुढे सविस्तर स्वतंत्र
मांडणी करावी लागेल.
मराठीचा संस्कृत, कानडी, फारसी
आणि इंग्रजी ह्या भाषांशी अतिशय निकटचा संबंध आला आहे. सर्वसाधारणपणे उच्चाराच्या
आणि शब्दांच्या बाबतीत द्राविडी भाषांचा, तसंच आरबी-फारसी भाषांचा प्रभाव दिसतो.
पण त्याहूनही अधिक प्रभाव संस्कृतचा दिसतो. व्याकरण, शब्द चालवणं, त्यांचे
प्रत्यय, वाक्यरचना ह्याबाबतीत मराठीचं इतर इंडो-युरोपीय भाषांशी आणि मुख्यतः संस्कृतशी
साधर्म्य दिसतं.
चित्रपट आणि समाज माध्यमांमुळे आजच्या
बोलण्याच्या लोकप्रिय पद्धतीत हिंदीचा चांगलाच प्रभाव जाणवतो. काही हिंदी शब्द आणि
वाक्यरचनांचा मराठीमध्ये ज्यास्त ज्यास्त उपयोग होत असलेला दिसतो.
मराठीची इतर अनेक भाषांबरोबर
मुबलक प्रमाणात भाषिक आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण झाली आहे आणि होत आहे. अशामुळे
मराठी भाषा एका बाजूनं खूपच समृद्ध होत गेली आहे, तिची क्षितिजं विस्तारली आहेत.
तर दुस-या बाजूनं मराठीचा एकूण वापरच कमी होत चालला आहे असं दिसतं.
मराठीची सद्यस्थिती
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी भाषा उच्चशिक्षणाचं
माध्यम होऊ शकली नाही. तिथे आपली पहिली गाडी चुकली. आता तर प्राथमिक शिक्षणही
इंग्रजीतून घेण्याचा प्रघात पडतोय. इंग्रजी शिकायला पाहिजे; पण निदान प्राथमिक
शिक्षण आणि शक्यतो शालेय शिक्षणही मराठीतून व्हावं असं थोड्याच लोकांना आवर्जून
वाटतंय असं दिसतं. शालेय शिक्षणाची माध्यम भाषा मराठी असेल, विविध क्षेत्रातल्या
मूळ संकल्पनांचा मराठीतून परिचय होईल, तर ते शब्द, ती परिभाषा मराठीत सहज वापरली
जाईल.
भारतीय भाषांमधालं साहित्य
बघितलं तर मराठी साहित्याची परंपरा समृद्ध आहे. पण त्याची घ्यावी तशी दखल
महाराष्ट्रातही घेतली जात नाही. साहित्य क्षेत्रात दलित आणि ग्रामीण वाङ्मयानं
मौलिक भर घातली, यात शंका नाही. आता स्त्रिया अधिक प्रमाणात आणि अधिक प्रगल्भपणे लिहू लागल्या आहेत. काही वैचरिक
साहित्य निर्माण झालं आहे. काही वैचारिक साहित्य पाश्चात्य सोशल थिअरी ,
लिंग्विस्टिक्स आणि लिटररी थिअरीजवर आधारित विवेचनात्मक असं आहे. आपल्याकडे
अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, ह्या विषयात चिंतन-मनन होतं, पण ते
बहुतांशी इंग्रजीत आणि क्वचितच मराठीमध्ये होतं.
ह्याखेरीज आपल्या असं जाणवतं की,
गेल्या कित्येक दशकात प्रभाव पडावा असे नवीन मूलभूत विचार, तत्वज्ञान, सिद्धांत,
ज्ञान मराठीमध्ये फार थोड्या प्रमाणात निर्माण झालं आणि मराठीत मांडलं गेलं आहे.
आणखी असंही होतं की, ‘आपल्याला
इंग्रजी येतं’ अशा समजुतीमुळे दुस-या भाषांमध्ये मांडले गेलेले नवे विचार किंवा
ज्ञान मराठीत भाषांतर करण्याची निकड कोणाला वाटत नाही. इतर भाषांतून भाषांतरीत
झालेले विचार इंग्रजीत उपलब्ध असतात. त्यामुळे मराठीच्या विकसनाचा हाही मार्ग
खुंटला आहे.
इंग्रजी,
जर्मन, फ्रेंच, रशियन, चीनी, जपानी आणि इतर अनेक भाषांमध्ये कोणत्याही क्षेत्रात
उच्च शिक्षण घेणं शक्य आहे. त्या भाषांमध्ये त-हत–हेचे आणि अनेक क्षेत्रातले
शब्दकोश आणि संदर्भकोश उपलब्ध असतात. तसंच ह्या भाषांमध्ये इतर भाषांमधल्या सर्व
क्षेत्रातल्या साहित्याचं, संशोधनाचं, विचारप्रणालींचं निकडीनं आणि तातडीनं
भाषांतर होत असतं.
मराठीचे शब्द कुठून आले,
ह्याची मांडणी करणारे व्यापक व्युत्पत्ती कोश मराठीत नाहीत. इथे वापरलेले संदर्भ
साहित्य कृ. पां. कुलकर्णी, चंद्रहास जोशी, श्रीपाद जशी यांनी व्यक्तिगत
अभ्यासातून तयार केलेले कोश आहेत. मराठी भाषेचा समग्र इतिहास आणि व्युत्पत्ती कोश
तयार करण्यासाठी एक स्वतंत्र शासकीय संस्था असली तर त्यात सातत्यानं त्यात भर पडत
राहील.
त्याचप्रमाणे नाहीसे होत
चाललेल्या शब्दांचंही संकलन झालं, तर त्यांची नोंद होत राहील.
जशी परिभाषा कोश निर्मितीसाठी
शासकीय यंत्रणा आहे, तशीच एक संस्था विविध विषयातली आणि विविध भाषांमधून मराठीत भाषांतर
करण्यासाठीही असेल, तर भाषांतर प्रक्रिया सातत्यानं आणि अव्याहत चालू राहील.
मराठीमध्ये वृद्धिंगत
होण्याची क्षमताही आहे, पण ती काळाबरोबर चालू शकलेली नाही. ह्याचं कारण म्हणजे मराठीचा
वापर मर्यादित राहिला आहे. विविध क्षेत्रात मराठीचा जितका वापर होईल आणि मराठीत
जितकं लिहिलं जाईल तितकी मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
म्हणजे मराठी भाषकांच्या मनातलं मराठीचं स्थान. आपल्याला आपल्या भाषेबद्दल प्रेम
आणि अभिमान वाटला, मराठी लोकांची भाषेसबंधी अस्मिता जागी झाली आणि मराठीला
प्रतिष्ठा प्राप्त झाली, तरच पुढच्या पिढीसाठी मराठी आकर्षक ठरू शकेल आणि पुढे विकसित
होत राहील.
संदर्भ
1. Dahake, Vasanta Abaji 1998
: “Amukha”, in : Sankshipta Marathi Vangmaykosh, G. R. Bhatkal foundation, Mumbai, P.
19 –119.
2. Joshi, Shripad (1997) Reprint 2017 : Urdu-Marathi-Hindi
Shabdkosh, Pune.
3. Kanade Mu. Shri. (1994) 2004(3) : “Marathicha Shabdasangraha”,
52 - 59. In Kanade, Mu. Shri (ed.) : Marathicha
Bhashik Abhyas, Aitihasik ani Varnanatmak.
4. Kanade,
Mu. Shri (ed.) (1994) 2004(3) : Marathicha
Bhashik Abhyas, Aitihasik ani Varnanatmak, Snehavardhan publishing house,
Pune.
5. Kulkarni,
K. P. Marathicha Vyutpattikosh with a suppliment by Joshi,
Shripad.
6. Molesworth’s
Marathi-English Dictionary (1875), 1996, Shubhada Saraswat Prakashan, Pune,
corrected 6th reprint.
7. Sankshipta
Marathi Vangmaykosh 1998, G. R. Bhatkal foundation, Mumbai.
8. Soman,
Anjali (1994) 2004(3) : “Bhashakul sankalpana ani marathicha udgam”, 25 – 51, in
Kanade, Mu. Shri (ed.) : Marathicha
Bhashik Abhyas, Aitihasik ani Varnanatmak,
9. Southworth,
Franklin 2005: Linguistic Archaeology of
South Asia, Routledge and Curzon, Tailor and Francis group, London and New
York. Here: chapter 9 : Maharashtrian place names and the
question of a Dravidian substratum, 288 – 321.
10. Paranjape,
P. N.; Mirajkar, Nishikant (year unknown) : Marathi Literature. An Outline,
Maharashtra.
फार सुंदर लेख आहे. येथून काही करता येण्यासारखे असल्यास कळव.
ReplyDeleteश्रीनिवास