“आपण वाचू या” : सहायक क्रियापद ‘ये’ (भाग १)


आपण वाचू या: सहायक क्रियापद ‘ये’ (भाग १)

प्रस्तावना
मराठी ही नामप्रधान आणि नामानुसरी भाषा आहे.[1] मराठीत क्रियापदांची संख्या कमी आहे, पण धातुसाधितांची संख्या मोठी आहे. धातुसाधितांचा वैविध्यपूर्ण वापर हे मराठीचं एक वैशिष्ट्य आहे. तसंच अनेक क्रियापदांचा सहायक क्रियापदं म्हणून वापर हे मराठीचं दुसरं वैशिष्ट्य आहे.
प्रस्तुतचा विषय आहे मराठीमधल्या ‘ये’ ह्या क्रियापदाचा सहायक क्रियापद म्हणून वापर आणि वाक्यरचना.
सहायक क्रियापदं 
आपल्याला माहीत असलेल्या पुष्कळशा भाषांमध्ये सहायक क्रियापदं वापरली जातात. इंग्रजीत कालवाचक क्रियापदं (have, be) आणि इतर can, must, let, see, go अशी क्रियापदंसुद्धा सहायक क्रियापदं म्हणून वापरात आहेत. जर्मन भाषेमधेही सहायक क्रियापदं आहेत आणि त्यांचा वापर शैलीच्या दृष्टीनं महत्वाचा ठरतो. मराठीत सहायक क्रियापदं वापरून केलेल्या रचनांचं प्रमाण मोठं आहे. आपल्या रोजच्या बोलाण्यात अशा रचना वारंवार येतात. हिंदीत सहायक क्रियापदांचा वापर मराठीपेक्षाही जास्त असावा असं दिसतं.[2]
मराठीमधली सहायक क्रियापदं
१.     मराठीमध्ये सहायक क्रियापदांचा एक गट काळ दाखवण्यासाठी वापरला जातो. ही क्रियापदं म्हणजे ‘आहे’ आणि ‘अस’. त्यांची रूपं कालानुरूप बदलतात. उदाहणार्थ, जात आहे, जात होतं, जात असेल, जाणार आहे, गेला होता, गेला असेल, इत्यादी.   
२.     दुसरा गट अर्थच्छटा, बोलणा-याचा दृष्टीकोन आणि इतर बारकावे दाखवण्यासाठी वापरतात. त्यांची संख्या खूप मोठी आहे.
दुस-या गटातली सहायक क्रियापदं धातुसाधितांबरोबर वापरली जातात. मराठीमध्ये धातुसाधितांचे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ : करू, करायला, करून, करताना, करण्यात, करत, करता इत्यादी.
तसंच किती तरी क्रियापदं मराठीत सहायक क्रियापदं म्हणूनही वापरली जातात.[3] उदाहरणार्थ : काढ, घाल, घे, चूक, जा, टाक, ठेव, थांब, दे, निघ, पाहिजे, बस, मिळ, ये, राह, हो, लाग, लाव, इत्यादी.
ही क्रियापदं जेव्हा मुख्य क्रियापदं म्हणून एकेकटी वापरली जातात, तेव्हा त्यांना एक किंवा अनेक (उदा. ‘लाग’) मूळ अर्थ असतात.
‘ये’ हे क्रियापद मुख्य क्रियापद म्हणून आणि सहायक क्रियापद म्हणूनही वापरलं जातं. उदाहरणार्थ, ‘स्नेहल रोज आमच्या घरी येते.’ ह्या वाक्यात ‘ये’ हे मुख्य क्रियापद आहे आणि त्याच्या मूळ अर्थानं ते इथे वापरलं आहे.
पण ‘ये’चा इतर काही रचनांमध्ये जेव्हा सहायक क्रियापद म्हणून वापर होतो, तेव्हा त्याचा मूळ अर्थ गौण ठरतो आणि त्याचं वाक्यरचनेतलं कार्य अधिक महत्त्वाचं ठरतं.

‘ये’चा सहायक क्रियापद म्हणून वापर
स्नेहल रोज पोहायला येते. ती रोज क्रिकेट खेळायला येते.
स्नेहलला पोहायला येतं. स्नेहलला पोहता येतं. तिला क्रिकेट खेळता येतं.

स्नेहल कशाला येते? पोहायला, खेळायला. तिला काय येतं? पोहता, खेळता. संभाषणात ‘पोह’, ‘खेळ’ ही क्रियापदं अर्थाच्या दृष्टीनं मुख्य कारण ती नवीन माहिती देतात. ती धातुसाधिताच्या रूपात आली आहेत आणि अविकारी आहेत. त्यांचं रूप बदलत नाही. संभाषणाच्या गरजेप्रमाणे आपण वेगवेगळी क्रियापदं –आयला किंवा –ता प्रत्यय लावून वापरू शकतो. ‘ये’च्या मूळ अर्थापेक्षा इथे त्याचं व्याकरणातलं, ह्या वाक्यरचनेतलं कार्य अधिक महत्त्वाचं ठरतं. इथे ‘ये’ हे क्रियापद आपण ‘चालवतो’. ते वाक्यरचना पूर्ण करण्यासाठी सहायक ठरतं. म्हणून ते सहायक क्रियापद.
सहायक क्रियापद वापरून वाक्यरचना करणं हा मराठीचा स्वभाव आहे. अशा प्रकारची बहुतेक वाक्यं सहायक क्रियापद वगळून, मुख्य क्रियापद चालवून पूर्ण करता येतात; पण त्यामुळे अर्थच्छटा बदलते. काही वाक्यांमध्ये सहायक क्रियापद वगळल्यास अर्थ पूर्णपणे बदलतो. उदाहरणार्थ,

निनादला पोहायला येतं.
तिला मराठी लिहिता येत नाही.
त्याला ह्या गोष्टीचा योग्य फायदा करून घेता येत नाही.

वरच्या तीनही उदाहरणांमध्ये ‘ये’ चा वापर ‘शक’ ह्या अर्थानं केला आहे. इथे मुख्य क्रियापद चालवून वाक्य पूर्ण करता येत नाही कारण अर्थ पूर्णपणे बदलतो आणि वाक्यरचना अपूर्ण राहते.
क्रियापदाच्या कार्य आणि अर्थ ह्या दोन बाजू आहेत. मुख्य क्रियापद अर्थवाही, सहायक कार्यवाही. आपण ‘ये’ ह्या क्रियापदाची काही उदाहरणं विस्तारानं बघू या.

मी नेहमी असंच ऐकत आलो आहे.
‘ऐकत’ मुख्य, ‘आलो’ सहायक, ‘आहे’ कालवाचक सहायक.

ते ही परंपरा आजपर्यंत जपत आले आहेत.
‘जपत’ मुख्य, ‘आले’ सहायक, ‘आहेत’ कालवाचक सहायक.

ती वसतिगृहातून पळून आली.
‘पळून’ मुख्य, ‘आली’ सहायक.

नोकरीत त्रास होत असेल तर त्यानं सरळ इकडे निघून यावं.
‘निघून’ मुख्य, ‘यावं’ सहायक.

त्याला लवकरच कळून आलं की हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही.
‘कळून’ मुख्य, ‘आलं’ सहायक.

तुला तसा फोन करता आला असता.
‘करता’ मुख्य, ‘आला’ सहायक, ‘असता’ कालदर्शक सहायक.

आम्ही सोनूला पाळणाघरातून घेऊन येतो.
‘घेऊन’ मुख्य, ‘येतो’ सहायक.

आपण सोनूला पाळणाघरातून घेऊन येतो.
‘घेऊन’ मुख्य, ‘येतो’ सहायक.

चल, आपण सोनूला पाळणाघरातून घेऊन येऊ.
‘घेऊन’ मुख्य, ‘येऊ’ सहायक.

आपण परत एकदा लवकरच ह्या जागी येऊ या.
‘येऊ’ मुख्य, ‘या’ सहायक.

चल,आपण सोनूला पाळणाघरातून घेऊन येऊ या.
‘घेऊन’ आणि ‘येऊ’ मुख्य, आणि ‘या’ सहायक. ‘घेऊन’ दोन पूर्ण वाक्य जोडतं. आपण ...घेऊ आणि येऊ ...

पण : तो पळत पळत आला.
‘पळत’ क्रियाविशेषण, ‘आला’ मुख्य क्रियापद   

ती पहाटे मैदानावर पळून चहाला आमच्याकडे आली.
‘पळून’ हे रूप इथे दोन पूर्ण वाक्य जोडतं. ‘पळून’ आणि ‘आली’ दोन्ही मुख्य. 

तो स्टेशनवर जाता जाता आमच्याकडे आला.
‘जाता जाता’ क्रियाविशेषण, ‘आला’ मुख्य क्रियापद.

तो स्टेशनवर जाताना आमच्याकडे आला.
‘जाताना’ क्रियाविशेषण, ‘आला’ मुख्य क्रियापद.

तो स्टेशनवर जाताना आमच्याकडे येऊन गेला.
‘जाताना’ क्रियाविशेषण, ‘येऊन’ मुख्य क्रियापद. ‘गेला’ सहायक.

चार दिवस इथे आहेस ना? मग येऊन जा आमच्याकडे.
‘येऊन’ मुख्य क्रियापद. ‘जा’ सहायक.

अशा परीस्थित त्यांनी माझ्याकडे येऊ नये हे बरं.
‘येऊ’ मुख्य ‘नये’ नकारार्थी सहायक

काही अडचण आली तर तिनं माझ्याकडे यावं.
‘आली’ आणि ‘यावं’ दोन वाक्यातली दोन मुख्य क्रियापदं

‘ये’ कर्मणी
त्याच्या कंपनीत एकदम असं जाहीर करण्यात आलं.
‘करण्यात’ मुख्य, ‘आलं’ सहायक.

सरकारी सूत्रांकडून असं सांगण्यात आलं.
‘सांगण्यात’ मुख्य, ‘आलं’ सहायक.

‘आपण’ ह्या सर्वनामाबरोबर ‘ये’चा वापर   
मराठीमध्ये ‘आपण’ हे प्रथम पुरुष बहुवचनाचं समावेशक सर्वनाम म्हणून वापरलं जातं. तेव्हा त्यात ऐकणारा किंवा ज्याच्याशी बोलणं होतं, तो माणूस किंवा ती माणसंही समाविष्ट असतात.

आम्ही आणि आपण अशी दोन प्रथम पुरुषातली बहुवचनी सर्वनामं इतर भाषांमध्ये आढळत नाहीत. ‘आपण’सारखं समावेशक सर्वनाम इंग्रजी, जर्मन किंवा हिंदीमध्ये नाही.

·         समावेशक प्रथम पुरुषी बहुवचनी समावेशक सर्वनाम ‘आपण’ हे मराठीचं एक वैशिष्ट्य आहे.

‘आपण’ द्वितीय पुरुषात आदरार्थी सर्वनाम म्हणून वापरलं जातं. तेव्हा ‘तुम्ही’ आणि ‘आपण’बरोबर क्रियापदाची सर्व रूपं सारखीच असतात.
 ‘आपण’ जेव्हा प्रथम पुरुषात समावेशक म्हणून वापरलं जातं, तेव्हाही क्रियापदाची सर्व काळातली ‘आम्ही’ आणि ‘आपण’ची रूपं सारखीच असतात. उदाहरणार्थ, ‘आम्ही / आपण सकाळी चालून येतो, तेव्हा...’, ‘आम्ही / आपण सकाळी चालून आलो, तेव्हा...’, आम्ही / आपण सकाळी चालून येऊ, तेव्हा...’.

‘आपण’चा समावेशक वापर आणखी एक वापर
‘आपण’चा समावेशक वापर आणखी एका नेहमी वापरल्या जाणा-या रचनेत होतो. तिथे ‘आम्ही’ हे सर्वनाम वापरता येत नाही. उदाहरणार्थ,

आपण औषध आणू या.
आपण औषधं आणून देऊ या.

·         ह्या वाक्यरचनेत ‘ये’ ह्या सहायक क्रियापदाचं फक्त ‘या’ हे एकच रूप वापरलं जातं.

आम्ही आधी औषध आणू या.* (वापरात नाही)
आम्ही आधी आईला औषध आणून देऊ या.* (वापरात नाही)

वरच्या उदाहरणांमध्ये ‘आम्ही’ आणि ‘आपण’ बरोबर क्रियापदाची भविष्यकाळातली रूपं सारखीच आहेत.
पण ‘आम्ही’ ह्या सर्वनामाबरोबर ‘आम्ही ......देऊ या’*, ‘आम्ही ......आणू या*’ अशी रचना संभाव्य नाही.  

·         ‘आपण......+ऊ या’ ही मराठीमधली एकक रचना आहे.

‘ये’ क्रियापदाचं ‘या’ हे रूप 
‘ये’ क्रियापदाचं ‘या’ हे रूप फक्त दोन ठिकाणी वापरलं जातं. ‘तुम्ही’ आणि ‘आपण’ ह्या द्वितीय पुरुषी सर्व नामांबरोबर अज्ञार्थात :
‘तुम्ही परत आमच्याकडे या.’
‘आपण परत आमच्याकडे या.’

·         ‘या’ हे आज्ञार्थाचं रूप आहे.
·         तेच रूप ‘आपण ... +ऊ या’ ह्या प्रथम पुरुषातल्या समावेशक रचनेत वापरलं जातं.
·         ‘...+ऊ या’ ही रचना फक्त ‘आपण’ ह्या समावेशक प्रथमपुरुषी सर्वनामाबरोबरच होऊ शकते.
·         त्यामुळे ह्या रचनेत क्रियापदाचं ‘या’ हे एकमेव रूप संभावतं.

नकारार्थी रचना
तुम्ही फिरून या - तुम्ही फिरून येऊ नका. (द्वितीय पुरुष आज्ञार्थ)
आपण फिरून या – आपण फिरून येऊ नका. (द्वितीय पुरुष आज्ञार्थ)
आपण फिरून येऊ – आपण फिरून येणार नाही (प्रथम पुरुष समावेशक भविष्य. ठाम नकारार्थी)
आपण फिरून येऊ या - आपण फिरून येणार नाही. (प्रथम पुरुष समावेशक ठाम नकारार्थी)
आपण फिरून येऊ या - आपण नको फिरून येऊ या. (प्रथम पुरुष समावेशक सौम्य नकारार्थी)

‘आपण फिरून येऊ या’ ह्या वाक्याचं नकारात्मक रूप ‘आपण नको फिरून येऊ या’ असं होतं. द्वितीय पुरुषात ‘तुम्ही / आपण नको येऊ या’*  अशी रचना होऊ शकत नाही.

·         ‘आपण ... –ऊ या’ ही मराठीमधली वैशिष्ट्यपूर्ण एकक रचना आहे.
·         तशीच, ‘आपण ... नको –ऊ या’ ही नकारार्थी रचनाही एकक आहे.

टीप
मला आधी झाडावरून आंबे काढू तर देत*.
मला आधी झाडावरून आंबे काढू तर द्यात.*
मग आढी घालू यात*.

वरच्या उदाहरणांमधली अधोरेखित रूपं अलीकडे संभाषणात ऐकायला येतात. ‘मला आधी झाडावरून आंबे काढू तर देत*. ह्या वाक्यात ‘तू’ हे सर्वनाम गृहीत धरलेलं आहे. अज्ञार्थात ‘तू’ बरोबर ‘दे’ हे रूप यायला पाहिजे. बहुवचन वापरायचं असेल, तर ‘तुम्ही’ बरोबर ‘मला आधी झाडावरून आंबे काढू तर ‘द्या’, असं रूप होईल. ‘मग आढी घालू यात’ * इथे ‘आपण’ हे सर्वनाम गृहीत आहे आणि ‘घालू या’ हे रूप अभिप्रेत आहे.
मराठी क्रियापदांच्या काही बहुवचनी रुपात ‘त’ हा प्रत्यय वापरात आहे. उदाहरणार्थ, ‘आम्ही आहोत’, ‘तुम्ही आहात’,  ‘ते जातात’, किंवा ‘तुम्ही गेलात तरी चालेल’ आणि विद्यर्थात ‘ते जावोत’, ‘तुम्ही/ आपण जावंत’ इत्यादी. अशा रूपांमुळे वरच्या उदाहरणात ‘दे’, ‘द्या’ आणि ‘या’ बरोबर ‘त’ समाविष्ट केला जात असावा. पण त्याला व्याकरण दृष्ट्या आधार नाही.
मुख्य म्हणजे आज्ञार्थामध्ये ‘दे’ आणि ‘ये’ सोडून इतर क्रियापदांना ‘त’ लावल्याचं आढळत नाही. उदाहरणार्थ, ‘छत्री बरोबर ने / न्या’, ‘औषधं बरोबर घे/घ्या’, ‘नातवाला छान गोष्टी संग/ सांगा’, ‘मुलांना छान गोष्टी शिकव/ शिकवा’, ‘तुझी/ तुमची खबरबात नियमित कळवत जा’ अशा वाक्यांमध्ये कधी ‘त’ लावलेला दिसत नाही. म्हणून ‘देत’, ‘द्यात’ आणि ‘यात’ ही रूपं बोली भाषेतले अपवाद आहेत एवढंच फक्त म्हणतात येईल.



[1] बडवे, नीती : “नामानुसरी मराठी”, भाषा आणि जीवन, हिवाळा, २०१५, ३३:१, पान क्र. १८-२३.
[2] नेस्पिताल, हेल्मुट: हिंदी क्रिया-कोश, लोकभारती प्रकाशन, अलाहाबाद, १९९७.
[3] ‘जा’ आणि ‘ये’ ही क्रियापदं कर्मणी राचनांमध्येही वापरली जातात. पण हा प्रस्तुत चर्चेचा विषय नाही.

Comments

Popular posts from this blog

स्वनिमविचार

भाषेचं रंग-रूप : भाषा, संकल्पना आणि संस्कृती

भारत आणि बहुभाषिकता