स्वनिमविचार
स्वनिमविचार
प्रस्तुत
चर्चेच्या पहिल्या भागात मुख्यत्वे करून ‘मराठीमधली अर्धी किंवा हलंत व्यंजनं
स्वनिम असतात का’ ह्या विषयीची, तर दुस-या भागात स्वर-स्वनिमांची मांडणी आहे.
दोन
शब्दांच्या अर्थात एकाच ध्वनीमुळे फरक पडतो, तेव्हा तो ध्वनी त्या भाषेतला स्वनिम
असतो. उदाहरणार्थ, मराठीमधला एक शब्द ‘तार’. आता आपण ‘त’
च्या जागी ‘म’, ‘स’, ‘भ’, ‘च’, ‘व’ असे ध्वनी घातले तर वेगळे अर्थ असलेले शब्द
तयार होतात. ‘तार’ प्रमाणे मार, सार, भार, चार, वार इत्यादी. ‘तार’ = त + आ + र
किंवा ‘मार’ = म + आ + र मध्ये हे तीन ध्वनी आहेत. ह्या शब्दांमध्ये ‘आ + र’ हे
समईक ध्वनी आहेत. ‘आ + र’ ह्या परिसरात ‘त’ च्या जागी ‘म’ घातला तर एक नवीन शब्द
तयार होतो. अर्थ बदलतो. म्हणून ‘त’ आणि ‘म’ हे मराठीमधले स्वनिम आहेत. ‘तार’ आणि ‘मार’
सारख्या एकाच ध्वनीचा फरक असलेल्या शब्दांच्या जोडीला शास्त्रीय भाषेत ‘लघुतम
युग्म’ म्हणतात. कोणता ध्वनी स्वनिम आहे, हे ठरवण्यासाठी लघुतम युग्मांचा उपयोग
होतो. मराठीमधले तार, मार, सार, भार, चार, वार अशा शब्दांमधल्या कोणत्याही दोन शब्दांचं
एक लघुतम युग्म होऊ शकतं. त्यातून ‘आ + र’ हे समाईक ध्वनी वेगळे केल्यावर त, म, भ,
स, च, व हे ध्वनी उरतात. ते अर्थामध्ये बदल करतात. म्हणून ते सगळे मराठीतले स्वनिम
आहेत, असं दिसतं. अशी कित्येक लघुतम युग्मं प्रत्येक भाषेत असतात.
इंग्रजीमधेही
अशी उदाहरणं आहेत. sit आणि fit ह्या शब्दांमध्ये अनुक्रमे स + इ + ट आणि fit = फ +
इ + ट असे ध्वनी आहेत. त्यांच्या अर्थामध्ये ‘स’ आणि ‘फ’मुळे फरक पडतो. म्हणून ‘स’
आणि ‘फ’ हे इंग्रजीतले स्वनिम आहेत. तसंच back आणि lack हेही लघुतम युग्म आहे.
back = ब + अॅ + क आणि lack = ल + अॅ + क ह्या जोडीत ‘ब’ आणि ‘ल’ हे स्वनिम आहेत. ही
आणि अशी अनेक लघुतम युग्मं इंग्रजीत आणि इतर भाषांमध्येही असतात.
इंग्रजीत
अक्षरांना ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ अशी नावं आहेत. हे उच्चार नाहीत. इंग्रजीत
प्रत्येक व्यंजन आणि स्वर वेगवेगळे लिहिले जातात. वरच्या उदाहरणात ‘s’, ‘f’, ‘b’,
‘l’ ही स्वरविरहीत व्यंजनं आहेत. तरीही त्यांचा उच्चार होतो. हे इंग्रजीतले
स्वतंत्र ध्वनी आहेत आणि ते अर्थात फरक करतात. म्हणून ते इंग्रजी भाषेतले स्वनिम
आहेत.
हेच
मराठीतही होतं. आपण देवनागरी अक्षरं शिकतो, तेव्हा ते स्वरमिश्रित वर्ण (syllables)
असतात. क, ख, ग, घ, ही नावं नाहीत, तर उच्चार आहेत. आपली अक्षरं स्वरमिश्रित
वर्ण असल्यामुळे स्वर वेगळे करून दाखवावे
लागतात. मराठीमधले त्, म्, भ्, स्, च्, व् हे स्वरविरहीत स्वतंत्र ध्वनी आहेत. त्यांचा
उच्चार होतो आणि ते शब्दाच्या अर्थात फरक करतात. म्हणून ते मराठीमधले स्वनिम आहेत.
काही भाषाशास्त्रज्ञ मराठीतले व्यंजन-स्वनिम पाय मोडूनच दाखवतात.
व्यंजनाचा
उच्चार त्यात स्वर मिसळूनच करावा लागतो, असं आपण मानतो. परंतु स्वनिम किंवा
स्वनिम-विचारामध्ये उच्चारित ध्वनिंचाच समावेश करता येतो. पाय मोडलेल्या
व्यंजनांचा उच्चार शक्य नसेल, तर अशी व्यंजनं स्वनिम होऊ शकणार नाहीत. आपण ती कशी
लिहितो ह्याचा संबंध स्वनिम-विचारात येत नाही; तर आपण ती कशी उच्चारतो, एवढाच
विचार स्वनिम ठरवताना केला जातो.
ह्याप्रमाणे
‘फक्त’ आणि ‘फस्त’ ह्या लघुतम युग्मामध्ये ‘क’ आणि ‘स’ हे समान परिसरात आलेले आहेत.
आपण लिहितांना ‘क’ आणि ‘स’ अर्धी व्यंजनं म्हणून लिहीत असलो, तरी त्यांचा उच्चार
होतो. ते दोन स्वतंत्र ध्वनी म्हणून आणि स्वनिम म्हणून अस्तित्वात आहेत.
इंग्रजीतही
ह्याप्रमाणे उदाहरणं आहेत. bloom आणि gloom ह्या उदाहरणांमध्ये मराठीच्या नियमांनुसार ‘ब’ आणि ‘ग’ अर्धे आहेत, असं
म्हणता येईलही; परंतु अर्ध व्यंजन ही संकल्पना इंग्रजीत आढळत नाही. ह्या दोन
शब्दांमध्ये ‘ब’ आणि ‘ग’ हे दोन ध्वनी समान परिसरात येतात. म्हणून ते स्वनिम आहेत.
ती अर्धी व्यंजनं आहेत, असं मानलं जात नाही आणि ‘ब’ पूर्ण आणि ‘ब’ अपूर्ण किंवा ‘ग’
पूर्ण आणि ‘ग’ अपूर्ण असं लिहिलंही जात नाही.
व्यंजनान्त
शब्द
मराठीमध्ये
बरेच शब्द व्यंजनान्त असतात. असे शब्द शेवटच्या अक्षरातला ‘अ’ गळून उच्चारले
जातात. त्याप्रमाणे वरचे ‘तार’, ‘मार’, ‘सार’ वगैरे सर्व शब्द व्यंजनान्त आहेत.
म्हणून मराठीच्या परंपरेप्रमाणे शेवटचा ‘र’ हलंत किंवा अर्ध व्यंजन आहे असं मानलं
जातं. ‘र’ स्वरविरहीत आहे. पण त्याचा उच्चार होतो. ‘तार’ आणि ‘ताक’ अशा लघुतम
युग्माच्या आधारे ‘र’ एक स्वतंत्र ध्वनी आणि स्वनिम आहे हे दिसून येतं.
ह्याप्रमाणे
sit आणि fit मधला शेवटचा ‘ट’ किंवा back आणि lack मधला ‘क’ हे स्वरविरहीत ध्वनीच
आहेत. मराठीच्या परंपरेप्रमाणे हलंत किंवा अर्ध व्यंजन. परंतु त्यांचा उच्चार
होतो. त्यामुळे ते स्वतंत्र ध्वनी आहेत. back आणि bat किंवा lack आणि lap तसंच sit
आणि sick अशा लघुतम युग्मांच्या सहायानं ह्या शब्दांच्या शेवटी येणारे अनुक्रमे ‘क’
– ‘ट’, ‘क’ – ‘प’, ‘ट’ – ‘क’ हे स्वनिम आहेत असं दाखवता येतं.
म्हणजे
मराठीतलं काय किंवा इंग्रजीतलं काय, पाय मोडलेलं किंवा अर्ध व्यंजन ह्या
संकल्पनेला स्वनिम-विचारात (phonology) स्थान नाही. स्वरविरहीत निव्वळ व्यंजनं ही स्वतंत्र
ध्वनी आणि स्वनिम असतात. निव्वळ व्यंजनं म्हणजे काय हे स्पष्ट होण्यासाठी
international phonetic script चा चांगला उपयोग होतो. अशी उदाहरणं शेवटी दिली
आहेत.*
शब्दांचा
व्यंजनान्त उच्चार ही मराठीची लकब आहे.
मराठी
शब्दातला शेवटचा ‘अ’ वगळून त्या शब्दाचा व्यंजनान्त उच्चार होतो. हे मराठीचं एक
वैशिष्ट्य आहे.
हलंत
मुळात
‘हलंत’ ही संकल्पना संस्कृतमधून आलेली असावी. संस्कृतमध्ये ‘अ’[ə]
शेवट असलेले शब्द आहेत. त्यांच्या उच्चारात ‘अ’ प्राय: समाविष्ट केलेला असतो. उदाहरणार्थ,
‘अमेय’, ‘देव’, ‘नाद’, ‘जल’, ‘वर’ असे शब्द किंवा ‘सिद्धार्थ’, ‘गर्व’ असे शब्द. ज्या
शब्दात शेवटचा ‘अ’[ə]
उच्चारला जात नाही ते शब्द संस्कृतमध्ये हलंत वापरून लिहिले जातात. उदाहरणार्थ, यत्,
तत्, आवाम्, वयम्, जप्, वद्, आगच्छत्, आसन्, असे किती तरी.
लक्षात
घेण्याची गोष्ट ही, की ह्या सर्व हलंत व्यंजनांचा उच्चार होतो. तसंच मराठीमध्येही व्यंजनान्त
शब्दातल्या शेवटच्या स्वरविरहीत व्यंजनाचा उच्चार आपण करतो. असे शब्द आपण मराठीत हलंत
देऊन किंवा पाय मोडून लिहीत नाही. त्याची गरजही नाही, कारण मराठीमध्ये तीच उच्चाराची
पद्धत आहे. मराठीत ‘गर्व’’ किंवा ‘सिद्धार्थ’ असे बरेच तत्सम शब्द आपण शेवटचा ‘अ’
धरून उच्चारतो. हिंदीत मात्र ‘गर्व’ किंवा ‘सिद्धार्थ’ हे शब्द सर्रास शेवटचा ‘अ’
गाळून उच्चारले जातात. नवी मराठी भाषक पिढी हिंदीच्या प्रभावाखाली ‘सिद्धार्थ’
मधला ‘अ’ गाळते.
हलंत
किंवा अर्ध व्यंजन याला स्वनिम-विचारात (phonology) मध्ये वेगळं स्थान नाही.
स्वर-स्वनिम
मराठीमधलं
आणखी एक उदाहरणं बघू.
१.
वारं जोरात
वाहातंय. नपुसकलिंगी एक.व.
आणि
२.
वारे जोरात
वाहातायत. ‘तो वारा’ चं पुल्लिंगी अ.व.
वारं
= व + आ + र + अ आणि वारे = व + आ + र + ए म्हणजे ह्या दोन शब्दांमध्ये प्रत्येकी
४ ध्वनी आहेत. समान परिसरातले शेवटचे ध्वनी अनुक्रमे ‘अ’ आणि ‘ए’ हे अर्थामध्ये फरक
करतात. म्हणून ‘अ’ आणि ‘ए’ हे दोन स्वनिम आहेत.
ह्या
संदर्भात मराठीतलं आणखी एक उदाहरण बघू.
३.
आठवड्याचे सात वार
आणि
४.
जोरात वाहणारं वारं
ह्या
उदाहरणांमध्ये ‘वार’ आणि ‘वारं’ ह्या दोन अधोरेखित शब्दांना लघुतम युग्म म्हणता
येणार नाही, कारण त्यांच्यामध्ये ध्वनींची संख्या वेगवेगळी आहे. वार = व + आ +
र आणि वारं = व + आ + र + अ. ह्याचा अर्थ तिस-या
उदाहरणात ३ ध्वनी आहेत आणि चौथ्यामध्ये ४ ध्वनी आहेत. म्हणून हे लघुतम युग्म नाही.
आणखी
एक उदाहरण :
५.
वारे जोरात वाहात आहे. नपुसकलिंगी एक.व.
आणि
६.
वारे जोरात वाहात आहेत. ‘तो वारा’
चं पुल्लिंगी अ.व.
ह्या
दोन्ही उदाहरणांमध्ये ‘वारे’ = व + आ + र + ए’ असा सारखाच उच्चार होतो. त्यात समान
ध्वनिसंख्या आहे. ‘वारे’चे
दोन अर्थ होतात; पण इथे कोणत्याही लघुतम ध्वनिमुळे हा फरक होत नाही. दोन्ही शब्द
त्याच स्वनिमांचे बनलेले आहेत. म्हणून हे दोन वेगळे अर्थ असलेले समरूप (homonym) शब्द आहेत.
मराठीमध्ये
‘पाऊस’ किंवा ‘देऊळ’ सारख्या शब्दात ‘ऊ’ शब्दाच्या मधे येतो. तसाच ‘सराईत’ किंवा
‘पाईक’ मध्ये ‘ई’ शब्दाच्या मधे येतो. पण ‘अ’ आणि ‘आ’ हे स्वतंत्र स्वर शब्दांच्या
मधे येऊ शकत नाहीत. उर्दूमधे मात्र ‘अ’ आणि ‘आ’ शब्दाच्या मधे येऊ शकतात.
उदाहरणार्थ, शअब (खड्डा), शफाअत (शिफारस), शफीअ (दुस-यासाठी शिफारस करणारा). आपल्या
संगणकाच्या देवनागरी कळा बरेचदा असे शब्द लिहूही शकत नाहीत. कारण ‘अ’ आणि ‘आ’ हे आधीच्या
व्यंजनात मिसळले जातात. त्यामुळे हे उर्दू शब्द लिहिताना अक्षरं सुटी लिहून जोडावी
लागतात!
ह्या
कारणानं ‘अ’ आणि ‘आ’बरोबर लघुतम युग्मं ही स्वरांनी सुरु होणारीच असतात. ‘अशी’ – ‘कशी’
हे लघुतम युग्म नाही. कारण ह्या दोन शब्दात अ + श + ई आणि क + अ + श + ई अशी ध्वनिसंख्या अनुक्रमे ३ आणि ४ आहे. परंतु ‘अशी’
- ‘उशी’, ‘अडता’ - ‘उडता’, ‘आघाडी’ – ‘उघाडी’, ‘आकार’ – ‘उकार’, ‘आग’ – ‘ऊग’, ‘आज’
– ‘इजा’, अशी लघुतम युग्मं मराठीत आहेत.
–हस्व
आणि दीर्घ स्वरांमुळे बनलेलीही लघुतम युग्मं मराठीत आहेत. बरेचदा ह्या शब्दांचा
उगम वेगवेगळा असतो. उदा. ‘शिला’ आणि ‘शीला’. ह्या दोन शब्दात ‘इ’ आणि ‘ई’ हे समान
परिसरात येतात आणि अर्थात फरक करतात, म्हणून ‘इ’ आणि ‘ई’ हे मराठीतले दोन स्वनिम
आहेत.
इतर
भाषांमध्येही –हस्व आणि दीर्घ स्वरांनी बनलेली लघुतम युग्मं असतात. जर्मन भाषेतली
अनेक उदाहरणं देता येतील. ‘im – ihm’ (इम – ईम); ‘in – ihn’ (इन- ईन) इत्यादी.
इंग्रजीमध्ये full आणि fool किंवा fill आणि feel अशी
–हस्व आणि दीर्घ स्वर-स्वनिमंची अनेक उदाहरणं
आहेत. –हस्व आणि दीर्घ स्वर समान परिसरात येतात ही संकल्पना नवी नाही.
मराठीमध्ये
‘अशी’ आणि ‘ऐशी’ हे मात्र लघुतम युग्म मानता येत नाही. कारण ‘अ’ आणि ‘इ’ हे दोन
स्वर मिळून ‘ऐ’ होतो. तसंच ‘अ’ आणि ‘ऊ’ मिळून ‘औ’ होतो. म्हणून ‘हास’ आणि ‘हौस’
हेही लघुतम युग्म होऊ शकत नाही. कारण एका शब्दात एक आणि दुस-यात दोन स्वर आहेत.
त्यांचा उच्चार एकत्रित केला जातो. म्हणजे ते diphthong आहेत. त्यामुळे ह्या जोड्यांमध्ये
ध्वनिसंख्या सारखी नाही.
स्वनांतरं
मराठीमध्ये
‘अ’चे उच्चार वेगवेगळ्या लांबीचे असतात. माझं आवडीचं उदाहरण आहे ‘हडपसर’. ‘प’ आणि
‘र’ चा अति-हस्व उच्चार होतो. ‘ह’ मध्यम लांब आणि ‘ह’पेक्षा ‘ड’ अधिक लांब, असा
उच्चार आपण करतो. परंतु वेगवेगळ्या लांबीचे ‘अ’ समान परिसरात आलेले आढळत नाहीत.
त्यांचं लघुतम युग्म सापडत नाही. ते अर्थामध्ये फरक करत नाहीत. म्हणून ते स्वनिम
नाहीत. ती एकाच ‘अ’ची वेगवेगळी रूपं किंवा वेगवेगळ्या छटा आहेत. म्हणून ती स्वनांतरं
आहेत.
‘अ’चे
कमी-जास्त लांब उच्चार हे मराठीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
एकामागोमाग
एक ‘अ’चा उच्चार करणं पाश्चात्य लोकांना शक्य होत नाही. अशा ध्वनिरचनेचे शब्द
इंग्रजी आणि जर्मन भाषेत आढळत नाहीत. मात्र आपल्याकडे ‘वारे’ शब्दाच्या उच्चारात
‘ए’ जाऊन लांबवलेला ‘अ’ येतो, तसा जर्मन शब्दातही येतो. त्याला ‘schwa’ म्हणतात.
ह्या लकबीमुळे माझ्या नावाचा उच्चार जर्मन लोक ‘बड्वं’ असा करतात!
कोणत्याही
भाषेमध्ये एक स्वनिम प्रत्येक शब्दात वेगळ्या ध्वनींच्या संपर्कात येतो. अशावेळी
स्वनिमांच्या उच्चारात थोडा फरक पडतो. ‘अर्पिता’, ‘अपहरण’ असे शब्द उच्चारताना, र,
इ, ह, ह्या सन्निध ध्वनिंमुळे ‘प’ च्या उच्चारात सूक्ष्म फरक पडतो. तो अर्थाच्या
दृष्टीनं महत्त्वाचा नसतो. ‘आपलं’ आणि ‘आपल्या’ ह्या शब्दांच्या उच्चारात ‘ल’चा
उच्चार ‘अ’ आणि ‘य’मुळे थोडा वेगळा होतो. उच्चारातल्या ह्या फाराकांसाठी लघुतम
युग्मं सापडू शकत नाहीत आणि ते अर्थात फरकही करत नाहीत. अशा वेळी त्यांना स्वनांतरं
म्हणतात.
मराठीतले
अनेक स्वनिम इंग्रजी आणि जर्मन मध्ये नाहीत आणि ह्या दोन भाषातले किती तरी स्वनिम
मराठीत नाहीत. शिवाय एका भाषेतले दोन स्वतंत्र स्वनिम दुस-या भाषेत स्वनिमच असतात
असं नाही. ती स्वनांतरं असू शकतात. उदाहरणार्थ, मराठीतले ‘प’ आणि ‘फ’. ‘पूल’ आणि
‘फूल’ मध्ये ‘ऊ + ल’ हा समाईक परिसर आहे. पूल = प + ऊ + ल आणि फूल = फ + ऊ + ल. इथे
‘प’ आणि ‘फ’ हे अर्थात फरक करणारे लघुतम ध्वनी आहेत. म्हणून मराठीतले हे दोन
स्वनिम आहेत. मराठीमध्ये पूल, फूल, मूल, झूल, हूल, डूल, चूल इत्यादी शब्दांची अनेक
लघुतम युग्मं होतात.
पण
इंग्रजी आणि जर्मनमध्ये असं होत नाही. ह्या दोन्ही भाषांमध्ये ओष्ठ्य ‘प’ आणि ‘फ’
एकाच परिसरात येत नाहीत. एका ठराविक ठिकाणी ‘प’ येतो आणि दुस-या ठिकाणी ‘फ’ येतो.
उदाहरणार्थ Peter, Post, आणि apt, app, opt. ‘प’ शब्दाच्या किंवा वर्णाच्या (syllable)
सुरवातीला येतो, तेव्हा त्याचा उच्चार ‘ह’ मिश्रित असतो. हा /ph/ असा
दाखवला जातो. तर ‘प’ शब्दाच्या मध्ये किंवा शेवट येतो, तेव्हा त्याचा उच्चार ‘ह’
मिश्रित नसतो. तो /p/ असा दाखवला जातो. हे दोन उच्चार एकाच परिसरात येत नाहीत आणि त्यामुळे
ते अर्थातच अर्थात फरक करू शकत नाहीत. ते एकमेकांना पूरक असतात. म्हणजे ही एकाच
‘प’ ह्या स्वनिमाची स्वनांतरं आहेत. (‘father’ ह्या शब्दातला ‘फ’ चा उच्चार
पूर्णपणे वेगळा आहे. तो तोंडात वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या पद्धतीनं केला जातो. तो
/f / असा दाखवतात.) ‘प’ आणि ‘फ’ प्रमाणेच ‘द’ आणि ‘ध’ आणि ‘क’ आणि ‘ख’ मिळून इंग्रजी
आणि जर्मनमध्ये /प/, /ट/, /क / असे तीन स्वनिम आहेत. ‘ह’मिश्रित उच्चार ही ह्या
भाषांमधली स्वनांतरं आहेत. मराठीत मात्र हे सहा स्वतंत्र स्वनिम आहेत.
अशा
रीतीनं लघुतम युग्म, स्वनिम आणि स्वनांतरं ह्या संकल्पना एकेका भाषेशी सलग्न आणि
एकमेकात गुंतलेल्या आहेत.
फक्त
- फस्त = [pʰə k
t̪ ə] - [pʰə s
t̪ ə]
वार
- वारं = [w
a r] - [w a r ə]
gloom
- bloom = [g l u : m]
- [b l u : m]
- आपण इंग्रजीचे उदाहरणे दिल्यामुळे वाचकांना आपले विचार सहज लक्षात येतात.
ReplyDelete- 'वारे' हे उदाहरण योग्य वाटले.
- पुढील माहिती इतर पुस्तकात वाचले नाही- ‘अशी’ – ‘कशी’ हे लघुतम युग्म नाही. कारण ह्या दोन शब्दात अ + श + ई आणि क + अ + श + ई अशी ध्वनिसंख्या अनुक्रमे ३ आणि ४ आहे. परंतु ‘अशी’ - ‘उशी’, ‘अडता’ - ‘उडता’, ‘आघाडी’ – ‘उघाडी’, ‘आकार’ – ‘उकार’, ‘आग’ – ‘ऊग’, ‘आज’ – ‘इजा’, अशी लघुतम युग्मं मराठीत आहेत.