मराठी भाषेतली लागालागी आणि लावालावी
हा लेख १९८९ साली भाषा आणि जीवनच्या वर्षं ७ अंक २, उन्हाळा मध्ये
प्रसिद्ध झाला होता.
मराठी भाषेतली लागालागी आणि
लावालावी
‘अगं आई गं’,
काय जोराची ठेच लागली!
वेळ नाही, म्हणून भूक लागली असून
खाल्लं नाही. आता पायाला लागलं, म्हणून गाडी चुकते,
की काय! गाडी तर केव्हाची लागली
असेल प्लॅटफॉर्मला. या पावसाळ्याच्या दिवसांत काही तशी जागा धरावी लागत नाही.
बरा लागते, म्हणून गाडीसाठी धडपड. शिवाय
गाडीने जाताना वाटेत कर्जत लागतं. तिथल्या वड्यांची ओढ लागलेली. पण घरी
गेल्यावर खाल्लं नाही, तर ते आईला लागतं. दिवे
लागण्याच्या वेळेला घरी पोहोचलेलं बरं. शिवाय आज टी. व्ही.वर आवडता कार्यक्रम
लागणार आहे. आमच्या शेजार्यांनाही माझं फार लागतं आहे. आमच्या रेडिओवर
सिलोन नीट लागत नाही. त्यामुळे रेडिओवर माझ्या आवडीचं गाणं लागलं,
की लगेच टेप करून ठेवतात. शिवाय
मला ‘हे’
लागतं,
‘ते’
लागतं,
म्हणून कौतुकंही करतात. मला
जरा लागलेल्याच काचर्या आवडतात, म्हणून काचर्या लागल्या,
की माझी आठवण काढतात,
आणि ‘लागली होती का ग,
उचकी’
म्हणून विचारतात. इतक्या प्रेमळ
शेजार्यांसाठी या ना त्या हातानं काहीतरी करावंच लागतं. परवाच त्यांच्या नातवाला
तिसरं लागलं, म्हणून त्यांना साडी घेतली.
तो जायला लागला आता शाळेत. आता पुढची 15-20 वर्ष शाळाकॉलेज त्याच्या मागं लागलं.
त्याचा इंजिनियरिंगच्या यादीत नंबर लागेल का, याची आजींना आत्तापासूनच काळजी
लागली आहे. ‘नाही,
तर आपली सरळ त्याच्या नावावर
लॉटरीची तिकिटं घ्यायला लागायची’ म्हणत होत्या. ‘कुणी सांगावं,
लागून जायची एखाद वेळेला!’
याखेरीज कीड लागली,
नजर लागली,
दृष्ट लागली.... आंब्याला मोहोर
लागला, दही लागलं,
दही छान लागलं,
इत्यादी इत्यादी हे आहेच किंवा
एकदम ट्यूबच लागली...
त्याचं असं झालं.
आमच्याकडे सध्या एक अमेरिकन
पाहुणी आली आहे. मराठी शिकतेय.
परवा रात्री आम्ही असंच बाहेरच्या
खोलीत गप्पा मारत बसलो होतो. तिच्या आतल्या खोलीत दिवा तसाच चालू राहिला होता. माझी
बहीण काहीतरी कामाला उठली, तर ही तिला म्हणते,
“माझ्या खोलीतला दिवा लाव.”
आम्हाला कोणालाच काही कळलं
नाही, की ही असं काय म्हणतेय.
माझी बहीण म्हणाली.
“काय करू?”
ही परत म्हणते.
“तिथला दिवा लाव.”
माझी बहीण म्हणाली.
“म्हणजे बंद करू का?”
-ती म्हणाली.
“हो. लाव!”
मग माझ्या बहिणीने तिला सांगितलं.
“दिवा तर लावलेलाच आहे. आता
तो ‘बंद कर’,
असं सांगायचं.”
त्यावर ही म्हणते.
“मग ‘दार लाव’
म्हणजे काय?”
तेव्हा आमच्या सगळ्यांच्या
डोक्यात ट्यूब लागली. म्हणजे तर आमच्या पाहुणीनं लावली!
‘दार लाव’,
‘खिडकी लाव’
मधे लावणे म्हणजे
‘बंद कर’.
पण ‘टी.व्ही. लाव’,
‘रेडिओ लाव’,
‘गॅस लाव’,
‘दिवा लाव’
मधे लावणे याचा अर्थ ‘सुरू कर’
असा विरुद्ध अर्थी होतो!
नीतिताई फारच छान....खूप मज्जा आली वाचताना आणि अजूनपर्यंत लक्षात ना आलेल्या काही गोष्टी लक्षात आल्या
ReplyDelete