जर्मन भाषेच्या विकासाची गोष्ट


जर्मन भाषेच्या विकासाची गोष्ट
 

मराठी भाषेच्या विकासासंबंधी आपण तळमळीनं आणि अहमहमिकेन बोलत आणि चर्चा करीत असतोह्या संदर्भात इतरही भाषांची विकासप्रक्रिया जाणून घेणं उद्बोधक ठरेल. भारतात जर्मन भाषा शिकवायला सुरवात झाली, त्याला २०१४ मध्ये शंभर वर्षं झाली. ह्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं जर्मन भाषेच्या विकासाच्या प्रक्रियेवर एक अगदी छोटा लेख लिहिला होता. (सप्तरंग, सकाळ पुरवणी २६ जानेवारी २०१४). इथे जरा विस्तारित मांडणी केली आहे.

आधुनिक जर्मन भाषेचा का मार्टीन लूथरने केलेल्या बायबलच्या जर्मन भाषांतरापासून म्हणजे सोळाव्या शतकाच्या मध्यापासून धरतात. इतर युरोपीय भाषांच्या तुलनेत ह्या काळात जर्मनला कुठेही फारशी पत किंवा प्रतिष्ठा नव्हती. ह्या संदर्भात स्पेनचा राजा पाचवा चार्ल्स (१५०० - १५५८) ह्याने केलेली टिप्पणी अनेकदा उद्धृत केली जाते - "मी देवाशी स्पनिश बोलतो, बायकांशी इटालियन, पुरुषांशी फ्रेंच आणि माझ्या घोड्यांशी जर्मन बोलतो." त्या काळी लोक जर्मन भाषेची भरपूर टर उडवायचे. जर्मन म्हणजे ओबडधोबड, अविकसित, धेडगुजरी भाषा आहे, असं म्हटलं जायचं. जर्मन भाषा ठराविक क्षेत्रात वापरली जायची. तिचा शब्दसंचय मर्यादित होता. त्या वेळी जर्मन भाषिक राज्यांमध्ये मोठे लोक आणि सरदार-दरकदार फ्रेंच बोलत आणि फक्त गरीब कामगार, शेतकरी तेव्हढे जर्मन बोलत. त्यामुळे ती खालच्या दर्जाची भाषा समजली जायची.

जर्मन भाषेमध्ये केवढी क्षमता आहे हे लूथरनं लॅटीनमधून जर्मन मध्ये केलेल्या बायबलच्या भाषांतरातून दिसून आलं. तसंच बायबलच्या ह्या भाषांतरनं चर्चची सर्वंकष सत्ता मानणाऱ्या परंपरावादाला शहच दिला होता. त्यातून प्रोटेस्टट पंथ उदयाला आला आणि तो उत्तरेकडच्या जर्मन भाषक राज्यात फैलावला. १७ व्या शतकाच्या मध्याला प्रोटेस्ट आणि लिक  राज्यांमध्ये महाभयंकर युद्ध झालं. ते तीस वर्षं (१८ - ४८) चाललं. त्यात प्रचंड मोठी जीवित, वित्तीय, राजकीय हानी झाली. 

ह्या गदारोळात लोकांमध्ये जर्मन भाषेविषयी एक तीव्र जाणीव निर्माण झाली. त्या वेळच्या बलाढ्य भाषांना - म्हणजे लॅटीन, फ्रेंच आणि पुढे समृध्द झालेली इंग्रजी सुद्धा - यांना तोंड देऊ शकेल अशी एक नियमबद्ध सामाईक जर्मन भाषा असली पाहिजे अशी भावना जागृत झाली. कोणत्याही राजकीय किंवा केंद्रीय प्रोत्साहनाशिवाय आणि मदतीशिवाय, मोठ्या जनसमुहांचा सहभाग असलेले हे एक प्रकारे सांस्कृतिक उत्थान होते. कोणत्याही राजेरजवाड्यांकडून ह्याची प्रेरणा मिळाली नव्हती. ह्यासाठी वटहुकूम निघाले नव्हते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटपर्यंत कोणत्याही मंत्र्यांनी, अकादमिनी, शिक्षणिक मंडळानी जर्मन भाषेच्या विकासाकडे किंवा सुयोग्य वापराकडे लक्ष दिलेलं नव्हतं.

ह्या आधीच, प्रबोधनाच्या काळात, इटलीमध्ये दांते (१२६५-१३२१), पेत्रार्क (१३०४-१३७४), जिओव्हानी बोकास्सिओ (१३१३-१३७५) आणि फ्रान्समध्ये फ्रांस्वा रेबेले (१४९४-१५५३), रने देकार्त (१५९६ – १६५०), इंग्लंडमध्ये शेक्सपियर (१५६४-१६१६) असे विचारवंत, लेखक, कवी, मानवतावादी प्रज्ञावंत, तत्त्ववेत्ते होऊन गेले. त्यांनी अनुक्रमे आधुनिक इटालिअन आणि फ्रेंच भाषेचा पाया घातला, तसंच शेक्सपियरमुळे इंग्रजी भाषा समृद्ध झाली. इंग्रजीच्या प्रमाणीकरणावर शेक्सपियरचा खूप प्रभाव पडला. तेव्हा ह्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या प्रगल्भ भाषा होत्या. १७ व्या शतकात इटलीत आणि नंतर फ्रांसमध्ये शासकीय पुढाकारातून केंद्रीय भाषा अकादमी स्थापन करण्यात आल्या. त्यांनी ह्या लेखकांची भाषा प्रमाण मानली. अशा वाङ्मयीन दर्जामुळे सांस्कृतिक क्षेत्रात तसंच वसाहातींच्या साम्राज्यातून इंग्रजी, फ्रेंच, स्पेनिश ह्या भाषांचा प्रसार झाला आणि त्यांचा प्रभाव वाढत गेला. शिवाय फ्रांस आणि इंग्लडमध्ये प्रबोधनाच्या काळापासून एकछत्री राजवट होती. तिथे राजाची, राजदरबाराची आणि प्रजेची भाषा बहुतांशी एकच होती. फ्रेंच भाषेच्या वापरासंबंधीचे जाहीरनामे केंद्राकडून काढले आणि राबवले जायचे.  
जर्मन भाषेच्या विकासाची गोष्ट ह्याहून खूपच वेगळी आहे. ह्या काळात जर्मन भाषेत म्हणण्यासारखी कोणतीही मोठी वाङ्मयीन निर्मिती झालेली नव्हती. इतर देशांप्रमाणे जर्मन भाषासमाजात त्या अर्थानं साहित्यिक राजकारणीही निर्माण झाले नव्हते. सुशिक्षित उच्च वर्ग फ्रेंच बोलत असे आणि धर्माची, तसंच कायद्याची भाषा लॅटीन होती. धर्म आणि कायदा तसंच विज्ञान क्षेत्रात लॅटीनची, तर कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात फ्रेंचची इतकी मक्तेदारी होती की लोकांना ह्या भाषांपासून सुटका हवी होती. सर्वांना कळेल अशी धर्माची आणि राज्यकर्त्यांची भाषा असावी अशी गरज आता निर्माण झाली होती.
कोणत्याही राजकीय केंद्राशिवाय लोकजागृतीतून हा बदल घडत होता. १७ व्या आणि १८ व्या शतकात जर्मन भाषेच्या शुद्धीकरणासाठी लोकप्रेरणेतून अनेक भाषामंडळं’ स्थापन झाली. त्याकाळी जर्मन भाषक राज्यात सर्वत्र अनेक वेगवेगळ्या बोली बोलल्या जात होत्या. एक सामाईक भाषा नव्हती आणि प्रमाणभाषेचे निश्चित निकष नव्हते. सगळ्या सामाजिक गटांसाठी एक सामाईक भाषा असावी अशी लोकांची भावना होती. आपली मौल्यवान भाषा ही लक्तरं झालेली, पोते-यासारखी, चिंध्या झालेली भाषा असू नये, असं त्यांना वाटत होतं. अशा शब्दात ते स्वभाषेची निर्भर्त्सना करत होते. (श्टुकन्ब्रोक, आन्या) तसंच अतिस्तुतीही करत होते. लोकांनी भाषाविकासात पुढाकार घेऊन जर्मन भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा चंगच बांधला. टीन-फ्रेंच शब्दांना प्रतिशब्द निर्माण करून, तस भाषांतरामधून वगैरे लॅटीन आणि फ्रेंचच्या वरचष्म्यातून मुक्त होण्यासाठी नवीन शब्दसंपत्ती निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. कॅथॉलिक पंथाला बोली भाषेतली प्रार्थना-अर्चना मान्य नव्हती. पण प्रॉटेस्टंट पंथाच्या प्रचारामुळे, विशेषतः उत्तरेकडच्या जर्मन भाषिक राज्यांमध्ये, लॅटीन आणि फ्रेंचची भाषांतरं होऊ लागली.
दरबारातली आणि राज्याच्या प्रतिनिधींची वाटाघाटीची भाषा अनेक शतकं फ्रेंचच होती आणि वकिलांची लॅटीन होती. हे जर्मन भाषेच्या सांस्कृतिक विकासाला एकप्रकारे अनुकूलच होतं. कारण ती त्यामुळे राजकारण आणि इतर व्यवहारापासून अलिप्त राहून कलात्मक आविष्कार आणि तत्त्वचिंतनासाठी ती मोकळी होती. त्या काळी काही कवी आणि लेखक अतिशय जबाबदारीनं जाहीर भाषणं करीत असत. १८ व्या शतकात भाषाभिमानाची आणि भाषा शुद्धीकरणाची धार वाढत गेली. लोकांमध्ये अशी भावना होती की परक्या भाषेमुळे आपण परकीय संस्कृतीचे गुलाम बनलो आहोत.
फ्रेंच आणि लॅटीनचं वर्चस्व नष्ट करून जर्मन भाषेला विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भाषेचे नियम बनवणं आणि वापरातली भाषा त्या निकषांप्रमाणे सुधारणं जरूर होतं. लेखी भाषेमधली उदाहरणं घेऊन, सर्वांना शिकता येईल अशी एक संस्कृतीसंपन्न भाषा विकसित करणं गरजेचं होतं. भाषेचं पोषण करून ती सुधारणं आणि परभाषा म्हणून ती आकर्षक बनवणं हाही हेतू होता.
हेर्डर, फ़िश्ट, लेसिंग यांसारख्या विचारवंतांनी आणि लेखकांनी आपल्या प्रखर भाषणातून, लिखणामधून भाषेविषयी अभिमान आणि प्रेम निर्माण केल. केवळ भाषेचीच नाही, तर “भाषा-राष्ट्रा”ची प्रतिष्ठा वाढवणं हे ध्येय झालं.
तेव्हा लोकांना एक गोष्ट जाणवत होती की, वाङ्मय छोट्या-मोठ्या जर्मन भाषिक राज्यांच्या सीमा ओलांडून सर्व दूर पोचत होतं. त्यामुळे वाङ्मयाचं महत्त्व आणि त्याबरोबरच लेखकांची जबाबदारी वाढली. नुसते निकष ठरवणं नाही, तर ह्या नव्या सुधारित समृध्द लिखित भाषेत पाठ्य निर्माण करण्याची १७ व्या आणि १८ व्या शतकात एक महत्वाची मोहीमच सुरु झाली. १७ व्या शतकाच्या शेवटी आणि १८ व्या शतकाच्या सुरवातीला ग्योटं (१७४९-१८३२), शिलर (१७५९-१८०५), क्लाईस्ट (१७७७-१८११) ह्यांनी उत्कुष्ट साहित्यनिर्मिती केली. हाच काळ जर्मन साहित्याच्या क्लासिसिझामचा, अभिजात साहित्यचा काळ मानला जातो.
आजचे प्रज्ञावंत जर्मन पत्रकार आणि लेखक थोमस ष्टाईनफेल्ड आपल्या पुस्तकात (२०१०) म्हणतात, १७व्या आणि १८व्या शतकात पारंपारिक धार्मिकतेपासून दूर जाण्यावर सगळे प्रयत्न केंद्रित झाले होते. ते पुढे असं प्रतिपादन करतात की सगळी प्रज्ञा, सगळं बौद्धिक सामर्थ्य आता धर्माकडून कला, विज्ञान, आत्मचरित्रात्मक आणि उन्नतीलक्षी (Bildungsroman) कादंब-यांकडे, रोमँटिक काव्याकडे, तसंच तत्त्वज्ञान आणि इतिहासाकडे वळवलं गेलं. प्रज्ञावान लोक विवेचन करत होते ते देवाऐवजी आत्मा आणि प्रेमाबद्दल, परमार्थाऐवजी निसर्ग आणि सत्याबद्दल, समाजाबद्दल, अभिव्यक्ती आणि कलेबद्दल. हे सगळं ते एका आत्मिक उर्जेनं आणि कळकळीनं करत होते.
श्टाईनफेल्ड पुढे म्हणतात त्याप्रमाणे आठराव्या शतकात अनेक ठिकाणी जर्मन भाषेचं शुद्धीकरण आणि विकास हे हुशार, सुशिक्षित माणसांचं आणि कवी-लेखक मंडळींचं कामच झालं. ह्याला लवकरच एका चळवळीच स्वरूप प्राप्त झालं. अतिउत्साहानी साहित्यातून, पत्रांमधून, चर्चांमधून आणि संवादातून त्यांनी सर्व विषयांना धरून नवीन शब्दसंपदा निर्माण करायला सुरवात केली. तसंच त्यांनी स्वत:ची सुरावट असलेल्या नवीन वाक्यरचना वापरायला सुरवात करून लॅटीनच्या आदर्शापासून जर्मन भाषेची सुटका केली. क्लोप्श्टोक्, गोत्शेड्, लेसिंग, वीलांड, ग्योथं, शिलर असे कवी आणि विचारवंत, तसंच आदेलुंग, कांपं, हेर्डर असे विद्वान - यांनी पुढाकार घेऊन हे साध्य केलं. अशा थोड्या लोकांनी जर्मन भाषिक प्रांतांमध्ये भाषा विकासाचं एक वादळ निर्माण केलं. अर्थात यात मतमतांतरं होती. पण लक्षात घेण्याची गोष्ट ही की १९व्या शतकाच्या सुरवातीला जर्मन शब्दसंग्रह जवळ जवळ दुप्पट झाला होता. १८३८ मध्ये सुरु झालेला खूप महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ग्रिम बंधूंचा ‘जर्मन शब्दकोश’. त्यात शब्दांचा इतिहास दिलेला आहे. ह्याचे पहिले खंड १८५४ मध्ये प्रसिद्ध झाले. हा जर्मन भाषेतला सर्वात मोठा कोश आहे. (आजही त्याला पुरवण्या जोडून तो अद्ययावत केला जात आहे.)
श्टाईनफेल्ड म्हणतात त्याप्रमाणे हा विकास प्रामुख्याने दोन-तीन पिढ्यांच्या अवधीत फार झपाट्याने झाला.
नवी जर्मन भाषा वर्ग, धर्म, शिक्षणातली तफावत ह्या सगळ्याच्या पलिकडे होती; ही एक विकसित समृद्ध, सोपी भाषा झाली. ही एका संस्कृतीची एक सांस्कृतिक भाषा होती. अशाप्रकारे एखाद्या शेक्सपियरचं भाषांतर करण्यासाठीही संस्कृती-समृद्ध, सक्षम भाषा तयार होत होती.
आन्या श्टुकन्ब्रोक ह्यांच्या २००५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या “भाषाराष्ट्र-वाद” (श्प्राखनात्सिओनालिसमुस) ह्या पुस्तकात त्यांनी स्वभाषा-भक्ती आणि भाषिक राष्ट्रवादाची तीन लक्षणं सांगितली आहेत. पाहिलं म्हणजे लोक आपल्या भाषेची खूप स्तुती करायला लागतात, दुसरी गोष्ट म्हणजे भाषा ही लोकांची आणि राष्ट्राची मुख्य ओळख बनते; स्वभाषा आपलं श्रेष्ठत्व आणि दुस-याचा कनिष्ठ दर्जा दाखवण्यासाठी एक आक्रमक, आग्रही मध्यम म्हणून वापरली जाऊ लागते.
लेसिंग ह्या प्रसिद्ध जर्मन लेखकाच्या शब्दात सांगायचं तर ही वाटचाल होती ती रंगमंचावर “श्प्राखनात्सिओन” म्हणजे “भाषिक राष्ट्र” स्थापन करण्याकडे. लक्षात घ्यायची गोष्टं ही की, खरोखर प्रथम जर्मन “भाषिक-राष्ट्र” निर्माण झालं आणि नंतर पुढे जर्मन राष्ट्राची निर्मिती झाली!
अठराव्या-एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये राष्ट्रवादाचा उदय आणि प्रसार झाला. त्याचं ब्रीदवाक्य होतं ‘एक भाषा, एक संस्कृती, एक समाज. जर्मन भाषाप्रदेशामध्ये लोकेतिहास, लोकवाङ्मय, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत ह्या राष्ट्रीय प्रतिकांपेक्षा लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि आपली ओळख निर्माण करण्यासाठी सर्वात जास्त प्रभावी आणि अत्यंत महत्वाचं साधन म्हणजे एक सामा राष्ट्रभाषा हे होतं. हाच लहान लहान जर्मन भाषि राज्यांच्या एकीकरणाचा पाया होता. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत अनेक छोटी विस्कळीत जर्मन भाषि राज्य होती. जर्मन भाषिक राज्यांचएकत्रीकरण होऊन १८७१  मध्ये जर्मनीची स्थापना झाली.
(बरेच विचारवंत १७ -१८ व्या शतकातला राष्ट्रवाद, भाषाराष्ट्रावाद, आणि १९ - २० व्या शतकातला राष्ट्रवाद ह्यात फरक करता. कारण पुढे पुढे ह्या राष्ट्रवादाची धार वाढत गेली, दृष्टी संकुचित होत गेली आणि आक्रमकता वाढली.)
आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की १८ व्या शतकामध्ये जर्मन भाषा जेव्हा एक सांस्कृतिक भाषा म्हणून ओळखली जाऊ लागली तेव्हा जर्मन भाषेच्या ह्या नव-निर्मितीमागे कोणतीही राजकीय सत्ता किंवा कोणताही राजकीय हेतू नव्हता; तर हेतू होता फक्त सांस्कृतिक आणि भाषिक. अजून प्रबळ राजकीय सत्ताकेंद्र निर्माण झालेलं नव्हतं. त्यामुळे जर्मन भाषेचसंस्करण, संगोपन आणि विकास लोकप्रेरणेतून झाला.
१८ व्या आणि १९ व्या शतकात जर्मन भाषा घडवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झालेच, पण त्याचबरोबर जगप्रसिद्ध जर्मन विद्वानांनी आणि वैज्ञानिकांनी मानव्य शास्त्रांच्या आणि विज्ञानाच्या जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये संशोधन केलं आणि मूलभूत विचारही मांडले. ह्या सगळ्यातून जर्मन भाषा समृद्ध होत गेली आणि तिला प्रतिष्ठा प्राप्त झाली. २० व्या शतकात काही मराठी भाषक संस्कृत, गणित, पदार्थविज्ञान, रासायानशास्त्राच्या उच्च अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी जर्मनीला गेल्याचं आपल्याला माहीतच आहे.
मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा आहे. तिचा संस्कृती आणि विज्ञानाच्या सर्व क्षेत्रात वापर आणि विकास लोकप्रेरणेतून, तसंच लेखक, वैज्ञानिक, तत्त्ववेत्ते, प्रज्ञावंत यांच्या प्रयत्नातून प्रभावीपणे होऊ शकतो.  

संदर्भ :
Steinfeld, Thomas 2010 : Der Sprachverführer. Die deutsche Sprache : Was sie ist, was sie kann, Hanser, Munich. See esp. P. 51-65.
Stukenbrock, Anja 2005: Sprachnationalismus. Sprachreflexion als Medium kollektiver Identitätsstiftung in Deutschland (1617 – 1945), Göttingen.

Comments

  1. लेख खूपच नवीन माहिती देणारा आहे

    ReplyDelete
  2. German जी Germany या one of the most developed nations ची भाषा आहे तिला ही एकेकाळी humiliation सहन करावे लागले होते हे लेखावरून कळले.
    “उत्कर्ष “ कष्टसाध्य व जिद्दीमुळेच शक्य आहे .
    No better example than Germans..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वनिमविचार

भाषेचं रंग-रूप : भाषा, संकल्पना आणि संस्कृती

भारत आणि बहुभाषिकता