संवाद-संपन्न अनुभव



संवाद-संपन्न अनुभव
नीती बडवे
भाषा आणि जीवन मध्ये “भाषिक संज्ञापनह्या शीर्षकाखाली १९९८ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख.

ही गोष्ट आहे 1998 सालची. जर्मनीमध्ये रेल्वेनं प्रवास करणं हा एक वेगळाच अनुभव आहे. कारण सर्वसामान्यपणे आपापल्या मोटरगाडीतून प्रवास करणारे लोकच खूप असतात. तिथे तशा सगळ्याच गाड्या वातानुकुलित असतात. पण त्यातही आय. सी. . म्हणजे इंटर सिटी एक्स्प्रेस या गाड्या विशेषच आरामशीर असतात. बटणानं पाठ कलंडवून शांत झोप घेता येईल अशा मोठ्या पाठीच्या खुर्च्या, काचेच्या मोठ्या आणि स्वच्छ खिडक्या. त्यांना पडदे लावलेले. डब्यात दाराजवळ, शिवाय मध्यभागी मोठ्या बॅग्ज आणि कोट वगैरे ठेवायला जागा. कार्पेटेड कॉरिडॉर्स, ध्वनिप्रदूषण जवळजवळ शून्य. प्रत्येक खुर्चीवर सामान ठेवायच्या फळीच्या खाली एक लेबल. त्यावर कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत ही खुर्ची आरक्षित आहे त्याची माहिती. प्रत्येक खुर्चीवर एक परिपत्रक. त्यात या गाडीचं नाव आणि प्रवासाचा मार्ग यांचा आलेख. गाडी कुठे आणि किती मिनिटं थांबणार याची माहिती. प्रत्येक स्टेशनला उतरल्यावर कुठे जायला कुठल्या गाड्या मिळतील याची माहिती. प्रत्येक डब्यात एक स्पीकर. गाडी सुरू होताना चालकाचं स्वागतपर निवेदन. प्रत्येक स्टेशन येण्यापूर्वी स्टेशनच्या नावाचा पुकारा. चुकून गाडीला कुठे काही मिनिटं जास्त थांबावं लागलं तर चालकाचं दिलगिरीपूर्ण वक्तव्य. शेवटच्या स्टेशनात शिरताना प्रवाशांचे आभार. तुमचा पुढचा प्रवास सुखाचा होवो अशी शुभेच्छा देणं - ही सर्व व्यवस्था अगदी विमानातल्यासारखी. या रेल्वेत पेयं किंवा जेवण मात्र विमानातल्यासारखं फुकट मिळत नाही. विमानापेक्षासुद्धा अधिक सुखकर प्रवास. कारण कमी धक्के, कमी ध्वनिप्रदूषण आणि खूपच जास्त मोकळी जागा. 6-8 तासांच्या प्रवासानंतरसुद्धा जराही थकवा जाणवत नाही. असा हा प्रवास अतिशय आरामशीर खरा, परंतु अत्यंत महाग.

त्यामुळेच कंपन्यांचे बडे बॉसेस, उत्तम सुटातले टाय लावलेले पुरुष; श्रीमंती बॅग्ज्, पर्सेस घेतलेल्या, उंची कपडे घातलेल्या बायका, असेच लोक अशा गाड्यांमध्ये जास्त दिसतात. प्रत्येक जण आपलं आपलं काही तरी वाचत, लिहीत, लॅपटॉपवर काम करत, एकटं एकटं खात किंवा झोपत असलेला दिसतो. सगळा डबा भरलेला आहे असं क्वचितच होतं. शिवाय हल्ली सहा-सहाचे कंपार्टमेंट असलेले डबेही फारसे नसतातच. लक्झुरी बसमधल्यासारख्या एकाच दिशेनं तोंड केलेल्या दोन-दोन खुर्च्यांची डावीकडे एक रांग आणि उजवीकडे एक रांग. मधे एक बोळ. आसनं समोरासमोर आल्यामुळे औपचारिकतेनं गुड मॉर्निंगकिंवा गुड इव्हिनिंगअसं अभिवादनादाखल म्हणण्याचाही या आसन व्यवस्थेमुळे फारसा प्रश्न येत नाही.

गाडीचा आवाज येत नाही. बाहेरचे आवाज आत येत नाहीत. विक्रेते ओरडातायत वगैरे हा प्रश्नच येत नाही. सहसा कोणी शेजार्‍याशीसुद्धा बोलताना दिसत नाही. तशी गरजच पडत नाही. ब्रेमन-हायडेलबर्ग हा पाच-सहा तासांचा प्रवास मी अशा जलद गाडीनं केला.

हायडेलबेर्गमध्ये असताना एकदा काय झालं....

मला जायचं होतं दोन दिवसांसाठी हायडलबेर्गहून म्युनिकला. तसं फारसं काम काही नव्हतं. पण मैत्रिणींना भेटायला जायची खूप इच्छा होती. कुणाच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस होता, कुणाला मुलगी झाली होती, कोणी नवी जागा घेतली होती म्हणून भारतातूनच त्यांच्यासाठी भेटी नेल्या होत्या.

स्टेशनवर जाऊन चौकशी केली. हायडेलबेर्ग-म्यूनिक एक वेळचं तिकीट 102 मार्क इतकं होतं. म्हणजे जाऊन येऊन 204 मार्क! आणि हे प्रचंड पैसे होते. रुपयात मोजले तर जवळपास पाच हजार रुपये. जर्मनीमध्ये आपण अगदी थोडे दिवस असतो, तेव्हा रुपयातला हिशेब पुन्हा पुन्हा वरती डोकं काढतोच. विशेषत: मोठ्या रकमांबाबत आणि कामासाठी नसून व्यक्तिगत कारणासाठी किंवा चैनीसाठी पैसे खर्च करताना. मैत्रिणींना भेटण्यासाठी पैसे खर्च करायचं काही वाटत नाही, पण एकटीनंच आणि काही सामान बरोबर नसाताना आरामात प्रवास करायला एवढे पैसे खर्च करायचं साहजिकच जिवावर येतं.

परत स्टेशनवर जाऊन विचारलं की याहून कमी पैशांत इथून म्यूनिकला नाही का जाता येणार? तिथल्या बाईंनी उत्तर दिलं, ‘तुम्हाला कोणत्या दिवशी म्यूनिकला जायचंय यावर ते अवलंबून आहे.’ मी म्हटलं, ‘शनिवारी.’ तिनं विचारलं शनिवारी कधी?’ मी म्हटलं, ‘सकाळी लवकर.’ यावर तिनं मला संगणकातून एक प्रिंटआऊट काढून दिला. सकाळी सहाला निघणारा एक गाडी, तिचं वेळापत्रक आणि सकाळी सातला निघणारी एक गाडी, तिचं वेळापत्रक. मी विचारलं या गाड्यांचं किती तिकीट आहे?’ तिनं सांगितलं, ‘35 मार्क.’ मी विचारलं, ‘जाऊन-येऊन?’ ती म्हणाली, ‘तुम्ही शनिवारी जाऊन रविवारी परत आलात, तर जाऊन-येऊन 35 मार्क पडतील.’ मी खिडकीपासून बाजूला जाऊन तो कागद परत बघितला. त्यावर म्यूनिकपर्यंतच्या तीन-चार स्टेशनांची नावं होती आणि म्यूनिकला पोचायची वेळ होती. माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी परत खिडकीशी जाऊन त्या बाईंना परत दोनदोनदा तोच प्रश्न विचारला, ‘फक्त जायला पस्तीस मार्क की जाऊनयेऊन पस्तीस मार्क?’ त्या म्हणाल्या, ‘तुम्ही रविवारी परत आलात, तर जाऊनयेऊन पस्तीस मार्क.’ दोनशेचार कुठे आणि पस्तीस कुठे! मी खुशीत घरी आले आणि मैत्रिणीला फोन केला की मी शनिवारी सकाळी या गाडीनं निघून इतक्या वाजता म्यूनिकला पोचतेय.

दुसर्‍या दिवशी मी शांतपणे पुन्हा एकदा तो गाड्यांच्या वेळापत्रकाचा कागद नीट बघितला आणि मी प्रचंड वैतागलेच! मध्ये जी तीन स्टेशन्स लिहिलेली होती तिथे, म्हणजे अनुक्रमे श्टुट्गार्ट, उल्म आणि आउग्जबर्गमध्ये मला गाड्या बदलायच्या होत्या! तेही या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन! आणि दोन ठिकाणी पाऊण ते एक तास इतका वेळ पुढच्या गाडीसाठी थांबायचं होतं! म्हणजे एकूण साडेतीन-चार तासांऐवजी सहा-साडेसहा तास लागणार होते आणि तीनदा गाड्या बदलायला लागणार होत्या. शिवाय त्या दिवसांत सतत पाऊस पडत होता. सगळ्या स्टेशनांतले सगळे प्लॅटफॉर्मही पूर्ण छप्पर असलेले नसतात. एकूण इतकी वैतागले, की वाटलं, जाऊ दे, दीडशे-पावणेदोनशे मार्क वाचवण्यासाठी कशाला हा एवढा खटाटोप!

पण दुसर्‍या दिवशी विद्यापीठाच्या वाचनालयात एक दिल्लीचा मुलगा भेटला. त्याला सहज म्हटलं, ‘शनिवारी-रविवार म्यूनिकला जातेय.’ तर तो म्हणाला, ‘पस्तीस मार्कच्या वीकएण्ड तिकिटावर का?’ म्हटलं, ‘तोच विचार करतेय, काय करावं.’ त्यावर तो म्हणाला, ‘मीपण गेलो होतो या तिकिटावर. गाड्या बदलायला लागल्या तर काही त्रास होत नाही.’ आणि टिपिकल भारतीय अशी एक पुस्तीही त्यानं जोडली, ‘ही जर्मनी आहे म्हटलं. इथे गाड्या अगदी सेकंद ते सेकंद वेळेवर जातात. काही प्रश्न येत नाही.’

मग ठरवलं - चला, आपणही या तिकिटावर हा प्रवास करून बघू! शिवाय श्टुट्गार्ट आणि आउग्जबुर्ग ही छान गावं आहेत. आपल्याजवळ विशेष काही सामान नसणार. हवा बरी असेल तर, 40-45 मिनिटं गावातून फेरफटका मारून येऊ या.

आणि त्या दिवशी हवा खरोखरच छान होती. बर्‍याच दिवसांनी स्वच्छ सूर्यप्रकाश दिसला. ऑक्टोबरच्या मध्याला दिसणारी ऑटमच्या रंगांची खरी मजा दिसत होती. सगळीकडे लाल-तपकिरी झालेली सुंदर तकतकीत पानं. प्रवास करताना मजा आली.

दीड-पावणेदोन तासांनी श्टुट्गार्टमध्ये उतरले आणि सरळ चालत गावात गेले. वाटेत कॉफी घेतली आणि पाऊण तासाने परत येऊन घाईत आपल्या प्लॅटफॉर्मपाशी गेले, तर तिथे बोर्ड होता, गाडी काही तास लेट! तशीच परत फिरून प्लॅटफॉर्मवरच्या पुस्तकांच्या दुकानात गेले. तिथे अर्थातच फारसा रस वाटावा अशी पुस्तकं नव्हती. म्हटलं परत प्लॅटफॉर्मवर जाऊन इतर कोणत्या गाड्यांची शक्यता आहे का ते पहावं.

प्लॅटफॉर्मवर एक टी. सी. होता. त्याच्याभोवती हा गराडा. तो हात दाखवून त्या तिकडच्या प्लॅटफॉर्मवर लागलेली गाडी घ्या. ही गाडी रद्द झाली आहेअसं सांगत होता. लोकांची एकच झुम्मड उडाली. सगळे बायका-मुलांसह धावत-पळत टी. सी.नं दाखवलेल्या म्हणजे मधले दोन प्लॅटफॉर्म सोडून पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर गेले. तिथे उभी असलेली गाडी भरलेललीच होती. धडपडत, धापा टाकत लोक आत चढत होते. तिथे बसायला जागा नव्हती की सामान ठेवायला जाता नव्हती. बरेच लोक खुर्च्यांच्या दोन रांगांच्यामध्ये उभे. दारासमोरच्या पॅसेजमध्ये बरेच लोक उभे. सगळीकडे गलका. कोणालाच कल्पना नव्हती की ही नक्की कोणती गाडी होती आणि ती कुठे जाणार होती. मी म्हटलं, ‘मला वाटतं ही गाडी उल्मला जात असावी.’ कारण मला पुढची गाडी श्टुट्गार्ट-उल्म घ्यायची होती. माझ्या आसपासचे बरेच लोक माझ्यासारखेच या टप्प्याचा प्रवास करणारे निघाले. पण ही गाडी उल्मला जाणारी नव्हती! पुढच्या स्टेशनवर निवेदन ऐकायला आलं, ‘उल्मला जाण्यासाठी इथे उतरून प्लॅटफॉर्म तमुकवर उभी असलेली गाडी घ्या!’ तिकडे लोंढा धावला! पण मी आणि आधीच्या गाडीत माझ्यासमोर बसलेली मुलगी उतरून त्याच प्लॅटफॉर्मवर थांबलो. या प्लॅटफॉर्मच्या दुसर्‍या बाजूला जी गाडी उभी होती, तिच्यावर उल्मच्या गाडीचा नंबर होता. तेव्हा हीच आपली गाडी असं आम्ही ठरवलं. आसपास विचारलं. टी.सी.ला विचारलं. तो म्हणाला, ‘निवेदन चुकीचं होतं. समोरची गाडी तुमची आहे.’ तोपर्यंत पुढच्या प्लॅटफॉर्मवर गेलेली सगळी गर्दी परत आली. परत एक लोंढा, एकच गलका. प्रत्येक जण दुसर्‍याला काही तरी विचारत होतं. इकडून तिकडे लगबगीनं धावत होतं. सगळेच गोंधळलेले.



शेवटी लोक एकदाचे गाडीत चढून स्थिरस्थावर झाले. बरीचशी बाकं लक्झुरीमधल्यासारखी एका दिशेला तोंड केलेली नव्हती, तर आगगाडीतल्याप्रमाणे समोरासमोर मांडलेली होती. प्रत्येक जण दुसर्‍याला काही तरी सांगत होतं. मला पहिल्या गाडीत भेटलेली जर्मन मुलगी आणि मी समोरासमोर बसलो होतो.
 
तेवढ्यात आणखी एक मध्यमवयीन जर्मन बाई तिथे येऊन बसल्या आणि आपण कशा बरेचदा वीकएण्ड तिकिटावर प्रवास करतो ते सांगू लागल्या. ‘मी नोकरी करते. पण वीकएण्डला म्हातार्‍या आईला भेटायला जावं लागतं. तिला मदत करावी लागते. वीकएण्ड तिकीट तसं सोयीचं आहे. मला तीन मुलं आहेत. त्यांनी पस्तीस मार्कच्या वीकएण्ड तिकिटावर बर्लिनपर्यंत प्रवास केला, पण तिथे दोन तास थांबून त्यांना परत यावं लागलं.’ एक ना दोन. अनेक गोष्टी त्या बाईंनी ऐकवल्या. मग दोन मिनिटं शांतता. त्यानंतर त्या एकदम म्हणाल्या, ‘चेकर आला तर काही हरकत नाही. तुमच्याकडे तिकीट नसलं तरी माझ्याकडे आहे. तुम्ही माझ्या तिकिटावर माझ्या सहप्रवासी म्हणून प्रवास करू शकता.’ मी म्हटलं, ‘माझ्याकडे तिकीट आहे. पण एका तिकिटावर दोन माणसं कशी प्रवास करणार?’ तेव्हा मला शेजार्‍यापाजार्‍यांकडून वीकएण्डतिकिटाची गोष्ट आणि किस्से ऐकायला मिळाले.
या तिकिटावर फक्त ठराविक गाड्यांनी प्रवास करता येतो. याही गाड्या जरी वातानुकूलित असल्या तरी इतर आरामाच्या आणि श्रीमंती व्यवस्था इथे नसतात. त्यांना रिजनल ट्रेन किंवा शॉर्ट डिस्टन्स ट्रेन म्हणतात. थोडक्यात आपल्या लोकल ट्रेनसारख्या. लहान स्टेशनवर थांबणार्‍या, पण हळू जाणार्‍या आणि दिवसातून दोन-चार वेळाच धावणार्‍या. मुंबईहून कल्याणपर्यंत एक गाडी. कल्याण ते कर्जत दुसरी. कर्जत-लोणावळा तिसरी आणि लोणावळा-पुणं चौथी. वीकएण्ड तिकिटावर असं मजल-दरमजल करत आणि फक्त रिजनल ट्रेननंच प्रवास करावा लागतो.

वर्ष-दीड वर्षापूर्वी पहिल्यांदाच हे तिकीट सुरू झालं. तेव्हा ते फक्त 15 मार्कला मिळायचं आणि पाच लोक एका तिकिटावर जर्मनीत कुठेही प्रवास करू शकायचे. पुढे हे प्रवासभाडं वाढत आता पंधराचं 35 मार्क झालं आहे. आता एका तिकिटावर दोन मोठी माणसं आणि तीन मुलं किंवा तीन मुलांऐवजी दोन मुलं आणि एक कुत्रं इतके प्रवास करू शकतात.

पूर्वी वीकएण्डला गाड्या रिकाम्या धावायच्या आणि स्टेशन रिकामी, भकास आणि मृतवत् दिसायची. काही वर्षांपूर्वी जर्मन रेल्वेचं खाजगीकरण झालं. त्यानंतर सुरू केलेल्या वीकएण्ड तिकिटांनी त्यात आता इतकं चैतन्य आलंय. सुरुवातीला काही लोकांनी असंही केलंय. स्टेशनवर जाऊन एक तिकीट घ्यायचं. ओळखही नसलेल्या लोकांना स्टेशनवर विचारायचं, चला आपण कुठे जाऊ या? हे तिकीट शेअर करता का? इत्यादी, इत्यादी.

यानंतरच्या गाड्यांमध्ये आणि परतीच्या प्रवासातही मला हाच अनुभव आला. समोर बसलेल्या सुखवस्तू, निवृत्त दांपत्याशी भाषा, परभाषा, जर्मन निवडणुका, युरोपिअन युनिअन, ‘युरोचलन, जर्मनीचं विलीनीकरण अशा अनंत विषयांवर दीड-दोन तास उत्तम गप्पा झाल्या. सबंध प्रवासात भेटलेल्या एकाही व्यक्तीनं माझं नाव विचारलं नाही किंवा मीही त्यांची नावं विचारली नाहीत. पण आम्ही एकमेकांशी छान गप्पा मात्र मारल्या.



हा प्रवास संपत असताना माझ्या मनात आलं, काय तो श्रीमंती घुम्म-मूक प्रवास त्या चकचकीत, अत्यंत आरामशीर अशा इंटर सिटी एक्स्प्रेसमधून! आणि या शनिवार-रविवारचा प्रवास- हा इतका बोलका, माणसांशी संपर्क साधणारा, भाषिक संज्ञापनांनी संपृक्त!आरामशीर, रिझर्वड्, सेक्युअर्ड, श्रीमंती प्रवासात माणसं माणसांची दखलच घेत नाहीत. भाषेला तिथे काही भूमिकाच नाही.  

या उलट या साध्या, गोंधळाच्या, भरलेल्या गाडीच्या, साध्या माणसांबरोबरच्या प्रवासात भाषाही उमलते. खुलते. इथे माणसं सहज दुसर्‍याशी संपर्क साधतात. बोलतात, बोलतं करतात. माहिती आणि अनुभवांनी संपन्न करतात. इथे भाषेची भूमिका आणि स्थान एकदम महत्त्वाचं होऊन जातं. भाषा जिवंत होते. समाजाला जिवंत करते.

मनात आलं, फार बरं झालं आपण या वीकएण्ड तिकिटानं प्रवास करायचा ठरवलं ते! ही वीकएण्ड तिकीट संस्कृतीकाही वेगळीच होती. हा एक संवाद-संपन्न अनुभव होता! तेव्हाच ठरवलं, ह्या अनुभवाची गोष्ट आपण ‘भाषा आणि जीवन’च्या वाचकांना सांगायची. त्यांना आपल्या अनुभवात सामील करून घ्यायचं. त्यांच्याबरोबर हा अनुभव वाटून घ्यायचा (की शेअरकरायचा? - हा शेवटचा प्रश्न विचारलाय तो आपला संवाद असाच पुढे चालू ठेवण्यासाठी.)


Comments

  1. मस्त एकदम छान हलका फुलका लेख !
    शेवटी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी माणसाची माणसाशी भेटायची , बोलायची भूक ही कायमच असणार
    शिस्तबद्ध जर्मनी असले तरी काय झाले

    ReplyDelete
  2. फारच छान लेख आहे.भारतातील एसी ट्रेन खिडक्या पूर्वी धुकट पिवळ्या अस, आताअजित न्ही. पण तेव्हाही इस्त्रितील माणसां मध्ये. संवाद नसे , जो जनता गाडीत घडे.
    अमेरिकेतील अनुभव वेगळाच. काही वेळा फारशी माणसे नसतात, असलीच तर एखादी गप्पिष्ट व्यकी भेटते.

    ReplyDelete
  3. मस्त. मजा आली वाचायला.
    जेव्हा आम्ही जर्मनी-ऑस्ट्रिया ला गेलो होतो तेव्हा आम्ही पण अश्या लोकल ट्रेन ने प्रवास केला. I C E ने पण केला... दोन्हीची वेग वेगळी मजा होती...😊

    ReplyDelete
  4. Loved reading this. The only way to see the real country is to travel with the working class.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वनिमविचार

भाषेचं रंग-रूप : भाषा, संकल्पना आणि संस्कृती

भारत आणि बहुभाषिकता