अजब न्याय वर्तुळाचा चिं. त्र्यं. खानोलकर तीन पैशांचा तमाशा पु. ल. देशपांडे
अजब न्याय वर्तुळाचा
चिं. त्र्यं. खानोलकर
तीन पैशांचा तमाशा
पु. ल. देशपांडे
आलोचना : जुलै १९७९, २०-२७
बेर्टोल्ट ब्रेश्त् हा विसाव्या शतकांतील एक विवाद्य जर्मन लेखक आहे. त्याच्या राजकीय प्रेरणा आणि त्यांचे साहित्यांतील अभिनव प्रयोग हे एकमेकांशी निगडितच आहेत. ‘वाचक’ व ‘प्रेक्षक’ यांच्याबद्दलच्या त्याच्या कल्पना व अपेक्षा अपारंपारिक आहेत. त्यामुळे त्याच्या साहित्याने सर्व जागेचच लक्ष वेधून घेतले आहे.
मराठीत रूपान्तरित झालेल्या त्याच्या दोन नाटकांची मूळ जर्मन नाटकांशी तुलना, हा प्रस्तुत विषय आहे. ब्रेश्तच्या ‘कॉकेशियन चॉक सर्कल’ (der kaukasische Kreidekreis) या नाटकाचे चिं. त्र्यं. खानोलकरांनी केलेले ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे एक रूपांतर व ‘थ्री पेनी ऑपेरा’ (Drei Groschen Oper) या नाटकाचे पु. ल. देशपांडे यांनी केलेले ‘तीन पैशांचा तमाशा’ हे दुसरे रूपांतर. प्रस्तुत तुलना नाट्यप्रयोगांची नसून केवळ संहितांची आहे. तरीहि ब्रेश्तच्या रंगभूमीच्या किंवा नाट्याबद्दलच्या कल्पना व त्याच्या नाटकांचे उद्देश प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. दोन्ही नाटकांचे मूळ विषय ब्रेश्तचे नाहीत. ‘अजब न्याय’ मधील मूळ विषय ही पूर्वापार चालत आलेली चिनी कथा आहे. शिवाय ही कथा काही फरकाने बायबल मध्येही सांगितलेली आहे. ‘तीन पैशांचा तमाशा’ म्हणजे जॉन गे या लेखकाने लिहिलेले ‘बेगर्स ऑपेरा हे मूळ इंग्रजी नाटक. ह्या दोन्ही गोष्टींत फेरफार करून ब्रेश्तने स्वत:चे उद्दिष्ट साधण्यासाठी स्वतंत्र नाटके लिहिली. ब्रेश्त स्वत:ला साम्यवादी म्हणवीत असे. साम्यवादाच्या प्रचाराचे एक साधन म्हणून तो नाटकांकडे बघत होता. सामाजिक परिस्थितीची जाणीव असलेल्या ‘नवीन मानवा’ची आणि दैववादावर मात करणार्या समाजाची निर्मिती हे त्याला ह्या कृतींमधून अभिप्रेत होतं.
हे परिणाम साधण्यासाठी त्याने त्याच्या ‘एपिक थिएटर’मधे अनेक साधनांचा उपयोग केला. त्यांत महत्वाचे साधन म्हणजे ‘मेथड ऑफ अॅलिएनेशन’ (Verfremdungseffekt) म्हणजे एकरूपता न साधणे, कुठलाही प्रसंग ‘नेहमीचाच’ म्हणून मान्य न करता त्याकडे टीकात्मक आणि नवीन दृष्टिकोनातून बघणे किंवा कुठल्याही घटनेत, भावनेत गुंतून न जाता तिचा तटस्थपणे विचार करणे. ‘एपिक थिएटर’मधे खर्या घटनांची प्रतिकृति निर्माण करण्याचा प्रयत्न नसतो. ‘कथन’ म्हणजे ‘एपोस’ हा त्याचा केंद्रबिंदू असून, घडून गेलेल्या घटनांवर दोन बाजूंनी विचार करणे, प्रेक्षकाला तसा विचार करायला लावणे असा त्याचा हेतू आहे. नटाची व प्रेक्षकांची प्रसंगाशी एकरूपता या नाट्यप्रकारांत अभिप्रेत नाही. हाच फरक ‘एपिक थिएटर’ व ‘ड्रॅमॅटिक थिएटर’ किंवा पारंपारिक रंगभूमि यांत जाणवतो.
‘एपिक थिएटर’चे विषयहि युद्धविरोधी, नाझींविरोधी, रूढिविरोधी, पांढरपेशा समाजाविरोधी, लष्करी बळाच्या विरोधी, व्यक्तिपूजाविरोधी, असे आहेत. समूहगीते, पाट्या, मथळे, टीका, गाणीं, प्रश्न विचारणे, शाहीर किंवा सूत्रधार यांची विवेचने, निवेदने अशा अनेक माध्यमांचा वापर एपिक थेटरमधे केला जातो. त्यंच्यामुळे घटनांचा ओघ तोडला जाईल आणि प्रेक्षक प्रसंगात वाहून न जाता अलिप्तपणे विचार करू शकतील, अशी अपेक्षा असते.
तेव्हा कोणत्याही वाङ्मयीन कलाकृतीचे रूपांतर करताना त्याचा व्याप आणि त्याच्या कक्षा या केवळ दोन भाषांपुरत्या मर्यादित राहात नाहीत. दोन भाषा म्हटल्या म्हणजे त्यांच्या मागे दोन समाज, दोन परंपरा, त्यांची भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय पार्श्वभूमी, यांचाही विचार रूपांतर करताना करावा लागतो आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्याच्या कलाकृतीवर उमटलेला असतो. त्याचा साहित्यनिर्मितीचा हेतू आणि त्याची प्रेरणा या गोष्टिंचा त्यांच्या लेखनावर परिणाम करतात.
प्रश्न असा आहे की, मराठी रूपांतरांतून हा ‘ब्रेश्त’ वाचकापर्यंत पोहोचतो का? ‘अजब न्याय’ हे नाटक बहुतेक ठिकाणी शब्दश: भाषांतरित केलेले आहे. शाहीर आणि इतर पात्रेहि जशीच्या तशी भाषांतरित केलेली आहेत. राणी महामाया, न्यायाधीश अजबदास, वगैरे पात्रांची नावेहि चपखल आहेत. त्यामुळे मूळ नाटकांतील पुष्कळसा आशय रूपांतरांत उतरला आहे. भौगोलिक व सांस्कृतिक पार्श्वभूमिहि योग्य रीतीने बदलली आहे. जर्मन नाटकांत पूर्वजर्मनीतील खेडे आहे. इथे महाराष्ट्रांतील दुष्काळी खेडे दाखविलेले आहे. तिथे सादर केलेले लोकनाट्य इथे दशावतारी सादर करतात. यामुळे ब्रेश्तला जे मुद्दे मांडायचे होते - समाजातील गरीब व श्रीमंत वर्गातील तफावत, गरिबांचे कष्टाचे असाहाय्य जीवन, त्यांची पिळवणूक - हे मुद्दे मराठी नाटकांतही जाणवतात.
परंतु ब्रेश्तच्या नाटकांत मूळ विवाद्य मुद्दा नांदीत मांडलेला आहे. ती नांदीच मराठी नाटकांत पूर्णपणे बदलली आहे.
जर्मन नाटकांत युद्धात बेचिराख झालेला पूर्व जर्मनीतील भाग दाखविला आहे. तिथल्या दरीतले लोक निर्वासित होऊन आणखी पूर्वेकडे सरकतात आणि युद्ध शमल्यावर ते परत येऊन आपल्या जमिनीवर हक्क सांगू लागतात. परंतु शेजारच्या खेड्यांतले लोक ही जमीन ताब्यात घेऊन तिथे आधुनिक पद्धतीने शेती करीत असतात. प्रश्न असा आहे की, जमीन वारसा हक्काने जुन्या मालकांना द्यावी की अधिक चांगल्या रीतीने लागवड करणार्या नव्या मालकांना द्यावी? आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी सांगितलेली गोष्ट म्हणजे हे संपूर्ण नाटक आहे. एकाच मुलावर दोन आया स्वत:चेच मूल म्हणून हक्क सांगत असतात. हे भांडण सोडवताना रक्ताच्या नात्यापेक्षा मानवता कशी श्रेष्ठ ते सांगितले आहे. शेवटी न्याय दिला जातो. केवळ जन्म देते ती मुलाची खरी आई नसून जी त्याला प्रेमाने ममतेने आणि त्याग करून पोसते, तीच त्याची खरी आई. शेवटच्या चार ओळीत निष्कर्ष मांडला आहे: ‘चालवू शकेल, त्याची गाडी; पोसू शकेल, त्याचे मूल; कसू शकेल; त्याची जमीन.’
या नांदीतील जमिनीचा प्रश्न हा नाटकांत दाखविलेल्या मुलाच्या प्रसंगाला समान्तर आहे. तसा मराठीत नाटकांत दाखलेला पाण्यासाठी बांध घालायचा आणि त्यासाठी जुना वाडा पाडायचा हा प्रश्न एक मूल आणि दोन आया या प्रश्नांशी अजिबात समान्तर नाही. त्यामुळे मराठी नाटकाची नांदी ही तुटक आणि नाटकाशी असंबद्ध वाटते, सुसूत्र वाटत नाही. तसेच संपूर्ण नाटकाचा हेतुहि त्यांत स्पष्ट न झाल्यामुळे नाटक परिणाम कारक वाटत नाही.
लेखकाने नाटक केव्हा, कुठे आणि का लिहिले, ह्या प्रश्नांच्या उत्तरांत मूळ नाटक आणि रूपांतर यांतील तफावत जाणवते. त्यावेळची जर्मनीतील राजकीय व सामाजिक परिस्थिति, काळाची गरज आणि लेखकाचा हेतु यांची जाणीव रूपांतरांतून होणे कठीण आहे. त्यामुळेच ब्रेश्तची प्रेरणा आणि अनुभव यांचा अभाव मराठी रूपांतरात जाणवतो.
ब्रेश्तने नाटकासाठी पार्श्वभूमि जर्मनीच्या सर्वात पूर्वेकडील भागाची निवडली आहे, जिथे साम्यवादाचा प्रभाव अधिक आहे. नाझींनी चालवलेल्या युद्धाने तिथल्या लोकांची कशी दुर्दशा झाली, हे सांगितले आहे. जे जमिनीचे जुने मालक त्यांना ‘उजवा गट’ व नवीन, आधुनिक पद्धतीने शेती करणारे, त्यांना ‘डावा गट’ म्हणून संबोधले आहे. दोन्ही बाजूंचे प्रतिनिधि म्हणून दोन म्हातारे आपापल्या बाजू मांडतात. बहुतेक पात्रांची नावे सामान्य नावेच आहेत.
ब्रेश्तने नाटकात साम्यवादाचा प्रचारहि भरपूर केलेला आहे. नवीन पद्धतीने शेतीची आखणी करणारी एक बाई आहे. तिला ‘ट्रॅक्टरवाली’ असेच नाव आहे. साम्यवादी राष्ट्रे किती प्रगतिशील असतात, ते दाखविण्याचा प्रयत्न आहे. एवढी जमिनीच्या हक्काची भांडणे पण लवादाकडून शांतपणे सोडवली जातात! उजव्या गटांतील म्हातारा म्हणतो की, डाव्या गटाची यांत्रिक अवजारे आणि त्यांचे प्रकल्प यापुढे आमचा काय निभाव लागणार! तेव्हा ही जमीन त्यांचीच, असे आम्ही मान्य करतो. पण ‘त्यांनी आम्हांलाहि त्यांच्या योजनांच्या आराखड्यांच्या प्रती द्याव्या, म्हणजे आमच्या नवीन जमिनीत आम्हांलाहि सुधारणा करता येतील. हीहि मागणी एकदम मान्य होते व वादच संपतो. केवढा समंजसपणा! हे फक्त त्या राष्ट्रातच शक्य वाटतं!! शिवाय या ‘टॅ्रक्टरवाली’ ची काही वाक्येही सूचक आहेत. ‘कायदे पडताळून काळाप्रमाण बदलले पाहिजेत’, किंवा ‘जमिनीकडे यंत्रांप्रमाणे उत्पादनाचं साधन म्हणून बघितलं पाहिजे,’ किंवा ती सांगते की, “मायाकोव्स्की या लेखकाने सांगितलंच आहे, सोव्हिएत लोकांच राष्ट्र म्हणजे सारासार विचाराचंच राष्ट्र असलं पाहिजे.’ त्याचप्रमाणे नाझीविरोध किंवा साम्यवादी राष्ट्रात त्यांना हा प्रश्न सोडविण्यासाठी मिळणारी राष्ट्रीय मदत, प्रोलेटारियाट आणि ब्रूर्झ्वा यांतील तफावत, ह्या गोष्टी ब्रेश्तच्या नाटकांत जशा प्रकर्षाने जाणतात, तशा रूपांतरात जाणवत नाहीत.
‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नाटकाची पार्श्वभूमी राजकीय व ऐतिहासिक असल्यामुळे रूपांतर कमी प्रभावी ठरते. परंतु ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाची पार्श्वभूमी प्रामुख्याने सामाजिक व मग राजकीय आहे. सर्वसाधारण मोठ्या शहराचे चित्र आणि त्यांत घडणारे हरतर्हेचे गुन्हे हे जगांत कुठेही थोड्याफार फरकाने तेच राहातात.
खुनी, दरोडेखोर, अट्टल गुन्हेगारांचा दादा अंकुश (मॅक) हा कथानायक भिकार्यांची संस्था चालवून त्यांना परवाने देणारा असा दाखवला आहे. प्राचार्य पंचपात्रे (पीचम)ची सुंदर व तरुण मुलगी अंकुशच्या प्रेमात पडून, पळून जाऊन त्याच्याशी लग्न करते. प्राचार्य अंकुशला पकडून देण्याचा चंग बांधतात. प्राचार्यांची पत्नी वेश्यांना लालूच दाखवून त्यांच्याकडून अंकुशला पकडून देते. पोलिस अधिकारी भंडारे (ब्राऊन) अंकुशचा मित्र. त्यामुळे अंकुशचे ‘रेकॉर्ड’ साफ असते. पण राष्ट्रपतींच्या आगमनाच्या वेळी भिकार्यांचा मोर्चा काढण्याची धमकी प्राचार्य भंडारेला देतात. त्यामुळे त्याला अंकुशला पकडावे लागते. पुढे अंकुश देवाचा धावा करतो आणि चमत्काराने त्याची फाशीच्या शिक्षेतून सुटका होते.
आता हे दाखविताना लंडनच्या जागी मुंबईची पार्श्वभूमी चपखल बसते. बहुतेक प्रसंग मूळ नाटकांतून जसेच्या तसे रूपांतर करताना उचलले आहेत. हे प्रसंग अर्थातच शब्दश: भाषांतरित केलेले नाहीत.
खुनी नायक, भिकार्यांची संख्या, पोलिस अधिकार्याने अट्टल गुन्हेगाराच्या लग्नाला मित्र म्हणून हजर असणे, अंकुशची आधीची बायको लालन हिच्याशी त्याची आताची बायको मालन हिचा संवाद, हे सर्व प्रसंग मुळातच अतिशय विनोदी आहेत व ते तसेच मराठी नाटकांतही रंगविले आहेत. पण सबंध नाटकाचा आशय आणि परिणाम तोच राहिला आहे का? दोन्ही नाटके एकच संदेश देतात का? या प्रश्नांच्या उत्तरावरून हे रूपांतर यशस्वी झाले आहे की नाही हे ठरवता येईल.
या प्रश्नांची उत्तरे मात्र नकारात्मक द्यावी लागतील. याचे कारण मुळात या दोन्ही लेखकांची प्रवृत्ति, प्रकृति आणि प्रेरणाच भिन्न आहेत. ब्रेश्त हा मुळात गंभीर प्रकृतीचा लेखक आहे आणि तो ‘कमिटेड कम्युनिस्ट’ आहे. तो रंगभूमीकडे सामाजिक प्रयोगशाळा म्हणून बघतो. तो म्हणतो, ‘नाट्य हे मार्क्सवादाचे प्रभावी साधन आहे आणि ते सामान्य माणसांसाठी उपयोगी आहे.’
तेव्हा ब्रेश्तने हे नाटक विनोदी प्रसंगावर आधारित लिहिले असले, तरी केवळ विनोद निर्मिति हा त्याचा हेतू नाही. त्याच्या लिहिण्यात कडवा उपरोध आहे. गुंडांचा दादा समाजावर उघड अत्याचार करतो. परंतु पांढरपेशे, उच्चभ्रू, श्रीमंत थरांतले लोकहि तितकेच अत्याचार करीत असतात. भिकार्यांना भीक मागण्याचाही परवाना लागावा आणि भिकेतला हिस्साहि संस्थाचालकाला द्यावा लागावा, यावरून श्रीमंत अधिकारी वर्ग गरीब वर्गाची कशारीतीने पिळवणूक करीत असतो, हे दिसते. श्रीमंत व गरीब वर्गातील भेद, भ्रष्टाचार, लाचलुचपत यांची प्रेक्षकाला जाणीव करून द्यावी, हा मूळ लेखकाचा हेतु.
या नाटकांतील विरोधाभास आणि उपरोध त्याच्या नावापासूनच सुरू होतात.’थ्री पेनी ऑपेरा’मधील ‘ऑपेरा’ हा उच्चभ्रू समाजासाठी, श्रीमंत लोकांसाठी असलेला प्रतिष्ठित असा करमणुकीचा प्रकार आणि ‘तीन पैशाचा’ म्हणजे य:कश्चित्. हा नावातील विरोधाभास ‘तीन पैशाचा तमाशा’ या नावात दिसत नाही. कारण मुळात तमाशा हा प्रतिष्ठित म्हणून मान्यता पावलेला प्रकारच नाही. तमाशांत आणि ‘ऑपेरा’त साम्य एकच. ते असे की दोन्हीत नाट्य आणि संगीत संमिश्रित असते. पण त्यांच्या समाजातील स्थानांत फार फरक आहे.
नामकरणापासूनच मराठी नाटक ब्रेश्तच्या नाटकापासून दूर जाऊ लागते. जर्मन नाटक जत्रेच्या प्रसंगाने सुरू होते. तिथे एका अट्टल दरोडेखोराबद्दल गाणे गाईले जाते. हाच या गोष्टीचा नायक आहे. मराठी नाटकात सूत्रधाराची व्यक्तिरेखा आहे. ही मूळ नाटकात नाही. मराठी नाटकात सूत्रधार इतर पात्रांची ओळख करून देतो. हे सर्व तमाशाच्या धर्तीवर आहे. बोलण्याचा आणि शब्दांचा फापटपसारा भरपूर. एकूण मुंबापुरीचे लांब वर्णन. त्यात थोडे अंकुशदादाचे वर्णन. शहराच्या वर्णनाने वातावरणनिर्मिती चांगली होते. पण अंकुशच्या पात्राला जर्मन नाटकाप्रमाणे उठाव येत नाही. नंतर छोटू भटजी आणि त्याचे विनोद, मिसेस पंचपात्रे यांचे विनोदी व्यक्तिचित्र, संस्कृतचे पटवर्धन मास्तर, संस्कृत शब्द वापरताना अंकुशने केलेल्या चुका, अंकुशची आणि इन्स्पेक्टर भंडारेची शाळेच्या क्रिकेट टीममधली मैत्री, हे पु. लं.च्या लिखाणांत वारंवार आलेले विषय आहेत. विनोदनिर्मितीचे क्षेत्र तेच आणि मर्यादित राहिलेले आहे. दर चार ओळीनंतर केलेल्या विनोदामुळे मूळ विषयाची तीव्रता फारच कमी झाली आहे.
याविरुद्ध ब्रेश्तच्या मूळ नाटकात अंकुश (मॅक) व भंडारे (ब्राऊन) हे युद्धाच्या वेळी खांद्याला खांदा लावून लढलेले असतात. त्यामुळे त्यांची एवढी मैत्री असते. या संदर्भावरून आणि तुलनेवरून लक्षात येईल की, पात्रे आणि प्रसंग एकच असूनही ब्रेश्तच्या नाटकात विषयाचे गांभीर्य टिकवलेले आहे.
विशेषत: गाण्यांमध्ये रूपांतरात फार फरक जाणवतो. अंकुश-मालनाच्या लग्नाच्या वेळी ‘डोंगरा शेजारी डोंगर...’असे गाणे आहे. त्यावेळी ब्रेश्तच्या नाटकांत ‘गरीब लोकांसाठी लग्नाचं गाणं’ अशा नावाचे गाणे आहे. या मथळ्याची पाटी प्रथम दाखवली जाते. प्रत्यक्ष गाण्यापेक्षाही त्याच्या शीर्षकाला अधिक महत्त्व आहे, त्यात आशय आहे. नवरा-नवरी लग्नाला उभे असतात तेव्हा नवर्याला माहीत नसते की, इतके श्रीमंती कपडे नवरीने कुठून आणले? आणि त्याचे संबंध नाव काय, हे तिला माहीत नसते. त्याच प्रसंगात दुसरे गाणे आहे ‘चाचेगिरी करणार्या जेनीचं’ जो -तो तिच्याकडे नाणे फेकून तिला कामे सांगतो. पण ‘एक दिवस एक बोट येईल, तोफांनी सबंध गाव उद्ध्वस्त करून तिला एकटीला वाचवून घेऊन जाईल’, असे ती त्यांना सांगते. तिसरे गाणे मॅक (अंकुश) स्वत: म्हणतो. ब्राऊन (भंडारे) त्याच्या लग्नाला येतो, तेव्हा त्याला युद्धाचे दिवस आठवतात. हे आहे ‘तोफांचे गाणं’. आशय आहे: जॉर्ज, जिम आणि जॉन हे सैनिक तोफांवर जगतायत. त्यांना काळ्या किंवा फिकट रंगाचे नवीन वंशाचे लोक भेटतायत. त्यांना ते फाडून खातायत्. ह्यातले दोघे पुढे मारले जातात आणि एक बेपत्ता होतो. पण त्या सर्वांचे रक्त लालच असते आणि ... ‘सैनिक पाहिजेत’ म्हणून पुन्हा एकदा जाहिरात येते.
या तीन गाण्यांत ब्रेश्तने गरिबांची गरिबी, श्रीमंतांची माजोरी आणि युद्धांतले अत्याचार दाखविले आहेत आणि नेमका हाच भाग मराठी नाटकात वगळला गेला आहे! ह्या प्रसंगातले पहिले गाणे आशय संपूर्ण बदलून येते, तर नंतरची दोन गाणी इथे पूर्ण वगळली आहेत. शिवाय पीचम (प्राचार्य) ‘माणसाच्या असमर्थतेचं गाणं’ म्हणतो, ते मराठी नाटकात आलेले नाही.
ब्रेश्तच्या नाटकात तिन्ही अंकांचा शेवट हा तीन गाण्यांनी होतो. ‘पहिलं तीन पैशाचं गाणं’, ‘दुसरं तीन पैशाचं गाणं’ आणि ‘तिसरं तीन पैशाचं गाणं’, असे त्यांना संबोधले आहे. पहिल्या गाण्याचे शीर्षक आहे, ‘मानवी जीवनाच्या अनिश्चिततेसंबंधी गाणं’. हे साधारण मराठी नाटकात प्रसंग चार नंतर येईल. आशय आहे : जीवनांत आनंदी होण्यासाठी हे आयुष्यच कमी पडते. भाकरीचा हक्क कोणाला नकोय?-पण तो मिळाला, असे कोणीच सांगत नाही. ‘चांगला’ माणूस म्हणून जगायला कोणाला नकोय?- पण इथे तर साधनेच कमी आहेत आणि माणसे असंस्कृत आहेत. एकीने आणि शांततेने जगायला कोणाला नकोय? पण हाय! ही परिस्थितिच अशी आहे! खरे असे आहे की, जग दरिद्री आहे आणि माणसे दुष्ट आहेत. बायकोवर आणि भावावर प्रेम करायला कोणाला आवडणार नाही? पृथ्वीवर स्वर्ग कोणाला नको असेल? पण परिस्थिति हे देऊ शकत नाही. म्हणून तर हे सगळे असे आहे!
‘दुसरं तीन पैशाचं गाणं’ मॅक (अंकुश) स्वत: म्हणतो. ‘माणूस कशावर जगतो?’ आशय आहे : ‘सभ्य गृहस्थ हो, तुम्ही आम्हांला शिकवतां की वाईट कृत्य करू नका. पण आधी भाकरी आणि मग नीति, आधी गरिबांना त्यांच्या हिश्शाची भाकरी मिळाली पाहिजे. माणूस कशावर जगतो, तर तो विसरू शकतो की तो एक माणूस आहे आणि म्हणूनच तो जगू शकतो. माणूस फक्त दुष्कृत्यांवर जगतो.’ मराठी नाटकात या अर्थाशी जुळते एक गाणे प्रसंग आठच्या शेवटी आहे. पण संपूर्ण आशय तोच नाही.
‘तिसरं तीन पैशाचं गाणं’. आशय आहे : ‘जर राणीचे दूत नेहमीच आले असते, तर आपले जीवन नेहमीच शांततापूर्ण आणि आनंदी झाले असते? अन्यायाचा बदला अन्यायाने घेऊ नये, कारण अन्यायाचे स्वत:हूनच बर्फ बनून जाते!! अन्याय स्वत:हूनच जिरून जातो!!! या दरीतल्या अंधाराचा आणि थंडीचा विचार करा, की जिथून कायम यातनांचे हुंदकेच ऐकू येतात.’ केवढा उपरोध! केवढी कळकळ!
मराठी नाटकात हे गाणे संपूर्ण वगळले आहे. ब्रेश्तची विचरप्रणाली, त्याला जाणवणारा वर्गविग्रह, त्याला हवा असलेला समाजरचनेतला बदल, हे या गाण्यांतूनच प्रकट होते. आणि ही गाणीच मराठी नाटकात वगळली गेली आहेत. त्यामुळे ब्रेश्त त्याच्या तत्त्वप्रणालीसह मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे शक्यच नाही. कारण या दोन्ही लेखकांची दृष्टि आणि त्यांचे हेतूच भिन्न आहेत.
ब्रेश्तने रंगभूमीकडे केवळ करमणुकीचे साधन म्हणून कधीच बघितले नाही. माणसू हा परिवर्तनशील असतो आणि माणसांत परिवर्तन घडवून आणलेच पाहिजे, असे त्याचे ठाम मत होते. निच्छs या जर्मन तत्त्वज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे तो ‘मेलेल्या देवा’च्या जगात जगत होता. परिस्थितीने काहीसा उद्विग्न. परंतु निश्चित ध्येयासाठी झगडणारा असा तो होता. त्यामुळे रूपांतरात मराठी लेखक आणि ब्रेश्त यांच्या प्रवृत्तीतील फरकाचे प्रतिबिंब त्यांच्या कलाकृतीत दिसते.
शिवाय इतर तपशिलांतहि फरक आहेच. जर्मन नाटकांत मॅक (अंकुश) ल्युसीला (लालनला) सांगतो की, ‘पॉली (मालन) कोण ते आपल्याला माहीत नाही आणि तिच्याशी आपला काहीही संबंध नाही.’ असे मराठी नाटकात अंकुश तिला नाकारीत नाही. ल्युसी ही जर्मन नाटकात ब्राऊनची मुलगी आहे. ब्रेश्तची बहुतेक गाणी बॅलड्स् किंवा लोकगीतांच्या स्वरूपांत आहेत.
जर्मन नाटकातील राणीच्या राज्याभिषेकाचा प्रसंग म्हणजे मराठी नाटकात राष्ट्रपतींचा स्वागत-समारंभ. जर्मन नाटकात राज्याभिषेकाच्या वेळी राणीने काढलेल्या फतव्यामुळे मॅकची फाशी रद्द होऊन त्याला बंगला, संपत्ति मिळते, तर मराठी नाटकात ‘नारायण’ नावाचा तुरुंगाचा वॉर्डन देवाच्या रूपात प्रगट होऊन अकुंशची सुटका चमत्काराने करतो. दैववादावर मात करायला निघालेल्या ब्रेश्तच्या नायकाची सुटका देवाने प्राक्त होऊन करावी! हे विसंगतच वाटते. ब्रेश्त आपल्या नाटकांत दाखवतो की, श्रीमंताच्या आणि सत्ताधीशांच्या एका सहीवर एखाद्या गरिबीचे जीवन अवलंबून असू शकते.
ब्रेश्तची नेहमीची अशी काही रूपके मराठी नाटकात दिसतच नाहीत. उदा. माशाचे प्रतीक. सुरुवातीच्या मॅकच्या वर्णनाच्या गाण्यात ब्रेश्त त्याची तुलना मोठ्या माशाशी करतो. हे मोठे मासे लहान माशांना गिळून आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यांच्या जीवावर आणखी मोठे होतात.
पु. लं.नी ‘परस्पर हितकारी बँके’चे प्रकरण नवीन घातलेले आहे. मुंबईच्या जीवनाचे आणि भ्रष्टाचाराचे चांगले चित्र उभे केले आहे. मंत्री, पोलिस, डॉक्टर्स, ज्युरी यांना त्यांनी अधून-मधून टोले मारले आहेत. या सर्वांतून विनोदही निर्माण झाला आहे. त्यातून यशस्वी करमणूक होते, परंतु त्यातून समाज सुधारणेचा हेतु किंवा सामान्य माणसाला जागृत करण्याची प्रेरणा वगैरे जाणवत नाही. त्यामुळे हा एक केवळ नाट्यप्रयोग म्हणून बघितला, तर यशस्वी ठरूही शकेल, पण त्यातून ब्रेश्त मराठी प्रेक्षकांपर्यंत पोचतो का? या प्रश्नाला नकारात्मकच उत्तर द्यावे लागेल.
Comments
Post a Comment